Monday, July 5, 2010

कालाबाजार : पार्ट ३ (आणि शेवटचा)


'चिन्ह'चा ब्लॉग आता खर्‍या अर्थाने सुरू झाला.
लेखिका कविता महाजन यांनी "निवडक चिन्ह" आणि 'चिन्ह अंक १२' यांच्यावर जे  त्यांच्या ब्लॉगवर लिहिलंय त्याच्या लिंक्स त्यांनी मला पाठवल्या होत्या. ते सारं मी पाहिलं, वाचलं अन् माझ्या लक्षात आलं की "अरेच्चा ! हे तर बरं माध्यम आहे ! इथे नक्कीच काहीतरी गंमत - गडबड करता येईल." तो पर्यंत मी या सार्‍या विश्वाशी जवळ जवळ  अनभिज्ञच होतो असं म्हणायला हरकत नाही. कविता महाजन यांच्या ब्लॉगमुळे या माध्यमाचा सारा आवाका माझ्या लक्षात आला. थॅंक्स टू कविता !
आणि मग पाहत गेलो - वाचत गेलो, वाचत गेलो - पाहत गेलो.
चिन्हचा ब्लॉग असावा ही इच्छा मग हळूहळू बळावतच गेली.
 

१ मे च्या 'महाराष्ट्र दिना'च्या मुहूर्तावर ब्लॉग सुरू करायचं ठरलं. आणि अक्षरश: दोन तीन दिवसातच  पाच ब्लॉग्जचा पसारा उभा राहिला. तो सुरू करताना, आधी ट्रायल म्हणून सुरू तर करूया नंतर काय घडतं, कसं घडतं, कोणत्या अडचणी येतात, काय काय अनुभव येतात ते पाहू आणि मग कालांतराने आपल्याला हवा तसा ब्लॉग सुरू करू असं आधीच ठरलं होतं.
त्या प्रमाणे १मेच्या मुहूर्तावर ब्लॉग सुरू झाला.
अत्यंत थोड्या वेळात ब्लॉग सुरू करणं हे धाडस होतं, पण ते करता आलं ते कमलेश देवरूखकर,प्रसाद चिटणीस, शीतल जोशी या सहकारी - मित्रांमुळेच. पण ब्लॉगवरून जाहीर आभार मानून मी त्यांच्या योगदानाचे मोल कमी करू इच्छित नाही.
 

ब्लॉग सुरू झाला आणि कलावर्तुळात एकच  धमाल उडाली.
विशेषत: कलाशिक्षणविश्व तर अक्षरश: हादरलंच.
आणि ते हादरायला हवंच होतं.
'चिन्ह'चा ब्लॉग सुरू करण्यामागचा पहिला मुख्य उद्देश हा असा पहिल्याच फटक्यात सफल झाला.
हे 'चिन्ह'वाले आधी वर्षातून एकदाच आणि अधून मधून वर्तमानपत्रातून छळत होते; आता मात्र रोजच छळणार या भयाने कलाशिक्षण क्षेत्रातील अनेकांच्या झोपाच उडाल्या आणि त्या रोजच उडाव्यात अशाच पद्धतीचं लेखन 'चिन्ह'च्या ब्लॉगवर सातत्याने प्रसिद्ध होत राहिलं. कधी नव्हे ती मंत्रालयातल्या तंत्रशिक्षण खात्यालाही जाग आली. विचारणा होऊ लागल्या, चौकशा होऊ लागल्या, कारवाई करण्याची भाषा होऊ लागली. कुंभकर्णालाही अखेर जाग आली आणि 'चिन्ह'ने पहिली फेरी तरी जिंकली.
 

'चिन्ह'च्या वार्षिक अंकातून हे सारं लिहिताना खूप त्रास व्हायचा. एकीकडे आपण गायतोंडे, भास्कर कुलकर्णी, प्रभाकर बरवे यांच्यासारख्या लेजंडसवर प्रचंड अभ्यास करून, संशोधन करून जे अंक प्रसिद्ध करतोय त्या अंकानी अभिजाततेचा एक विशिष्ट दर्जा गाठलाय तर दुसरीकडे आपण कलासंचालनालय, तंत्रशिक्षण खाते आणि जे.जे स्कूल ऑफ आर्टमधल्या हलकट माणसांवर प्रचंड त्वेषाने तुटून पडणारं लेखन प्रसिद्ध करतोय. या दोन्ही टोकांमधल्या दरीमधे अनेकदा लोंबकळल्यासारखं व्हायचं. 'चिन्ह'चे  सारेच अंक काळाच्या ओघात आजवर जसे टिकले तसे पुढेही टिकतील पण या कलाशिक्षण विषयक लेखनाचं काय? हा प्रश्न सातत्याने सतावत राहायचा. त्यावर उपाय म्हणून वृत्तपत्रातून लेखनास सुरूवात केली, बातम्या दिल्या पण माध्यमांच्या क्षेत्रातील विचित्र व्यवस्थेमुळे त्यावरही खूपच मर्यादा आहेत हे ही लक्षात आलं.
 

 त्यामुळेच 'चिन्ह'चा ब्लॉग सुरू झाला. आता लिहायलाही काही मर्यादा नाहीत अन् लिहिलेले प्रसिद्ध करायलाही. त्यामुळे सोमवार ते शुक्रवार आता आपण रोजच भेटणार आहोत. अधे मधे समजा चुकून - माकून किंवा तांत्रिक वगैरे अडचणीमुळे खंड पडलाच तर तो क्षणिक असेल हे नक्कीच समजा. पहिल्या टप्प्यात सुरू झालेल्या 'अवतरण चिन्ह', 'सु-चिन्ह', 'मान-चिन्ह' इत्यादी ब्लॉग्जचं प्रसारण तूर्त स्थगित करण्यात आलं आहे. त्यातील सर्वच मजकूर या एकाच ब्लॉगमध्ये देण्याचा प्रयत्न केला जाईल. आवश्यकता भासल्यासच ते ब्लॉग पुन्हा सुरू केले जातील. 'चिन्ह'चा इंग्रजी ब्लॉग मात्र लवकरच सुरू होणार आहे. ज्यात मुंबई-पुण्यातील सर्व प्रदर्शनांची माहिती दिली जाणार आहे तसेच कलाक्षेत्रातील महत्वाच्या बातम्याही. हा ब्लॉग बहुदा ऑगस्ट महिन्यात सुरू होईल. 'चिन्ह'चा आता तुम्ही जो ब्लॉग वाचता आहात तो ब्लॉग मात्र कलाक्षेत्राविषयांची सर्वच यच्चयावत माहिती तुम्हाला रोजच देईल याची खात्री बाळगा. तुम्हाला तो कसा वाटला ते कळवायला मात्र विसरू नका. कमेंटस् मधे जाऊन तुम्ही प्रतिक्रिया नोंदवू शकता किंवा इ-मेलही करू शकता. ते शक्य नसेल तर एस.एम.एस पाठवायला विसरू नका. आणि हो तुमच्याकडे जर काही खळबळजनक स्टोरी असेल तर आम्हाला बिनधास्त कळवा. कुणावर अन्याय होत आहे असं वाटत असेल तर तेही आम्हाला बिनधास्त कळवा. तुमचं नाव गुलदस्त्यातच ठेवलं जाईल याची खात्री बाळगा; किंवा तुम्हाला जर काही लिहावसं वाटत असेल तर केव्हाही तुमचं स्वागतच असेल. तुमच्या प्रतिक्रियेच्या प्रतिक्षेत.......
 
 

सतीश नाईक,
संपादक 'चिन्ह'  

1 comment:

'चिन्ह' said...

विकास नाईक यांनी चिन्हला इमेलवरून पाठवलेली ही प्रतिक्रिया-
Priya Satish

You are simply great, keep on doing great work