Wednesday, June 30, 2010

राज ठाकरे यांना अनावृत्त पत्र








श्री. राज ठाकरे यांना,


सप्रेम नमस्कार विनंती विशेष.



आपल्या चिरंजीवाने जे.जे. स्कूल ऑफ आर्टच्या प्रवेशासाठी सीएटी दिल्याचे कळले म्हणून (धास्तावून) हे अनावृत्त पत्र लिहितो आहे.



का त्या बिचार्‍याल्या उगाचच नसत्या संकटात लोटताय? जे.जे. स्कूल ऑफ आर्ट आणि जे.जे. इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाईड आर्ट या दोन्हीही जगविख्यात संस्था आता कला-शिक्षणासाठी प्रसिद्ध राहिलेल्या नाहीत. भ्रष्ट मार्गाने केलेल्या ना-लायक व्यक्तिंच्या जातीयवादी नेमणूकांचं आयडियल मॉडेल म्हणून त्या आता ओळखल्या जातात आणि त्यामुळेच केवळ तिथलं कला - शिक्षण रसातळाला जाऊन पोहचलंय आणि ही रसातळाला जाऊन पोहोचण्याची प्रक्रिया काही काल – परवा सुरू झालेली नाही. तुम्ही आम्ही ज्या काळात जेजेत शिकत होतो तेव्हापासूनच त्या प्रक्रियेला सुरूवात झाली होती. आता ती पूर्ण झाल्ये इतकंच.



तुम्ही आम्ही ज्या काळात शिकत होतो त्या काळात शिकवणारे बहुसंख्य प्राध्यापक व कलाशिक्षक हे आपापल्या विषयात ’दादा’ होते (आता नेमकं त्याच्या उलटं झालंय. नको त्या विषयात त्यांची दादागिरी चालते) कलाशिक्षणाविषयी, विद्यार्थ्यांविषयी त्यांना आस्था होती. जेजे च्या परिसरात जसा त्याना मान होता तसाच मुंबईच्या कलावर्तुळातही होता. त्यांच्या कर्तृत्त्वाचा दबदबा सर्वत्रच होता. पण या सार्‍याला कशी कुणास ठाऊक कुणाची दृष्ट लागली आणि होत्याचं नव्हतं होण्यास सुरूवात झाली. चारचौघांच्या महत्त्वाकांक्षेनं सारा घात केला आणि जे जे चा परिसरच आधी कला क्षेत्रातील राजकारणाचा आणि मग भ्रष्ट अधिकार्‍यांचा अड्डा बनला. कर्तृत्त्ववान शिक्षक आणि प्राध्यापक एकेक करीत राजीनामे देऊन निघून गेले. ज्याच्या अंगात धाडस नव्हतं ते गेली दिवस मोजू लागले आणि वीस वर्षे पूर्ण होताच सेवानिवृत्ती घेऊन मोकळे झाले.



बाबूराव सडवलेकर कलासंचालक पदावरून सेवानिवृत्त होताच, कारकूनांचं साम्राज्य तिथं पसरलं आणि जेजेच्या ब्रिटिशकालीन प्रशासन परंपरेचा पुरता चुथडा झाला. तंत्रशिक्षण खात्यातल्या भ्रष्ट आणि जातीयतेचं विष पसरवणार्‍या नालायक अधिकार्‍यांच्या हातात जेजेचं सारं प्रशासन जाताच अशा काही भयंकर नेमणूका तिथं झाल्या की नंतरच्या काळात ते सारं असहाय्य होऊन पहाण्याखेरीज कुणाच्याच हातात काही उरलं नाही (प्लीज नोट : यातलं बरचसं काही हे युती शासनाच्याच काळात झालं) दै. सामनामधून या सार्‍यावर कठोर ताशेरे ओढले गेले, पण त्याकडेही दुर्लक्ष करण्यात आलं ( हे ही युती शासनाच्याच काळात घडलं) दै. सामनाच्या बातम्यांची योग्य ती दखल घेऊन जरी कारवाया झाल्या असत्या तरी आज जी ही वेळ आली आहे; ती निश्चितपणे आली नसती. पण ते होणे नव्हते आणि झालेही नाहीच. त्या सार्‍याचा परिपाक आता महाराष्ट्राच्या मानाच्या कला – शिक्षण परंपरेला आज भोगावा लागतोय. या विषयावर खूप काही लिहिता येण्यासारखे आहे आणि वेळोवेळी मी ते दै. लोकसत्तामधून लिहिलेही आहे. चिन्हचा तर एक अख्खा तीनशे – साडेतीनशे पानांचा अंक मी फक्त या विषयावरच काढला आहे. त्याची एक प्रत मी भेटीदाखल आपणासही पाठवली होती. पण कदाचित कार्यबाहुल्यामुळे ती वाचण्यास आपणास तेव्हा सवड मिळाली नसेल तर आता कृपया आपण ती अवश्य नजरेखालून घालावी आणि मगच चि. अमितला जे जे स्कूलमध्ये शिक्षणासाठी पाठवावे. माझी खात्री आहे त्यातला एखादा लेख जरी आपण वाचलात तरी चि. अमितला जेजेत शिक्षणासाठी पाठवण्याचं धाडस तुम्ही करू शकणार नाही.



जेजेमधील प्रवेशासाठी जी सीएटीची परीक्षा चि. अमितने दिली त्याचाच एक किस्सा सांगतो त्यावरून काय लायकीची माणसं महाराष्ट्र शासनाच्या तंत्रशिक्षण खात्याने आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने जेजेत आणून बसवली आहेत ते आपणास सहज कळून येईल.



सीएटी साठी एक पेपर होता मेमरी ड्रॉईंगचा आणि विषय दिला होता ’महाराष्ट्र डे’ एक आणि एकच विषय. दुसरा पर्याय नाही. ’मेमरी ड्रॉईंग’ला सर्वसाधारणपणे दोन अथवा तीन विषय देण्याची आजवरची प्रथा आहे, पण इथे मात्र एकच विषय तोही असा ’महाराष्ट्र डे’ . परीक्षेला बसलेली सारी मुलं हबकुनच गेली. काय करावं, काय काढावं तेच त्यांना कळेना. बरं कुणाला विचारावं तरी पंचाईत. न विचारावं तरी पंचाईत. तोंड दाबून बुक्क्यांचा मार. अखेर जे काही सुचलं, जे काही काढता आलं ते काढून नशिबावर हवाला ठेऊन ती बिचारी मोकळी झाली. लहानपणापासून घरात चाललेले संवाद, वाद, चर्चा यामुळे चि. अमितने ’महाराष्ट्र डे’चं चित्र कदाचित चांगलं काढलं असण्याची शक्यता आहे. ’शक्यता आहे’ असा शब्द प्रयोग मी जाणीवपूर्वक केला, कारण हा ’मेमरी ड्रॉईंग’चा विषयच नव्हे (जरी मी कट्टर महाराष्ट्राभिमानी असलो तरी) असं माझं स्पष्ट मत आहे. ’मेमरी ड्रॉईंग’चे विषय हे रोजच्याच व्यवहारातलेच असावेत, असतात. ’मेमरी ड्रॉईंग’ला आवश्यक असलेल्या कुठल्याच दृश्य – प्रतिमा ’महाराष्ट्र डे’ या विषयात नाहीत असं मला वाटतं. माझं हे वाटणं मी अनेक ज्येष्ठ कला शिक्षकांकडून तपासून घेतलं आहे. त्यांचंही म्हणणं तेच पडलं की अकरावीच्या विद्यार्थ्यांसाठी हा विषय योग्य नव्हे. एका तासात करायचा तर नक्कीच नव्हे, हे त्यांनीच माझ्या नजरेस आणलं. काय रंगवलं असेल बहुसंख्य विद्यार्थ्यांनी? तर झेंडावंदन. आता झेंडावंदन करताना दाखवणं सोप्पं आहे. पण झेंडा कुठला दाखावयाचा? तिरंगा दाखवला तर ’इंडिपेंड्न्स डे’ होणार किंवा ’रिपब्लिक डे’ होणार! मग यावर उपाय म्हणून काही मुलांनी चक्क भगवाच झेंडा काढला. काही मुलं मात्र हुशार होती त्यांनी शक्कल लढवली आणि झेंड्याची काठी एवढी उंच दाखवली की झेंडा थेट कागदाच्याच बाहेर गेला. त्यामुळे त्यांचा झेंडा कुठला काढायचा ही कटकटच वाचली. चि. अमितच्या वर्गातल्या मुलांची मात्र थोडीशी गोचीच झाली. ज्यांनी झेंडा कागदाबाहेर काढला ती मुलं सुटली, पण कागदाच्या आत काढला त्यांची भलतीच पंचाईत झाली. आपण भगवा झेंडा काढला तर हा (चि. अमित) काय म्हणेल असा (भयंकर) प्रश्न त्यांना सतावू लागला. मग त्यातला आणखी काही हुशार मुलांनी आणखी डोकं लढवलं आणि ’लफडा नको’ म्हणून चक्क मनसेचाच झेंडा काढून आपापल्या परीने प्रश्न सोडवून टाकला. महाराष्ट्राबाहेरून आलेल्या (मनसेच्या भाषेत परप्रांतीय) मुलांची मात्र यात गोची झाली. ती पोरं पार वेडीच झाली. त्यांना ’इंडिपेंड्न्स डे’ ठाऊक होता, ’रिपब्लिक डे’ ठाऊक होता, झालंच तर ’सारी डे’, ’ट्रॅडिशनल डे’, ’फ्रेंडशीप डे’, ’व्हॅलेंटाईन डे’, ’गुड फ्रायडे’ वगैरे डेज्‍ ठाऊक होते. इतकेच काय, ’ड्राय डे’ सुद्धा ठाऊक होता. पण ’महाराष्ट्र डे’? छ्या... व्हॉटीज दॅट? विचार करकरून पोरं बिचारी येडचापच झाली आणि मग वेळ संपत आली म्हणून जे सुचलं ते कागदावर उतरवून मोकळी झाली आणि परीक्षा संपल्यावर बाहेर येऊन धाय मोकलून रडती झाली. त्यांच्या सोबत आलेल्या त्यांच्या मम्मीज आणि डॅडीजनी नंतर मग जे जेच्या (उपलब्ध असलेल्या ) शिक्षकांना गराडा घालून नको नको ते प्रश्न विचारले. पण ते तरी बिचारे काय उत्तर देणार? गेली १५ – २० वर्षे असाच वेडझव्यांचा कारभार चालू आहे, असं (मनातल्या मनात मोठ्याने) बोलून ते बिचारे आपापल्या कामाला लागले.



(या पत्राचा दुसरा भाग उद्या वाचा)

4 comments:

Santosh More said...

Is Mr. Raj Thakre so serious about his son's (and his son himself) art education?

Rashmi Ingole said...

Those were the best days of my life,
When fun and frolic was rife.
A refreshing realm of knowledge,
That was my college.~


Funny friends and loving lecturers,
Freaky fundas and flexible study hours.
Riddles and rumors, gossips and giggles-umpteen,
Added spice to the junk I hogged at the college canteen.~


Free from the fetters of school,
I willingly jumped into the knowledge pool.
Where education was mixed with entertainment,
At college learning was never a punishment. ~

Gajanan Patil Artworks said...

जर ती काँलेजेस चांगल्या विद्याथ्यांना ङावलत असतील तर ती बंद पङलेलीच बरी कला या क्षेत्रात काही नालायक लोकांच्यामुळे बदनाम झाले आहे आज कलाकाराला अतोनात संघर्ष करुनही हालाकीचे जिवन जगावे लागत आहे

suresh telore said...

I dont think, after reading this letter, I hope Mr Raj Thakre and his son change their mind