
विशेष न्यायालयाने कसाबला मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली. यानंतर हा खटला अजून वरच्या कोर्टात लढला जाईल. तिथेही कदाचित वर्षानुवर्ष जातील. तोपर्यंत कसाबही म्हातारा होईल. आणि न जाणो भारत-पाकिस्तानमधले संबंध तेव्हाही सुधारले नाहीत ( तशी शक्यताही नाहीच ) तर कदाचित कसाब या दोन राष्ट्रांसाठी शांतीदूत म्हणूनही कार्य करेल. भारतासारख्या महान राष्ट्रात कसलीच शक्यता नाकारता येत नाही. असो, प्रस्तुत लेखाचा हा भाग नव्हे. 'चिन्ह' हे चित्र आणि दृश्यकलेला वाहिलेलं प्रकाशन. चित्रांसोबतच प्रकाशचित्रांचाही यात समावेश ओघाने आलाच. कसाबला पकडलं त्या रात्री अर्थात २६ नोव्हेंबर २००८च्या त्या काळरात्री जीवावर उदार होऊन अनेक प्रकाशचित्रकारांनी या सर्व घडामोडींचा पाठलाग केला होता. महाराष्ट्र टाईम्ससाठी काम करणारे शैलेश जाधव आमच्या मित्रांपैकी एक. बॉम्बे न्यूज फोटोग्राफर असोसिएशनने या सर्व प्रकाशचित्रकारांचा गौरव करण्यासाठी त्यांच्या प्रकाशचित्रांचं खास प्रदर्शन आयोजित केलं होतं. त्याच्या ब्रोशरच्या मुखपृष्ठासाठी शैलेश जाधव यांच्या वरील प्रकाशचित्राची निवड झाली होती. कसाबला सुनावलेल्या शिक्षेच्या निमित्ताने आम्ही शैलेश जाधव यांना त्या रात्रीचे अनुभव लिहायला सांगितले... ( २६/११ च्या घटनेचे शैलेश जाधव यांनी काढलेले आणखी काही फोटो पाहण्यासाठी क्लिक करा- http://picasaweb.google.com/115812695131756205142/26Nov2008# )
'चिन्ह'चा ब्लॉग सुरू झालाय, आपण मेट्रोजवळ अनुभवलेल्या त्या प्रसंगावर आणि तू काढलेल्या फोटोंवर काहीतरी लिही' असं कमलेशने मला सांगितलं. तसं लिखाण आणि माझा दूरदूरचा संबंध नाही. झेविअर्समध्ये मराठी पत्रकारितेचा कोर्स करताना जो काय संबंध आला तेवढाच. तो संबंधही प्रोफेशनल कॅमेरा हातात आल्यानंतर अगदी पारच तुटला. मग फोटोतूनच बोलणं व्हायचं. एवढीच काय ती माझी आणि लिखाणाची ओळख. असो तर मूळ विषयावर बोलुया...
२६ नोव्हेंबर २००८ ची ती रात्र. नीटशी वेळ आठवत नाही. मी माझं काम संपवून गिरगावात कमलेशच्या घरी आलो होतो. कशासाठी तेसुद्धा आठवत नाही. दोघंही टीव्ही बघत जेवत होतो तितक्यात प्रशांत चव्हाण ( छायाचित्रकार, सकाळ ) फोन आला की, 'सीएसटी स्टेशनमध्ये फायरिंग सुरू आहे, चेक कर आणि मला पण कळव.' चॅनेल बदलून 'स्टार माझा' लावलं. स्क्रीनवर ब्रेकिंग न्यूज म्हणून सीएसटी स्टेशनवर फायरिंग अशी बातमी येत होती. बाईक सोबत होती म्हणून मी कमलेशला म्हटलं की, 'पटकन पाहून येतो काय झालं ते.' तेवढ्यात तोसुद्धा म्हणाला की 'मी ही येतो.'
बाईक मेट्रोपाशी पोहोचली तेव्हा माणसांची तुरळक गर्दी आणि मोजके पोलीस. मेट्रोकडून सीएसटीकडे जाणा-या रस्त्यावर पोलीस त्यांची व्हॅन आडवी लावून उभे होते. पुढे कोणालाही सोडत नव्हते. पाल पिल्लई ( AFP ) आणि आर्को दत्ता ( Reuters ) हे दोघेजण मला झेविअर्सच्या विरुद्ध दिशेच्या फुटपाथवरून सीएसटीकडे जाताना दिसले. पण माझी त्यांच्यामागून जाण्याची हिंमत होत नव्हती. लिओपोल्ड हॉटेल आणि ओबेरॉयमध्येसुद्धा फायरिंग झाली अशी कुजबूज मोजक्या लोकांमध्ये होत होती. चेतन काशिकर ( TV 9 ) याला कुठूनतरी या दोन बातम्या पक्क्या आहेत असं कळलं.
लिओपोल्ड कॅफेकडे पोहोचलो. कॅफेच्या बाहेर उभ्या असलेल्या टाटा सफारीच्या मागच्या काचेवर गोळ्यांचे निशाण दिसत होते. कॅफेचं शटर अर्धवट बंद केलं होतं, आतलं नीटसं दिसत नव्हतं पण अस्वस्थता जाणवत होती. कॅफेच्या बाहेरच्या काचेवर गोळ्या आरपार गेल्याच्या तीन-चार खुणा होत्या. कॅफेबाहेर एक पोलीस आवारात पडलेल्या बुलेट्सला गोल करून खुणा करत होता. खडूने केलेल्या अंदाजे २५ ते ३० गोल खुणा मला दिसल्या. तिकडून निघून आम्ही ओबेरॉय हॉटेलपाशी पोहोचलो. हॉटेलच्या इमारतीपासून ब-याच अंतरावर पोलीस आणि फायरब्रिगेडच्या गाड्या उभ्या होत्या. तिकडचे दोन तीन फोटो घेऊन आम्ही निघालो.
वाटेतच मेट्रोजवळ ब्लास्ट झालाय असं कळलं. मेट्रोकडे आलो तर तसं काही नव्हतं. इकडे माझे सगळे भाऊबंद होते. इम्तियाझ, विनम्र, हेमंत, मुकेश त्रिवेदी असे बरेच. प्रत्येकाच्या हातात त्याचं त्याचं हत्यार अर्थात कॅमेरा. मेट्रोपाशी अनेक टीव्ही चॅनेलवाल्यांचाही गराडा होता. सगळ्यांच्या नजरा कामा हॉस्पिटलजवळ रोखलेल्या होत्या. प्रत्येकाचे फोन खणखणत होते, आणि दर सेकंदाला नवीनच काहीतरी कळत होतं. खरं की अफवा याची शहानिशा करण्यासाठी वेळ घ्यावा तितक्यात गोळ्यांचे आवाज सणाणत यायचे. हळूहळू गोळ्यांचे आवाज आणखी जवळून येऊ लागले. दिवाळीत फटाके फुटल्यावर कसा येतो फटाक् फटाक् अगदी तसाच इको साऊंड... आवाज जवळ जवळ येतोय हे जाणवत होतं तरीसुद्धा आम्ही सर्व उभे होतो. काही क्षणातच पोलिसांची एक क्वालिस मेट्रोच्या दिशेने येताना दिसली. गोळीबार होत होता, कोणत्या दिशेने ते कोणास ठाऊक, आवाजाकडे रोखून पाहण्याची हिंमत होत नव्हती. तेवढ्यात कोणीतरी ओरडलं की लेटो लेटो, लेट जाव... आणि सगळे रस्त्यावर झोपले. गाडीने मेट्रोचा कॉर्नर गाठेपर्यंत काहीच कळत नव्हतं. कॉर्नरला मला गाडी दिसली. मी कॅमेरा क्लिकही केला, पण फोटो ब्लर झाला होता. पोलिसांच्या गाडीतून गोळीबार का होतोय हे कोणालाच कळत नव्हतं. मेट्रो कॉर्नरकडे मी गाडी व्यवस्थित पाहिली. गाडीचा पुढचा टायर फाटला होता. मधल्या अर्धवट उघडलेल्या खिडकीतून पोलिसांची लांब नळीची बंदूक असतेना, तशीच एक बंदूक अंधाधुंद गोळीबार करत होती.
गाडी मेट्रोकडून गोल मशिदीच्या दिशेने गेली. गाडीच्या पाठोपाठ पोलिसांची अजून एक क्वालिस गेली. त्यावेळी मला कोणती ताकद आली ते माहीत नाही पण मी मेट्रोकडे पळत सुटलो. सर्वात पहिला इम्तियाझ ( उर्दू टाईम्सचा छायाचित्रकार ) माझी बाईक व त्याची रिपोर्टर घेऊन त्या दोन गाड्यांपाठी पळाला. त्यापाठोपाठ मी व विनम्र आचरेकर ( छायाचित्रकार, प्रहार ) त्याच्या बाईकवर निघालो. पण आम्ही मरीन लाईन्सजवळच्या त्या गोल मशिदीजवळ पोहोचेपर्यंत आम्हाला त्या गाड्यांची दिशाच कळली नाही. गाड्या गेल्या विधानभवनाकडे व आम्ही गेलो चर्नीरोडकडे. चर्नीरोडकडे कच-याचा मोठा डबा असलेली गाडी उभी होती. आम्ही त्या माणसाला विचारले की 'इधरसे पोलीस का दो व्हॅन गया क्या?' त्याने नाही सांगितलं, आम्ही परत राऊंड मारून मरीन लाईन्सच्या पुलाजवळून मेट्रोकडे येत होतो. मेट्रोकडे जाताना एक पारसी अग्यारी लागते त्या अग्यारीकडे कोणाला तरी मनसेच्या अँब्युलन्समध्ये टाकत होते. आम्ही मेट्रोकडे पोहोचलो तेव्हा कळलं की मघासच्या गोळीबारात माझ्या नेमक्या मागे असलेल्या व्हिडिओग्राफरला गोळी लागली होती. तेव्हा मी सुन्नच पडलो. आयुष्यात कधीच एवढा घाबरलो नव्हतो. पूर्ण विरघळून गेलो. तेवढ्यात पुढची बातमी कळली, की गिरगाव चौपाटीवर ब्लास्ट झालाय....
गिरगाव चौपाटीवर जाण्याचा धीरच होत नव्हता. मुकेश त्रिवेदी ( छायाचित्रकार, DNA ) आणि रितेश उत्तमचंदानी ( छायाचित्रकार, HT ) हे दोघं बाईकवरून पुढे गेले. त्यांच्यापाठून आम्ही सगळे. मी, प्रशांत चव्हाण ( छायाचित्रकार, सकाळ ) विनम्र आचरेकर ( छायाचित्रकार, प्रहार ) हेमंत पडवळकर ( छायाचित्रकार, HT ) आम्ही सुखसागर पुलाजवळ पोहोचलो त्याअगोदरच तिथला कार्यक्रम आटपला होता. एका अतिरेक्याचा तिथेच खातमा झाला होता, तर दुस-याला पोलिसांनी जखमी अवस्थेत पकडला होता ( हाच तो कसाब ) तिथे पोहोचल्यावर कळलं की करकरे आणि कामटे गेले, या बातमीने पोलीसही पुरते हबकले होते. तिथून परत निघालो, मनाने एवढे घाबरलो होतो की चर्नीरोड आणि सैफी हॉस्पिटलच्या मधल्या रस्त्याने जाताना समोरून जी कुठलीपण गाडी यायची ती पाहून छाती दडपायची. गाडी जवळ आली की आम्ही बाईकवर अक्षरशः खाली वाकायचो. पोलिसांची गाडी दिसली तर आणखी भीती वाटायची, कारण अतिरेकी पोलिसांच्याच गाडीतून पळाले होते. त्या रस्त्यावरचा तो प्रवास कधीही विसरणार नाही.
जेजेच्या रस्त्यावरून सीएसटी स्टेशनला गेलो. तिथे दोन्ही मेटल डिटेक्टर आडवे पडले होते. सीएसटीच्या मागच्या बाजूला त्यावेळी पोलीस वगैरे कोणीच नव्हतं. तिथेही एके ४७च्या रिकाम्या पुंगळ्या पडल्या होत्या. टाईम्सच्या बाजूने पोलिसांची सुरक्षा होती. आम्ही सीएसटीच्या मुख्य प्रवेशद्वारातून आत शिरलो. जसं एकेक पाऊल आत पडत होतं तसतसं परिस्थितीतला भयानकपणा जाणवत होता. तिकीट विंडोच्या सगळ्या काचा फुटल्या होत्या, रक्ताचा सडा पडला होता. सीएसटीला नुकताच पहिल्या मजल्यावर कॅफेटेरिया बांधला होता. तिथे वर गेलो. तिथेही बुलेट्सचे मार्क्स होते. एका काचेतून गोळी आरपार गेली होती. काचेच्या छिद्रातून खाली पाहिलं. आणि तेव्हा वाटलं की खरंच त्यावेळेला इथे जे हजर होते त्यांनी नेमकं काय अनुभवलं असेल, गोळ्यांच्या फै-या झडत असताना त्यांनी स्वतःचा जीव कसा वाचवला असेल. आजुबाजूने गोळ्या सणाणून जात असताना, आजूबाजूच्यांपैकी जखमी होऊन कोसळलेले पाहताना त्यांच्याही पायातलं अवसान गळालं नसेल काय? पळून जाण्यासाठीचे त्राण त्यांनी कुठून गोळा केले असतील? त्या गोळीने त्या काचेला पाडलेलं ते छिद्र खूप काही बोलत होतं. ते छिद्र मुंबईकरांच्या हिंमतीलाच पडलं होतं.
( नंतर बॉम्बे न्यूज फोटोग्राफर असोसिएशनच्या प्रदर्शनाच्या ब्रोशरसाठी माझं हेच छायाचित्र निवडलं गेलं. त्याच्या निवडसमितीवर रजनशी काकडे ( AP ) आर्को दत्ता ( Reuters ) आणि विकास खोत ( Forbes ) हे विख्यात छायाचित्रकार होते. )
4 comments:
Photos tar mast aahet, aani anubhav vachyla miala. Pustak rupaat anubhav publish karava...
हाय नंदू,
तुझी ही प्रतिक्रिया मी शैलेशपर्यंत पोहोचवेनच, पण तो ते कितपत गंभीरपणे घेईल याची शंकाच आहे. पण तुला जर काही फोटोंवर लिहावसं वाटलं तर तू अवश्य लिही. मला माहितेय की तू एक उत्तम फोटोग्राफर आहेस. चिन्हचं प्रयोजन दृश्यकलेवरील लेखनाला उत्तेजन देणं हेच असल्यामुळे त्यासंदर्भातील तुझं लिखाण प्रसिद्ध करायला नक्कीच आवडेल.
धन्यवाद तुझ्या प्रतिक्रियेबद्दल.
Shailesh is my childhood friend... but his this exerience was awesome...this was really thriller nite. HATS OFF to you Babu (Sahilesh)& his friends. We are out of india but we can imagine that how much risk u all people taking jus to show people around the world what is the truth. I appriciate for ur courage. N i proudly saying that shailesh is my friend.
Abhijeet (Kuwait)- +965 9786 9424
good! Shailu!
Post a Comment