Thursday, July 8, 2010

CD का शिडी? ( भाग ३ )

इतक्यात नागपूरचे एक कलाशिक्षक तिथे अवतरले. नागपूरचे म्हणजे शासकीय कलामहाविद्यालय, नागपूर येथे शिकवणारे.
(मुंबईच्या कलाशिक्षकांचा दर्जा कलासंचालनालयाच्यामते इतका उतरलाय की हल्ली हगल्या-मुतल्याला संचालनालयवाल्यांना नागपूरचेच कलाशिक्षक लागतात.
काही काही जण तर चार चार- सहा सहा महिने हल्ली मुंबईत तळ ठोकून असतात म्हणे. मग त्याचा प्रवास खर्च, रहाण्याचा खर्च, जेवण खावण, मानधन वगैरे
सोपस्कार कलासंचालनालयवालेच पाळतात म्हणे.
काही नागपूरकर शिक्षकांचं वर्चस्व तर एवढं वाढलंय की त्याना त्या विषयातलं ओ की ठो जरी कळत नसलं तरी विशेष तज्ज्ञ म्हणून बोलवलं. असो)

हे शिक्षक मात्र त्यातले नव्हते. विरूद्ध बाजूचे होते. म्हणजे अतृप्त आत्मे वगैरे...
"काऊन बे शिडीहून पडल्यासारखे का बे तुमचे थोबडे जाले?" आल्या आल्या नागपूरकर शिक्षकांनी मुंबईकर शिक्षकांवर बॉम्बच टाकला.
आपलं सगळं संभाषण यांनी ऐकलं की काय या भितीने मुंबईकर शिक्षकांचे चेहेरे पांढरेफटक पडले.
ते नागपूरकर शिक्षक पुढे म्हणाले," घाबरू नका पोट्टेहो, घाबरू नका. कलासंचालनालयात शिड्या आल्यात ते कालच मला गाडीत कळलं. मुंबई - नागपूर ही लाईनच आहे आमची.
इकडं जरा जरी खुट्ट झालं की तिकडं आम्हाला कळलंच म्हणून समजा. त्या शिड्या कशा आल्यात ते तुम्हाला कळलं का?"

"नाही बुवा, तेच तर आम्ही एकमेकांना विचारत होतो. हो ना!...."
"कशा आल्यात ते मी सांगतो" असं म्हणून त्यांनी जे सांगितलं तेच आता तुम्हाला सांगतो. खरं का खोटं ते आता तुम्हीच ठरवा. खोटं वाटलं तर झोंबाडे सायबांना विचारा नाहीतर, थेट सेक्रेटरी पाठकसाहेबांना विचारा.....
ते म्हणाले,

"कलासंचालनालयात चारही कलामहाविद्यालयासाठी कलासाहित्याची यादी पाठवली गेली. त्यात ‘सीडी’ची मागणी नोंदवली गेली. सीडी म्हणजे कंप्युटरला लागणार्‍या ‘सीडी’,
त्याच गोल गोल रेकॉर्डसारख्या चकचकीत ‘सीडीज्’. पण ती मागणी नोंदवणारा अधिकारी (ज्याला येम.फी.येश.ने निवडला) त्याला सीडी हा साधा शब्दही लिहिता आला नाही.
 त्याने CD किंवा ‘सीडी’ असे न लिहिता ‘शिडी’ असे लिहिले आणि एक फूट बाय एक फूट आकारांचे खोक्यांऐवजी ५ फूटापासून ते १५ फूटांपर्यतच्या अॅल्युमिनियमच्या शिड्याच
कलासंचालनालयात अवतरल्या, आहे की नाही गंमत आता बोला!"

नागपूरकर शिक्षकांनी आता बोला असं म्हणून टाळी घेण्यासाठी हात पुढे केला पण टाळी देण्यासाठी तिथं होतंच कोण?
सारे मुंबईकर शिक्षक कधीच पसार झाले होते.....

No comments: