Friday, July 9, 2010

CD का शिडी? ( भाग ४ )

खरंच असं घडलं असेल का?
काहीच सांगता येत नाही.
कलासंचालनालयात काहीही घडू शकतं.
घडलं असो वा नसो त्या शिड्या कलासंचालनालयात अद्यापी पडलेल्या आहेत ही मात्र वस्तुस्थिती आहे. त्या तिथं आल्याला आता चार-सहा महिने नक्कीच झाले असावेत. त्यातली एक नागपुरला पाठवण्यात आली. १५ फुटाची ती लांबलचक शिडी कशीबशी ट्रकमध्ये कोंबून बसवण्यात आली.

उरलेल्या वीस शिड्या ( आणि घोडेही ) झोंबाडे साहेब आपला कधी उद्धार करतील याची वाट पाहत जेजे आर्ट गॅलरीमध्ये पडल्या आहेत. कुणी म्हणतं त्या वीस नाहीत पंचवीस आहेत. कुणी म्हणतं त्या पंचवीस नाहीत तीस आहेत. तर कुणी छातीठोकपणे सांगतं त्या पंचवीस-तीस नाहीत चाळीस आहेत. खरं खोटं झोंबाडेसाहेबांनाच ठाऊक!
बरं आपण झोंबाडेसाहेबांना काही विचारावं तर म्हणतात ,'मला नाही ठाऊक' बरं आपण त्यावर काही खरमरीतपणे लिहावं तर ह.भ.प.झोंबाडे महाराज सांगतात, 'लिहिणा-याकडे लक्ष देऊ नये. लिहिले ते वाचू नये, ब्लॉग वगैरे असेल तर त्याच्या अजिबातच नादी लागू नये. आपण आपले कर्म करीत रहावे.'

व्वा! व्वा! अवघ्या दोन ओऴीत उपकलासंचालक झोंबाडे महाराजांनी आपल्या अल्पावधीत मिळवलेल्या यशाचे आणि जीवनाचे तत्त्वज्ञानच सांगितले आहे. क्या बात है! वाचकहो अगदी एकमुखाने बोला झोंबाडेsss महाराजssss की जयssss

शिड्यांच्या कलासंचालनालयातील अस्तित्वामुळे जेजेच्या दोन्ही कलामहाविद्यालयातील जागरुक विद्यार्थ्यांना ( जे अगदी थोडेच आहेत ) आणि जेजेच्या दोन्ही व नागपूर औरंगाबादच्या प्रत्येकी एकेक कलामहाविद्यालयातील संवेदनशील शिक्षकांना ( जे अगदीच अल्प आहेत ) जे 'शिडशिडीत' प्रश्न गेले अनेक दिवस अस्वस्थ करीत आहेत त्यांची उत्तरे आता झोंबाडे महाराजांनी द्यावीत, अशी नम्र विनंती आहे. नाही, नाही, नाही, नाही घाबरून जायचं काहीच कारण नाही. झोंबाडे महाराज अजिबात घाबरून जायचं काम नाही.
कुणीही तुमच्या केसालाही धक्का लावण्याचं धाडस करणार नाही! या अख्ख्या महाराष्ट्राच्या प्रशासनात कुणाची माय व्यालीय जो तुमच्यावर कारवाईची भाषा करील?

कलासंचालनालयात अवतरल्यावर गेल्या १० – १२ वर्षात किंवा फार फार तर १५ वर्षात तुम्ही जे एवढे घोळ घातलेत त्यावर कुणी तरी तुमच्यावर कारवाईची भाषा केली काय? निदान रागावलं तरी काय? मंत्रालयातल्या सार्‍या सचिवांना तुम्ही पुरून उरलात. तर मग आता आलेले (???????) हे टिकोजीराव सचिव कोण मोठे लागून गेले की जे तुमच्यावर कारवाई करतील?

कलासंचालनालयाच्या सचिव येण्यापूर्वी तुम्ही जे.जे. उद्योग – लघुउद्योग ????? (ती सेवाही सरकारीच) केलेत त्या विषयी एका शब्दाने तरी तुम्हाला मुंबैत कुणी विचारलं का? निदान उल्लेख तरी कुणी केला का? सगळ्यांना तुम्ही पुरून उरलातच ना? तर मग आताच हे असं उगाच कुणाला तरी भिऊन ???? रहाताय? विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्या आणि त्यांची थोबाडं बंद करून टाका.

तुम्ही ज्यांच्या खुर्चीवर विराजमान झालात त्या तुमच्या आधीच उपसंचालकांवर वसंतराव रसाळसाहेबांनवर त्यांच्या सेवानिवृत्तीच्या दिवशीच नेमकी निलंबनाची कारवाई केली. आमच्या अचरट पेपरवाल्यांनी त्यांच्या या एवढ्या मोठ-मोठ्या ज्या बातम्या केल्या, पण पुढं काय झालं? काहीच नाही. रसाळसाहेब सेवानिवृत्तीनंतरचं आयुष्य मोठ्या सुखा-समाधानात जगतायत. खोटं नाही सांगत अगदी खरं खरं सांगतोय. पाहिजेत तर सोबतचा पुरावा पहा. हा कलासंचालनालयातील अधिकारी आणि शिक्षक वर्गाची सेवाज्येष्ठता यादी आहे. यादी नीट पहा. पहा वसंतराव रसाळसाहेबांवर काय लिहिलं आहे ते ‘सेवानिवृत्त’. म्हणजे नियत वयोमानानुसार ते सेवानिवृत्त झाले! त्यांना सेवेच्या शेवटच्या दिवशी निलंबीत केले वगैरे बातम्या त्या अचरट पेपरवाल्यांनी छापल्या, पण खरे तर तसं काहीच झालं नव्हतं. होता तो सर्व अचरट पेपरवाल्याचा फक्त कल्पनाविलास. खरी गोष्ट हीच की वसंतराव रसाळसाहेब नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. आहे की नाही गंमत? आता ही गंमत तुम्हाला आमच्या आधी ठाऊक असणारच म्हणा. पण मग तरी पण उगाचच घाबरल्या सारखं का वो करता?

त्या आयवल्यांच उदाहरण तुम्हाला ठाऊक का नाही? आयवले म्हणजे तेच ते लक्ष्मणराव आयवलेसाहेब जे आधी मेटलक्राफ्टचे (म्हणे) प्राध्यापक होते. मग म्हणे कला व हस्तकला विभागाचे विभागप्रमुख झाले. आणि मग एक जे जे स्कूल ऑफ आर्टचे (हंगामी का होईना) अधिष्ठाता झाले आणि अवघ्या सहा महिन्यात महाराष्ट्राच्या कलासंचालकाच्या खुर्चीवरही जे वसले तेच ते. त्यांच काय झालं? काहीच नाही झालं. महाराष्ट्र शासनातर्फे शेतकर्‍यांना दिल्या गेलेल्या सुवर्णपदकाच्या घडवणूकीत घपला केला म्हणून त्या वाहिन्यावाल्यांनी आणि पेपरवाल्यांनी बोंब घातली, त्यांनी बोंब घातली म्हणून आमदारांनी विधानसभेत ओरड घातली आणि त्या विचार्‍या आयवलेसायबांना निलंबीत व्हावं लागलं ना? पण पुढे त्यांचं कुठं काय वाकडं झालं? फक्त निलंबीत झाले आणि वेळीत आरोप न लावल्यामुळे (हे ही ठरवूनच झालं. मी मारल्यासारखं करतो तू रडल्यासारखं कर) आयवले सायबांना आता शासनाला जवळ जवळ मासिक ६० हजार रू. इतका पगार अगदी घरपोच द्यावा लागतोय. ट्रॅव्हलींग अलाउन्स रूपये १६०० का फक्त १७०० फक्त कापतात, बाकी सारा पगार त्यांना घरपोच मिळतो. आता १६००-१७०० रूपये तरी शासनाने का कापायचे? तो ही खरं तर त्यांना द्यायला पाहिजे. असा अन्याय बिचार्‍या आयवलेवर करणं योग्य आहे का? पण आम्हाला खात्री आहे की योग्य वेळ येताच म्हणजे येत्या एप्रिलमध्ये ते जेव्हा सेवानिवृत्ती होतील तेव्हा तंत्रशिक्षण खात्यातली ‘त्यांची माणसं त्यांचं निलंबन नक्कीच कायदोपत्री रद्द करून टाकतील आणि मानाने नियत वयोमानाने सेवानिवृत्त झाल्याचे जाहीर करतील आणि वसंतराव रसाळ साहेब त्यांच्यावर झालेला अन्यायही दूर करतील.

तेव्हा झोंबाडे महाराज घाबरायचं काही कारण नाही. हे शासन आपलंच आहे. कुणीच तुमचं काही वाकडं करू शकणार नाही याची खात्री बाळगा आणि विचारलेल्या प्रश्नांची फटाफट उत्तर देऊन मोकळे व्हा.

झोंबाडेसायबांना विचारलेले हे प्रश्न वाचा उद्याच्या ब्लॉगमध्ये

No comments: