Wednesday, July 7, 2010

CD का शिडी? ( भाग २ )

दुस-या दिवशी स्टाफरुममध्ये त्याने आपल्या सहकारी शिक्षकांना शिड्यांचा तो किस्सा सांगितला. तर कुणाचा विश्वास बसेना. तू काहीतरी चुकीचं पाहिलं असेल वगैरे सारेच त्याला दोष देऊ लागले. त्यावर तो जाम चिडला तेव्हा एकेक मास्तर गुपचुप खाली जाऊन गोडावूनला भेट देऊन आले. तर त्यांनाही त्या शिड्या दिसल्या. त्यांची सा-यांचीच मती आता गुंग झाली.

एकजण म्हणाला, 'अरे फोटोग्राफीसाठी मागवल्या असतील?'
तर हा म्हणाला, 'पण एवढ्या?' तर तो दुसरा मास्तर गप्पच झाला.
मग ह्याला चेव आला. म्हणाला, 'अरे आपल्या प्रत्येक मजल्याची उंचीच मुळी १० फुटाची आहे. तिथे या १५-१५ फुटाच्या शिड्या लावायच्या तरी कशा?'
यावर सर्वच मास्तर गपगार झाले.
मग ह्याला जास्तच चेव चढला.
तो म्हणाला, नागपूर काय? औरंगाबाद काय किंवा आपलं क़ॉलेज काय? सर्वांच्याच मजल्यांची उंची १० फुटांपेक्षा जास्त नाही. मग या शिड्या
लावणार तरी कुठे?
तर एक मास्तर म्हणाला, अरे स्कूल ऑफ आर्टच्या असतील. तिकडे चांगले २०-२० फुटाचे मजले आहेत.
त्यावर या मास्तराचा प्रश्न होता की अरे पण एवढ्या?
कचरा काढायसाठी असतील तर एखादी शिडी पुरे आहे. चित्र टांगायची असतील तर त्यातली १० फुटाची एक शिडी पुरे आहे. पण या एवढ्या २०-२५ किंवा ३०-४० शिड्या कशासाठी???

या प्रश्नावर मात्र सर्वच मास्तरमंडळी मूक झाली. कुणाकडेच काही उत्तर नव्हतं. मग प्रसंगाचा ताण हलका व्हावा म्हणून तिथले एक मास्तर तिथल्या अधिष्ठात्यांच्या आवाजाची नक्कल करत म्हणाले,'का वो घोडा है का त्यात?'
त्यावर एकच हशा पिकला.
त्यावर हा मास्तरही हसत हसत अधिष्ठात्याच्या आवाजाची नक्कल करीत म्हणाला, 'एकच नाही अनेक घोडे हैत. आनि चांगले अॅल्युमिनिअमचे हैत. बोला लावू का आयमीन आणू का?' त्यावर मग आणखी मोठा हशा पिकला.
आता प्रसंगातला ताण जरा हलका झाला होता. मग सगळ्यांनाच विनोद करण्याची हौस आली.

एक मास्तर म्हणाला...
'आता जेजे स्कूल ऑफ आर्टची दोन्ही कॉलेजं बंद केली जाणार आहेत. आणि तिथे सर्कस प्रशिक्षण केंद्र काढण्याची योजना आखली आहे. त्या योजनेनुसार या शिड्या इथे आल्या आहेत. जेजेमधल्या सर्व झाडांना त्या बांधल्या जाणार आहेत आणि ट्रॅपिझचे प्रशिक्षण आपल्या सर्वांना तिथे दिले जाणार आहे.' या प्रशिक्षणानंतर फावल्या वेळात आपण सर्कसमधल्या जनावरांना प्रशिक्षण देण्याचीही योजना आहे.' यावर सर्वच मास्तर मोठ्याने चेकाळल्यासारखे हसले.

मग दुस-या मास्तरांचीही प्रतिभा जागृत झाली. ते म्हणाले.
'आपल्या इकडचे मास्तर फर्स्ट क्लास फर्स्ट येणा-या मुलांनाही कॉलेज अंतर्गत परीक्षेत नापास करतात. म्हणून आपल्या कॉलेजच्या इमारतीच्या प्रत्येक मजल्यावरच्या छतांना भोकं पाडून तिथं या शिड्या बसवल्या जाणार आहेत. म्हणजे परीक्षेबिरीक्षेची भानगडच नाही. मुलांना थेट पहिल्या वर्षातून दुस-या वर्षात दुस-यातून तिस-या वर्षात तिस-या वर्षातून चौथ्या आणि चौथ्यातून पाचव्या वर्षात जाता येईल. पहिल्या वर्षाचा वर्ग पहिल्या मजल्यावर, दुस-या वर्षाचा वर्ग दुस-या मजल्यावर, तिस-या वर्षाचा वर्ग तिस-या मजल्यावर, चौथ्याचे आणि पाचव्याचेही तसेच. शिडीवरून वरच्या मजल्यावर गेला की पास. परीक्षेची भानगडच नाही.'
ही ब्लॅक कॉमेडी उपस्थित मास्तरांना भलतीच आवडली. पण कुणी ऐकेल आणि आपल्या विरोधात पत्रक काढेल म्हणून ते दबक्या आवाजात हसून त्या दुस-या मास्तरांना दाद देऊ लागले.

तिसरे मास्तरही काही कमी नव्हतेच. त्यांचीही प्रतिभा हे सारं ऐकून जागृत झालीच.
ते म्हणाले...
'या सा-या शिड्या फोटोग्राफीच्या आहेत. एरियल फोटोग्राफीला सध्या बरे दिवस आले आहेत ना! आपल्या कॉलेजच्या माजी विद्यार्थ्याच्या एरियल फोटोग्राफीची पुस्तकं भराभर खपतायत ना. म्हणून आपल्या अधिष्ठाता साहेबांनीच खास या विद्यार्थ्यांसाठी शिड्या मागवल्या आहेत. हेलिकॉप्टर, विमान घेणे शासनाला शक्य नाही, म्हणून त्यांनी शासनाला प्रपोजल दिले होते. त्यात हेलिकॉप्टर आणि विमानांना अॅल्युमिनियम शिड्यांचे पर्याय दिले होते. हेलिकॉप्टर वा विमान काय किंवा शिड्या काय दोन्ही तर शेवटी अॅल्युमिनियमच्या वापरातून तयार होतात ना!' त्यामुळे विद्यार्थ्यांनी आधी ५ फुटाच्या शिडीवरून फोटोग्राफी करावी, त्यात तो निष्णात झाला की ८ फुटाच्या शिडीवर त्याला चढवावे. ते झाले की मग १०, १२, आणि शेवटी मग १५ फुटाच्या शिडीवरून त्याला एरियल फोटोग्राफी करता येईल. अधिक उंचीवरून त्याला एरियल व्ह्यू मिळावा म्हणून स्नॉर्केल शिड्याही मागवल्या आहेत. पण मुंबईत सध्या बिल्डिंग इंडस्ट्रीमध्ये त्या शिड्यांना जास्त डिमांड असल्याने त्या आल्या नाहीत. थोड्या दिवसाने त्याही येतील आणि मग विद्यार्थ्यांना अगदी उद्धवच्या फोटोग्राफीसारखीच फोटोग्राफी करता येईल.... हा विनोदही सर्वच मास्तरांना भयंकर आवडला होता. मोकळेपणाने हसून दाद द्यावीशी वाटत होती. पण आजुबाजूला बघत सर्वांनीच तो मोह आवरला.

भाग तिसरा आणि अंतिम वाचा उद्याच्या ब्लॉगमध्ये

No comments: