तर अशा या ट्रकमधून प्रचंड मोठ्या प्रमाणावर सामान कलासंचालनालयात उतरवलं गेलं. पार संध्याकाळपर्यंत हे सामान उतरवण्याचं काम चाललं होतं. लहानमोठे शेकडो खोके उतरवले गेले. गोडावूनमध्ये ठेवले गेले. दिवसभर जेजेच्या आवारात त्या खोक्यांमध्ये काय दडलं असेल याचीच चर्चा चालू होती.
कुणी म्हणालं: आर्ट मटेरियल आहे.
कुणी म्हणालं: फोटोग्राफीचं मटेरियल आहे
कुणी म्हणालं: कॉम्प्युटरचं सामान आहे
कुणी म्हणालं: परीक्षेला लागणारं सामान आहे
दिवसभर जेजेच्या विद्यार्थ्यांच्यात आणि शिक्षकांमध्ये हीच चर्चा चालू होती. सामान नेमकं काय आहे हे शेवटपर्यंत मात्र कुणाला काही कळलंच नाही. दोन-चार आगाऊ विद्यार्थ्यांनी आणि चौकस शिक्षकांनी शिपायांना विचारायचा प्रयत्न केला. पण हाती काही लागलं नाही.
एक आगाऊ शिपाई म्हणाला, 'काय म्हाईत न्हाई बा! साह्यबांनी ठेवून घ्यायला सांगितलं. आम्ही ठेवून घेतोय. ' वर आणखी 'पाणी घाल म्हटलं का पाणी घालायचं, लोंबतंय काय म्हणून विचारायचं नाही...' असं आपलं तत्वज्ञानही त्याने सांगितलं.
उन्हं उतरणीला लागताच त्या अवाढव्य ट्रकमधली सर्वात मोठी पाकिटं उतरवण्याचं काम सुरू झालं. एकेक पाकीट होतं पाच-पाच, दहा-दहा, पंधरा-पंधरा फुटांचं... त्याची रुंदी मात्र दीड-दोन फुटांची होती आणि जाडी चार-पाच किंवा सहा इंचाची. त्यातलं पहिलं बंडल घेऊन चार-पाच मजूर आत गेले पण पाच-दहा मिनिटात परत आले. 'आत हुबं -हात न्हाई' म्हणाले. त्यांचा आवाज ऐकून दस्तुरखुद्द साहेबच
जीना उतरून खाली आले. 'उभं -हात नसेल तर आडवं आत घाला न् ठेवा' म्हणाले. मजुरांनी साह्यबांकडे 'आपला प्रॉब्लेम कसा चुटकीसरशी सोडवला, आपल्या कसं ह्ये ध्यानी आलं न्हाई' अशा नजरेनं कौतुकाने बघीतलं आणि पुन्हा कामाला लागले. एकेक करीत त्यांनी अर्ध्या पाऊण तासात ती सर्व बंडलं आत टाकली आणि ट्रक निघून गेला.
जेजेचे शिक्षक आणि विद्यार्थी विचार करत राहिले एवढ्या लांबलचक बंडलामध्ये असेल तरी काय? आणि ही एवढी बंडलं कुणासाठी आणली असतील. काय चाललंय तरी काय? एका भोचक मास्तराला रहावलं नाही. तो उठला आणि सरळ जिथे ती बंडलं ठेवत होते तिथं गेला. त्याच्या सुदैवाने त्यातल्या एका बंडलाचा कोरोगेटेड पेपर त्याला फाटलेला दिसला आणि त्यातून डोकावत होती ती अॅल्युमिनियमची शिडी. न रहावून त्याने त्यातल्या एका मजूराला विचारलं की काय शिड्या-बिड्या आणल्या काय? तर तो बिचारा सकाळपासून माल उतरवून उतरवून थकलेला मजूर त्या मास्तरावर उचकलाच. म्हणाला, 'शिड्या-बिड्या न्हाईत. शिड्याच हायेत समद्या. बिड्या ह्या इथं ( पँटचा खिसा दाखवून ) खिशात हाईत दिऊ का एक?' ते उत्तर ऐकून तो मास्तर बिचारा उगाचच गोरा-मोरा झाला. थोबाडात मारल्यागत चेहरा करून कॅन्टीनमध्ये जाऊन बसला. त्याला काही सुचतच नव्हतं.
आत्ता आपण पाहिलं ते खरं होतं का, भास होता याचा विचार तो सारखा करत होता. त्याने आता ट्रकमधून उतरवलेली १५ फुटाची शिडी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिली होती. ती एक आणि एकच शिडी असती तर त्याला त्याचं काही वाटलं नसतं. पण इथे एक नाही, दोन नाही, चक्क २०- २५ किंवा त्याहुनही जास्त शिड्या? कशासाठी? कुणी मागवल्या? त्याचा काय उपयोग होणार आहे? असे एक ना दोन शेकडो प्रश्न त्याच्या डोक्यात थैमान घालू लागले. हे सारं कुणाला तरी सांगावं असं त्याला वाटू लागलं म्हणून सहकारी शिक्षकांना त्याने फोन लावले तर त्यांचे फोन स्वीच ऑफ. ( हल्ली साडेतीन वाजता कॉलेज सुटल्यावर बहुसंख्य शिक्षक आपले फोन स्वीच ऑफ करतात उगाच कुणा पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर द्यावं लागू नये म्हणून ) शेवटी कंटाळून तो उठला आणि ट्रेनमध्ये जाऊन बसला. घरी जाण्यासाठी. पण घरी गेल्यावरही त्या अॅल्युमिनियमच्या शिड्या त्याचा पिच्छा सोडेनात. रात्री झोपेतसुद्धा त्याला त्या अॅल्युमिनियमच्या २०- २५ शिड्या आपल्याभोवती फेर धरून नाचतायत असा भास होऊ लागला.
( काय होतं जेजेत मागवलेल्या त्या शिड्यांचं रहस्य? वाचा उद्याच्या ब्लॉगमध्ये )
1 comment:
ओ चिण्णवा्ले तुमी असकस म्हंता शिडी आनि cd काय यकच ना?
राहिला प्रश्न नागपुरचा माझी प्रामाणिक सूचना आहे नामांतर करा- जे जे स्कूल ओफ़ नागपुर (मुंबई शाखा)आणि पुढ्मागे आणखी काही घडामोडी झाल्याच तर आपण म्हणू जे फॉर जमशेटजी नाय जे फॉर जिंदाल!
Post a Comment