Tuesday, May 4, 2010

'देवदत्त' देणगी


तो खूपच तरुण आहे. त्याच्याकडे मोबाईल नाही. त्याचे अगदी जवळचे मित्र क्वचितच. तो खूप मोजकं बोलतो, घराजवळच्या बागेत ब-याचदा असतो. झाडावरचं फुल झाडावरच राहू द्या म्हणतो. थोडक्यात काय तो स्वतःच्याच विश्वात असतो. आणि तो चित्र काढतो. ( हे महत्त्वाचं नाही का? )
हे सगळं सांगायचं कारण म्हणजे देवदत्त पाडेकरच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा खोवला गेलाय. देवदत्त पाडेकरची निवड फ्लोरेन्स डान्स सेंटरने आयोजित केलेल्या चित्रप्रदर्शनासाठी झाली आहे. हा मान मिळवणारा तो भारतातील आतापर्यंतचा पहिला चित्रकार ठरला आहे. फ्लोरेन्स डान्स सेंटर ही बॅले डान्सचं प्रशिक्षण देणा-या जगप्रसिद्ध संस्थांपैकी एक. ही संस्था दरवर्षी अशाप्रकारचं प्रदर्शन आयोजित करते. आणि त्यासाठी अमेरिका आणि युरोपमधील चित्रकारांना आमंत्रित केलं जातं. पण फ्लॉरेन्समधील वास्तव्याच्या काळात देवदत्तने बॅले डान्सवर आधारित चित्रांची एक संपूर्ण मालिका केली होती. त्याचं ते काम फ्लॉरेन्स डान्स सेंटरने पाहिलं आणि खास त्याच्या सोलो शोचं ( एकल प्रदर्शनाचं ) आयोजन केलं. त्याच्या या शोचं नाव आहे 'एलिगन्स ऑन राईज' . ८ मे ते ३० मे या कालावधीत फ्लोरेन्स येथे त्याला या 'वन मॅन शो'चा बहुमान मिळालाय.
देवदत्तच्या चित्रांची ही मालिका बॅले डान्सवर आधारित आहे. त्यात त्याने बॅले डान्स शिकायला आलेल्या लहान मुलींपासून ते बॅले डान्समध्ये निपूण झालेल्या एक परिपूर्ण नृत्यांगनेपर्यंतचा प्रवास रंगवला आहे. यासाठी फ्लॉरेन्स डान्स सेंटरच्या स्टुडिओत प्रवेश मिळवून बॅले नर्तिकांच्या तालमींचा ( रिहर्सल ) देवदत्तने अभ्यास केला. अभिजात आणि समकालीन अशा दोन्हींचं मिश्रण त्याला या नृत्यप्रकारात तालमीदरम्यान अनुभवता आलं. आणि त्यातून तयार झाली ती त्याची चित्रमालिका, खास देवदत्त टच असलेली. 'एलिगन्स ऑन राईज' या प्रदर्शनासाठी त्याने काढलेली चित्रं याची साक्ष आहेत. त्याला भारतीय नृत्यांवर आधारीतही एक चित्रमालिका करायची आहे, पण सध्या त्यासाठी लागणारा वेळ आणि संधी या दोन्हींच्या शोधात तो आहे. कदाचित फ्लोरेन्सवरून आल्यावर तो या कामाला सुरुवात करेल.
हे झालं देवदत्तचं पण अजून एका गोष्टीचं कौतुक करायला पाहिजे ते म्हणजे फ्लोरेन्स डान्स सेंटरचं. अभिजात कला कशा हातात हात घालून चालतात त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे हे प्रदर्शन होय. कारण नृत्यासाठी प्रसिद्ध असणारी ही संस्था त्यावर आधारित चित्रनिर्मितीला प्राधान्य देते, त्यासाठी अमेरिका- युरोपमधून चित्रकारांची प्रदर्शनं स्पॉन्सर करते. त्यातून तयार होते ती बॅले नृत्यावरची अभिजात चित्रमालिका! व्हिज्युअल आर्ट आणि परफॉर्मिंग आर्ट यांचा परस्पर काही संबंध आहे असं या संस्थेला वाटतं. हा संबंध वृद्धिंगत व्हावा यासाठीच त्यांचे हे प्रयत्न. हे महत्त्वाचं नाही का? आपल्याकडे असं होईल का? हुसेनने जर 'इक्बाल' या चित्रपटावर काही पेंटिंग्ज काढली तर आपल्याकडे लगेच त्याच्या या उपक्रमाला त्यांची 'स्टंटबाजी' अशी प्रसिद्धी मीडियातून दिली जाते. आपल्याकडची मीडिया ( विशेषतः मराठी ) चित्रकलेच्या बाबतीत कधी साक्षर होणार?

असो, आजपर्यंत एकाही भारतीय चित्रकाराला अशाप्रकारच्या कामासाठी बहुमान मिळाला नाही. देवदत्तने महाराष्ट्राची नव्हे तर भारताचीही शान वाढवली आहे. आणि अशाप्रकारचे बहुमान आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याची किर्ती वाढवण्यास अजूनच मोलाचे ठरतील यात शंका नाही. मराठी मीडियाने देवदत्तची दखल आवर्जून घ्यायलाच पाहिजे असं काही नाही, कारण त्यांच्यासाठी आर्टिस्ट-बिर्टिस्ट काययै???

3 comments:

shirish mitbawkar said...

CHINHA EK MARATHI, SANSANIT NIRBHID PRATIKRIYA,
AANI ROJ, SADIVA, CHHAN
SHIRISH MITBAWKAR

Vaishwik Art Environment said...

good,good,good, very good.
Melody of dance in colors must seen. Sure in future

bhushan vaidya said...

देवदत्तला खूप खूप शुभेच्छा...!