Friday, July 2, 2010

राज ठाकरे यांना अनावृत्त पत्र : भाग २


जे शासन आपला ५० वा वर्धापन दिनसुद्धा वर्धापन दिन २०१० साली आहे’ हे खूप आगाऊ ठाऊक असूनसुद्धा शेवटच्या काही दिवसात काही थातूर मातूर कार्यक्रम आखून, ’इव्हेंट मॅनेजमेंट’वाल्यांना आवतण देऊन जणू काही चटावरचं श्राद्ध उरकल्यासारखं साजरं करतं आणि महाराष्ट्र राज्याच्या स्थापना दिवसाला, हुतात्म्यांच्या बलिदानाला आपण काय महत्त्व देतो ते दाखवून देतं, त्याच शासनाचा एक अधिकारी (या आचरटाला अधिकारी कोणी केला?) म्हणवणारा प्राध्यापक (याला प्राध्यापक म्हणे ’येम पी येश शी’वाल्यांनी केला) आठवीनंतर अकरावीपर्यंत जवळ जवळ चार – पाच वर्षे चित्रकलेशी दूरान्वयाने संबंध नसलेल्या मुलांना विषय काय देतो तर ’महाराष्ट्र डे’. विद्यार्थ्यांनी या विषयावर काय चित्र काढावं, कसलं चित्र काढावं अशी या मूर्खाची कल्पना होती. एका विद्यार्थ्याने तर ’नटरंग’मधल्या ’आता वाजले की बारा’ लावणीचं ’मेमरी ड्रॉईंग’ काढून ’महाराष्ट्र डे’ साजरा केला आणि तुमच्या माझ्यासारख्या अस्सल आणि कट्टर महाराष्ट्रवाद्यांना इतरजनांचे महाराष्ट्राविषयीचे काय समज आहेत हे जणू काही नकळत आणि उपरोधिकपणे दाखवून दिलं.

खरं तर हा विषय रचनाचित्राचा, पण जेजेतल्या त्या आचरट आणि बेअक्कल प्राध्यापकाने ’मेमरी ड्रॉईंग’मध्ये तो टाकून आपल्या अकलेचे कसे बारा वाजले आहेत हेच दाखवून दिलं. खरं तर त्या मूर्ख प्राध्यापकाला प्राध्यापक म्हणणं हा प्राध्यापक या शब्दाचाच अपमान आहे. महाराष्ट्रात विद्वान प्राध्यापकांची केवढी तरी मोठी परंपरा आहे. अगदी न.र. फाटकांपासून ते आजच्या भालचंद्र नेमाडेंपर्यंत किती नावे सांगावित. एकेक नावं घेता घेता एकेकाचं डोंगराएवढं कर्तृत्त्व डोळ्यासमोर उभं रहातं आणि इकडे जेजेत सालं स्वत: नाव पत्ता सुद्धा ज्यांना स्वत:च्याच मातृभाषेतसुद्धा लिहिता येत नाही असले हरामखोर प्राध्यापक म्हणून मिरवतात. वर्षातून एकही लेक्चर न घेता प्राध्यापकाचं वेतन आणि अनुषंगित भत्ते वर्षानुवर्षे लाटतात आणि या असल्या अडाणxxxना महाराष्ट्र लोकसेवा आयोग नावाची संस्था जेजेमध्ये नेमते. यावर हसावं का रडावं तेही कळत नाही.

ज्याने ’महाराष्ट्र डे’ हा विषय सीएटीला दिला त्यालासुध्दा या परीक्षेला बसवलं असतं तर त्यालाही ’महाराष्ट्र डे’चं ’मेमरी ड्रॉईंग’ काढता आलं नसतं, हे मी निर्विवादपणे, छातीठोकपणे सांगतो. ’मेमरी ड्रॉईंग’चं मूळ ड्रॉईंग पेन्सिलीने काढावं लागतं. पण जेजेत चिकटल्यापासून या भैताडाने पेन्सिलीला टोक तरी काढली असेल का याविषयी माझ्या मनात शंका आहे. चित्रं – बित्रं काढणं हे फारच दूरचं.

या किश्शाचा उत्तरार्ध तर आणखीनच भयंकर आहे. या सीएटीच्या परीक्षेनंतर पंधरवड्यात मुंबईतल्या एका अनुदानित कला महाविद्यालयात जाहिरात दिल्यापासून तब्बल ९- १० महिन्यांनंतर घेतलेल्या कला शिक्षकांच्या पदभरतीच्या परीक्षात्मक मुलाखती उपयोजित कलेच्या या भावी कला शिक्षकांना विषय कोणता आला तर पुन्हा ’महाराष्ट्र डे’च! म्हणजे जेजेमध्ये शिकण्यासाठी येणार्‍या मुलांनी ’महाराष्ट्र डे’ या विषयावर ’मेमरी ड्रॉईंग’ काढायचं तर अनुदानित कला महाविद्यालयात लेक्चरर म्हणून येऊ घातलेल्या भावी कला शिक्षकांनी ’महाराष्ट्र डे’ या विषयावर चित्र काढायचं? हे सारं ठरवलं कोणी तर ज्याने विद्यार्थ्यांना ’महाराष्ट्र डे’ हा विषय दिला त्या आचरटाचार्यानेच! हे लिहिताना सुद्धा एवढी चिड – चिड होते आहे की, शब्द अपुरे पडताहेत, असहाय्य वाटतंय पण जे घडलं ते हे असंच आहे. याएका शब्दाचीही अतिशयोक्ती नाही.

या असल्या भंगार कला महाविद्यालयांमध्ये का तुम्ही तुमच्या मुलाला उच्च शिक्षणासाठी पाठवणार आहात? मला शक्य असतं तर जेजेत प्रवेश घेणार्‍या सार्‍याच विद्यार्थ्यांच्या पालकांना असं तुम्हाला लिहितोय तसं पत्र लिहायला आवडलं असतं, पण मनात कितीही जरी असलं तरी माझ्यासारख्या अत्यंत छोट्या माणसाला ते शक्यच नाहीये. म्हणूनच तुमच्या मुलाने जेजेत सीएटी दिल्याचे कळल्याबरोबर मी हे जाहीर पत्र लिहावयास घेतले. हेतू हा की, या माध्यमातून जेजेत प्रवेश घेणार्‍या विद्यार्थ्यांच्या पालकांपर्यंत मला हे सारं पोहोचवता यावं. तुम्ही जेजेचे माजी विद्यार्थीही आहात, एक मान्यवर व्यंगचित्रकारही आहात, इतकेच नव्हे तर महाराष्ट्रातील एक, जो उद्या कदाचित महाराष्ट्राच्या सत्तेवर हक्क सांगणार आहे त्या पक्षाचे प्रमुखही आहात. म्हणूनच हे जाहीर पत्र लिहिण्याचं औधात्य करतो आहे.

महाराष्ट्राच्या कला शिक्षणाची सर्व व्यवस्था जो पाहतो ते कलासंचालकपदच गेली अनेक वर्षे रिक्त आहे. जे जे स्कूल आणि अप्लाईड आर्ट सारख्या चारही शासकीय कला महाविद्यालयात अधिष्ठातापदीच कोणी नाहीये. प्राध्यापकांची बहुसंख्य पदं जिथं रिक्त आहेत. प्राध्यापक म्हणून जे आहेत त्यांना भांडी घासायलाही कोणी ठेऊ शकणार नाहीये. जे काही आधी लागलेले बरे शिक्षक आहेत ते येत्या दोन तीन वर्षातच सेवानिवृत्त तरी होणार आहेत किंवा सेवेची वीस वर्षे पूर्ण होताच सोडून तरी जाणार आहेत आणि मग उरणार आहेत ते सारे कंत्राटी आणि हंगामी (कामगार) कलाशिक्षक. ते काय या विद्यार्थ्यांना शिकवणार? जिथं त्यांच्याच अस्तित्वाचा प्रश्न रोज उभा राहतो आहे, १५- १५, २० – २० वर्षे नोकर्‍या करूनही ज्यांना आपल्या भवितव्याचाच प्रश्न रोज आ वासून सतावतो आहे; ते शिक्षक काय महाराष्ट्राच्या उद्याच्या पिढीच्या चित्रकाराचं आयुष्य घडवणार आहेत? या अशा ठिकाणी का आपण आपल्या मुलाला उच्च शिक्षणासाठी पाठवणार आहात?

तंत्र शिक्षणमंत्री राजेश टोपे म्हणतात की येत्या चार महिन्यात आम्ही महाराष्ट्राला कलासंचालक देतो. चारही कलामहाविद्यालयांना अधिष्ठाता देतो. म्हणे सर्व शिक्षकांची पदे भरती करतो. या सार्‍या शुद्ध भूलथापा आहेत. यातलं काहीही ते करू शकणार नाहीयेत. कारण या संदर्भातले आधी केलेले नियमच (जे योग्य आहेत) त्यांना तसं करू देणार नाहीयेत. प्राध्यापकपदाचा पाच वर्षाचा अनुभव असल्याशिवाय त्याला अधिष्ठातापदी नेमता येत नाही. अधिष्ठातापदाचा ५ – ६ वर्षांचा अनुभव असल्याखेरीज त्याला कलासंचालकपदी नेमता येत नाही, असे नियम असताना ते कुठल्या तोंडाने कलासंचालक देतो, अधिष्ठाता देतो असे सांगतायत ते कळत नाही. कारण या चारही संस्थांमधली १६ पैकी ११ प्राध्यापकांची पदं रिक्त असताना, जी चार पदं भरली आहेत त्यातले दोन प्राध्यापक येत्या काही दिवसांतच सेवानिवृत्त होणार असताना आणि उरलेले दोन बैल म्हणून घाण्यालाही जुंपण्याच्या लायकीचे नसताना ते अधिष्ठातांचं पद कसं भरणार आहेत? वा कलासंचालकपदावर कशी काय कुणाची नेमणूक करणार आहेत? राजेश टोप्यांची ही शुद्ध थापेबाजी आहे. ’टोप्या लावणं ’आहे.

या अनावृत्त पत्राचा तिसरा आणि अंतिम भाग उद्या

No comments: