Sunday, November 21, 2010



पृथ्वीराज, या ‘गझनींना’ आता संपवा!     

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना अनावृत्त पत्र 

माननीय 
श्री. पृथ्वीराज चव्हाण
मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
यांस

विषय :
‘सर जे जे स्कूल ऑफ आर्ट’ या केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण आशिया खंडात गौरवशाली ठरलेल्या १५० वर्ष जुन्या कलाशिक्षण संस्थेत, तसेच श्री. यशवंतराव चव्हाण यांच्या संकल्पनेतून स्थापन झालेल्या आणि स्वतंत्र भारतात अद्यापही एकमेव ठरलेल्या ‘कला संचालनालय’, महाराष्ट्र राज्य, या विभागात गेल्या २५ वर्षात झालेल्या भयंकर भ्रष्टाचारामुळे महाराष्ट्राच्या वैभवशाली कलाशिक्षणाच्या झालेल्या वाताहतीकडे आपलं लक्ष वेधावं यासाठी हे पत्र.

स. न. वि. वि.
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर झालेल्या आपल्या नेमणुकीमुळेच नव्या उमेदीनं आणि मोठ्या आशेनं हे अनावृत्त पत्र लिहिण्यास प्रवृत्त झालो आहे.  ‘नव्या उमेदीनं आणि मोठ्या आशेनं’ हे शब्द अशासाठी वापरले की गेल्या २५ वर्षात आपल्या आणि आपल्या पक्षाच्या मित्रपक्षानं ज्या पद्धतीनं महाराष्ट्राचा राज्यकारभार हाकला तो पाहता ‘आता काही बरं होईल’ असं वाटण्याची महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेची उमेदच संपूर्णत: नष्ट झाली होती. कशामुळे, कुणामुळे हे सारं झालं ते आपणास ठाऊकच आहे. मुख्यमंत्रीपदावर विराजमान होताच आपण ज्या मुलाखती वृत्तपत्र आणि वाहिन्यांना दिल्या आहेत, ज्यातल्या एका मुलाखतीत आपण राजकारण्यांना उद्देशून ‘घृणा’ हा जो शब्द वापरलात त्यावरून याचा प्रत्यय आलाच. पण जे आपणास ठाऊक असण्याची सुतराम शक्यता नाही अशा गोष्टींकडे मी आपलं लक्ष वेधून घेऊ इच्छितो आहे.

आता हे असं अनावृत्त पत्र लिहिणारा ‘हा कोण’ असा प्रश्न जर आपणास पडला असेल तर त्या सर्वच प्रश्नांची उत्तरं याच ब्लॉगवर अन्यत्र अथवा ‘चिन्ह’च्या संकेतस्थळावरही मिळू शकतील. पण खरं सांगायचं तर ते फारसं महत्त्वाचं नाहीये. कारण मी जे मांडतोतेच महाराष्ट्राच्या कलाशिक्षणाच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे आणि म्हणूनच त्यात आपला अमूल्य वेळ न दवडता थेट मुद्द्यालाच हात घालतो.

सर,
१५० वर्षाची परंपरा लाभलेलं आणि ९० टक्के भारतीय चित्रकारांचं मातृस्थान असलेलं ‘सर जे जे स्कूल ऑफ आर्ट’, तसेच अद्यापही भारतातलं एकमेव ठरलेलं कलासंचालनालय आणि संपूर्ण भारतात मानाची परंपरा लाभलेलं महाराष्ट्राचं कलाशिक्षण या सार्‍यांची गेल्या २५ वर्षांच्या कालखंडात आघाडी सरकारनं अक्षरश: धूळदाण करून टाकली आहे. यात साडे चार वर्षांचा युतीचा कालखंडही आलाच! किंबहुना त्यांनीच विविध क्षेत्रात ही वाताहत कशी करावी याचे धडे आघाडीवाल्यांना दिले आणि नंतरच्या काळात आघाडीनं ते पद्धतशीरपणे गिरवले. इतके की त्यातून महाराष्ट्रातील तान्ही बाळंसुद्धा सुटली नाहीत. ती जे दूध पितात त्यातसुद्धा रसायनांची भेसळ करावयास त्यांनी मागं पुढं पाहिलं नाही..

पैशाच्या मोहापायी जिथं त्यांनी महाराष्ट्राच्या भावी पिढ्यांना रासायनिक विषारी दूध प्यायला लावून सर्वच पातळ्यांवर महाराष्ट्राला शरमेनं मान खाली घालायची पाळी आणली; तिथं महाराष्ट्राच्या कलाशिक्षणक्षेत्राची त्यांनी काय पत्रास ठेवली असेल?

- त्यांनी जेजेत सेवानिवृत्त आय.ए.एस. अधिकार्‍यांसाठी गगनचुंबी निवासी इमारत उभारावयाचा घाट घातला होता.(त्यातल्या दोन व्यक्तिंपैकी एका व्यक्तिनं आपल्या मुलाच्या नावे ‘आदर्श’मधला फ्लॅट लाटलाच. तर दुसरी व्यक्ती मात्र ‘आदर्श’ फ्लॅट लाटण्यात अपयशी ठरली. या दोन्ही व्यक्ती जेजेचं प्रशासन पाहणार्‍या तंत्रशिक्षणखात्याच्या ‘सचिव’ म्हणून काम पाहत होत्या आणि या दोन्ही व्यक्ती महिला सचिव निघाव्यात यावरून महाराष्ट्राचं प्रशासन किती रसातळाला गेलं आहे याची आपणास चांगलीच कल्पना यावी. त्या अधिकार्‍यांची नाव मी घेऊ इच्छित नाही. पण त्यातल्या एकीस आपण सहज ओळखू शकाल. आपल्या आबासाहेब पाटलांचं, म्हणजे आर. आर. हो, संपूर्ण भारतखंडात प्रसिद्ध असलेलं जे वाक्य आहे, हो.. हो.. तेच तेच ‘ऎशे बडे महानगरोमे ऎशे छोटे मोटे हादसे होते है’ हा डायलॉग जेव्हा अमिताभच्या शैलीत आबांनी पत्रकारांवर फेकला तेव्हा त्यांच्यामागे जी व्यक्ती अत्यंत मख्खपणे बसली होती ना तीच तीच. आपलं नशीब बलवत्तर आहे. आपल्या सुदैवानंच यातली एक आपण येण्याआधीच पायउतार झाली आहे, तर दुसरी आपल्या आगमनाच्या मागं पुढं पायउतार होत आहे. कंसात कंस (ओळखा पाहू ती कोण?) ओळखणार्‍याला एक ‘आदर्श’ फ्लॅट बक्षीस!)

- त्यांनी १५० वर्षाचं जे जे स्कूल ऑफ आर्ट देवनारच्या खाटीकखान्याशेजारी नेऊन मूळ हेरिटेज इमारत दिल्लीतल्या एका फॅशन डिझायनरला फुकून टाकण्याचा प्रयत्न केला.

- त्यांनी जेजेच्या आवारातील तिन्ही महाविद्यालयांना एकाच गगनचुंबी इमारतीत कोंबावयाचा प्रस्ताव पुढं आणला होता.(ज्यानं त्याचं डिझाईन केलं होतं त्या आर्किटेक्चर कॉलेजच्या डीनला पुढं उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे पदावरून पायउतार व्हावं लागलं होतं.)

- त्यांनी जेजे स्कूल ऑफ आर्ट आणि महाराष्ट्रातील अन्य तीन शासकीय कलामहाविद्यालयांची अधिष्ठातापदं वर्षानुवर्षं रिक्त ठेवली. (आज या घडीला जेजे स्कूल ऑफ आर्टमधील प्राध्यापक आणि कलाशिक्षकांच्या अधिष्ठात्यांसह ५१ पैकी एक नाही दोन नाही तब्बल ३३ पदं रिक्त आहेत. मुंबईत ही अवस्था तर नागपूर, औरंगाबाद येथे काय असेल?) यांनीच महाराष्ट्राचं मानाचं कलासंचालकपदही वार्‍यावर सोडलं; आणि या रिक्त जागेवर प्रभारी म्हणून अक्षरश: गावगुंड आणून बसवण्यासही मागं पुढं पाहिलं नाही.

- त्यांनी आपापल्या गावातली शेंबडी पोरं मुंबईत आणून २० २५ वर्षं नोकरी झालेल्या ज्येष्ठ  शिक्षकांना मागे सारून, जेजेच्या प्रमुखपदी बसवावयाचा प्रयत्न केला. (खोटं वाटतं तर विधानसभेच्या सभापती महोदयांना विचारा. जवळ जवळ एक दशकभर तेच तर या खात्याचे अनभिषिक्त सम्राट होते.) आणखी एक कंस (मंत्रीपदावरून सभापतीपदावर त्यांना ‘बढती’ का मिळाली हे मात्र कृपा करून त्यांना विचारू नका.)

- त्यांनीच जातीचे खोटे दाखले दिलेल्या उच्चवर्णीयांना कलासंचालनालयातल्या उच्चपदावर बसवलं. त्याच रसाळ नावाच्या इसमानं महाराष्ट्राच्या कलाशिक्षणाचं अक्षरश: मातेरं केलं. हा प्रकार वृत्तपत्रांनी उघडकीला आणताच त्याच रसाळांच सेवानिवृत्तीच्या शेवटच्या दिवशी तोंडदेखलं निलंबन केलं आणि कालांतरानं त्यांचं थांबलेलं पेन्शनही सुरू करून दिलं.

- त्यांनीच तर महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यापासून ३० -३२ आकड्यात घोटाळणारी कलामहाविद्यालयं अवघ्या तीन चार महिन्यात विनाअनुदानित कलामहाविद्यालयांच्या रूपानं २०० च्या वर नेऊन ठेवली. (संबंधितांनी कलामहाविद्यालयं तरी कुठं कुठं काढावीत. कुक्कुटपालन केंद्र, गाईंचे गोठे, म्हशींचे तबेले, खाटीकखाने(खाली जनावरं कापायची आणि वर विद्यार्थी), पडवी, ओसरी, उघडा माळ, नगरपालिकेच्या शाळा, जिल्हा परिषदेच्या शाळा इतकंच काय दुकानांच्या गाळ्यातसुद्धा! काहींनी तर तेवढीही तसदी घेतली नाही. त्यांनी कलामहाविद्यालयांच्या परवानग्या मिळवल्या पण त्यांची कलामहाविद्यालयं कधीच प्रत्यक्षात आली नाहीत. पण या अदृश्य कलामहाविद्यालयांचे विद्यार्थी मात्र दर वर्षी मेरिटमध्येच चमकत राहिले. ते मेरिटमध्ये चमकावेत म्हणूनच अस्तित्त्वातच नसलेल्या कलामहाविद्यालयांत परीक्षेची केंद्रंसुद्धा उघडली गेली.)

- यांनीच मुंबई विद्यापीठात परीक्षेला न बसलेल्याच विद्यार्थ्याला विद्यापीठात पहिलं आणण्याचा पराक्रम केला होता.

- यांनीच मुंबई विद्यापीठाच्या परीक्षेत पहिल्या वर्गात उत्तीर्ण असलेल्या विद्यार्थ्यांना चक्क नापास केलं होतं. तेही एक दोन नव्हे तर तब्बल सात आठ. वृत्तपत्रांनी हे प्रकरण लावून धरल्यावर मात्र सहा महिन्यानं का होईना विद्यापीठाला त्यांना झक्कत पास करावं लागलं. पण ज्यांनी हे घडवून आणलं त्या शिक्षकांवर मात्र अद्यापही कुठलीच कारवाई झालेली नाही. अद्यापही ते शिक्षक जेजेमध्ये निलाजरेपणानं राजरोस फिरत आहेत.

- यांनीच परदेशी वकिलातीतल्या अधिकार्‍याच्या मुलीला वेळ घालवण्यासाठी प्रमाणपत्र अभ्यासक्रमात प्रवेश हवा असतानादेखील थेट मुंबई विद्यापीठाच्या मास्टर ऑफ फाईन आर्टच्या परीक्षेला बसवलं आणि पदवी देऊन मोकळेसुद्धा झाले.

- यांनीच शासनातर्फे सर्वोत्कृष्ठ शेतकर्‍यांना दिल्या जाणार्‍या सुवर्णपदकांच्या घडणावळीत भ्रष्टाचार केला आणि महाराष्ट्र सरकारला जगासमोर मान खाली घालावयास लावली. (ज्यानं हे सारं केलं तो महाराष्ट्राचा प्रभारी कलासंचालक कम जेजे स्कूल ऑफ आर्टचा प्रभारी अधिष्ठाता गेली चार पाच वर्षं काहीही न करता घरबसल्या संपूर्ण पगार खातोय आणि त्याच्या वर्गातले ४० विद्यार्थी मात्र कायमस्वरूपी शिक्षकाविनाच जेजेत शिक्षण(?) घेत आहेत.)

- यांनीच, ज्या जमशेटजींनी दीड लाखात संपूर्ण इमारत बांधली त्या इमारतीतील एकेक सीट दीड दीड, दोन दोन लाखाला विकली.

- यांनीच विद्यार्थ्यांना भर दिवसा कॉलेजच्याच आवारात पैसे घेऊन लुबाडलं आणि संपूर्ण शिक्षकी पेशालाच काळीमा फासला.(त्या विद्यार्थ्यांचं नशीब दांडगं होतं म्हणून यांनी चाकू सुरे नाही दाखवले.) पण त्यांच्यावरही काहीच कारवाई झाली नाही. ते आता सुखानं सेवानिवृत्ती वेतन उपभोगतायत.

- यांनीच जेजेतली कोट्यावधी रूपयांची दुर्मिळ चित्रं आधी सर्फ लावून धुतली आणि नंतर ती खराब झाली म्हणून जाळून टाकली. चित्रकार गायतोंडे यांचं; ज्याची किंमत आजघडीला किमान १५ ते २० कोटी होऊ शकेल, असं चित्र केवळ तयार लाकडी फ्रेम मध्ये भरले जाईना म्हणून चक्क कापून टाकलं. कापून टाकताना ते चित्र मधोमध दुभंगलं. पण संबंधितांवर कुठलीच कारवाई केली नाही.

काय आणि किती लिहावं! कोळसा उगाळावा तेवढा काळाच! हे सारं लिहिलं, पुराव्यानिशी वेळोवेळी वृत्तपत्रातून मांडलं, लाखो रूपये खर्च करून ३५० पानांचा ‘चिन्ह’चा एक अख्खा अंकही काढला. पण उपयोग शून्य! गुन्हेगार ताठ मानेनं समाजात वावरतायत; विद्यार्थी धाय मोकलून रडतायत; आणि कलासंचालनालय व तंत्रशिक्षणखात्याचे अधिकारी मात्र मजेत सगळी गंम्मत पाहतायत. महाराष्ट्र कलाशिक्षणात कधीच मागे पडलाय; कानामागून येऊन बडोदा मात्र खूप पुढं निघून गेलाय.

आज सभापतीपदावर मिरवणार्‍या तेव्हांच्या तंत्रशिक्षणमंत्र्यांसमोर हे सारं तळमळीनं मांडलं. पण त्यांनी कालापव्यय करीत ते धुत्कारून लावलं. तंत्रशिक्षण सचिवांच्या कानावर घातलं, आपल्या मुलाच्या नावे ‘आदर्श’मधला फ्लॅट पटकावणार्‍या या महिला अधिकारी तेव्हा तंत्रशिक्षण खात्याच्या सचिव होत्या. पण ‘आदर्श’सारखी ‘सेटींग्ज’ लावण्यात मग्न असल्याने त्यांना आमचं आक्रंदन बहुधा कळलं नसावं. ‘आदर्श’ मुख्यमंत्र्यांचे जवळचे स्नेही म्हणाले मी घेऊन जातो तुम्हाला मुख्यमंत्र्यांकडे. पण ‘अप्सरा’ आणि नातलगांच्या फ्लॅट वाटपात मग्न असलेल्या ‘आदर्श’रावांना, चुकलो अशोकरावांना ते बहुधा फारसं महत्त्वाचं वाटलं नसावं. त्यामुळे मुख्यमंत्र्यांची भेट कधीच घडू शकली नाही. मध्यंतरी अयोध्या निकालाच्या पार्श्वभूमीवर सरकारने सलग तीन दिवस दारूची दुकानं बंद ठेवून ‘ड्राय डे’ जाहीर केले होते पण सुप्रीम कोर्टाने अयोध्येचा निकाल पुढे ढकलताच ‘ड्राय डे’चे आदेश रद्द केले. दारूच्या बाबतीत ही असली संवेदनशील तत्परता दाखवणार्‍या सरकारला शिक्षणासारख्या अत्यंत महत्त्वाच्या विषयाबाबत निर्णय घ्यावयास तब्बल दोन दोन, तीन तीन दशकं का लागावीत? हे असे प्रश्न आधी पडले तरी विचारावयाची सोय नव्हती. विचारले तरी ज्यांना विचारले आहेत त्यांना ते कळतीलच याची खात्री नव्हती. उच्च शिक्षणाला प्राधान्य देणार असल्याचं आपलं विधान प्रसिद्ध झालं आहे, म्हणूनच आपल्यासमोर हे सारं मोकळेपणानं मांडावयाचं धाडस केलं आहे.

 
ज्यांनी हा सारा उत्पात घडवला ते सर्वच सरकारी अधिकारी वा कर्मचारी ही सर्वच दृष्टीने क्षुल्लक माणसं होती. इतकी की सरकारनं त्याच्यावर कारवाई करून त्यांना घरचा रस्ता दाखवला असता तर त्यांना रस्त्यावर उभं राहून अक्षरश: भीक मागावी लागली असती. पण त्यांची तोंडं पाहून कुणाही सुसंस्कृत माणसांनी ती त्यांना घातली नसती. खरंतर मुंबई पोलिस वापरतात तो शद्बप्रयोग इथं करायला हवा. ‘चिंधीचोर’. चिंधीचोरच होते ते, पण त्यांच्यावर राज्यकर्त्यांचा कुठलाच अंकुश न उरल्यानं जेजेचं १५० वर्षाचं साम्राज्य उद्‍ध्वस्त करावयाचं धाडस ते दाखवू शकले. महाराष्ट्राचं संपूर्ण कलाशिक्षणक्षेत्रच पोखरून टाकणार्‍या या ‘आजी माजी’ छोट्या माशांवर प्रथम कारवाई करा. त्यानी केलेल्या २५ वर्षाच्या भ्रष्टाचाराची चौकशी करावयास लावून इथला कारभार सुधारा; आणि मगच वैद्यकीय, अभियांत्रिकी क्षेत्रातल्या बड्या माशांना हात लावा. या कारवाईतून जो ‘संदेश’ जाईल तो नक्कीच महाराष्ट्राच्या शिक्षणक्षेत्राच्या हिताचाच असेल.

जे जे स्कूल ऑफ आर्टचा माजी विद्यार्थी या नात्याने आपणास मी ही जाहीर विनंती करीत आहे, तिला योग्य तो प्रतिसाद द्याल अशी आशा आहे.

कळावे, लोभ असावा ही विनंती,
आपला नम्र,

सतीश नाईक,
मुख्य संपादक चिन्ह

वि. सू :
या प्रदीर्घ अनावृत्त पत्रात मी जे जे काही किंवा जेजेबद्दल जे काही लिहिलं आहे ते आपणास अतिरंजित वाटण्याची शक्यता आहे. पण तसं ते नाहीये, जे सत्य आहे आणि जे घडलं आहे तेच मी लिहिलं आहे. हे असंच सारं इथं २५ वर्षांत घडलं आहे. किंबहुना त्यापेक्षाही भयंकर बरंच काही घडलं आहे. पण त्याचे पुरावे नसल्यानं मी त्याबद्दल काही लिहिलं नाही. या सार्‍याच्या चौकशीचे नुसते आदेश द्या आणि अवघ्या आठ दिवसात सारे वठणीवर येतात की नाही ते पहा. महाराष्ट्राच्या संपूर्ण शिक्षणक्षेत्रात जे जे स्कूल ऑफ आर्टचं स्थान कदाचित एक टक्का इतकंच असेल पण त्या संस्थेची १५० वर्षांची पुण्याई इतकी मोठी आहे की तिथं घडलेल्या छोट्याशा घटनेचे पडसादसुद्धा महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर उमटतात. खोटं वाटत असेल तर सभापती महोदयांना विचारा.

ताजा कलम :
हे अनावृत्त पत्र लिहून हातावेगळं केलं आणि आपल्या मंत्रिमंडळाची यादी जाहीर झाली आहे. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात, परीक्षेला अवघे तीन महिने उरले असताना राज्यातील १५० कला महाविद्यालयांचा अभ्यासक्रम बदलण्याची घोषणा करणार्‍या राजेश टोपे यांच्याच हाती पुन्हा तंत्रशिक्षणखात्याचा कारभार सोपवल्याचं जाहीर झालं आहे. याला काय म्हणावं? तंत्रशिक्षणखात्याचा कारभार त्यांनी उत्तम केला म्हणून ही पुनर्नेमणुक का ही ते करत असलेल्या मुंबई विद्यापीठातल्या पी.एच.डी.ची सोय? जेवढे ‘ममत्त्व’ आपण आणि अजितदादांनी राजेशभाईजींवर दाखवलं आहे तेवढं नाही पण थोडंसं तरी ‘ममत्व’ जे जे स्कूल ऑफ आर्ट आणि महाराष्ट्रातल्या कलाशिक्षणसंस्थांबाबत दाखवलं जाईल अशी अपेक्षा करावी का?

2 comments:

AMBADAS BIDKAR said...

सदर पत्राद्वारे आपण नव्या मुख्यमंत्र्यांचे जेजेच्या दुर्व्यवस्थेकडे लक्ष वेधण्याचा अत्यंत तळमळीने प्रयत्न केला त्याबद्दल अभिनंदन. पण राजकारण्यांना आपल्या ‘आदर्श’ राज्यकारभारातून सवड व्हायला हवी , सवड असेल तर या प्रश्ना बद्द्ल आस्था हवी .आस्था असेल तर ईच्छाशक्ती हवी. कारण आर्टिस्ट ही संख्येने नगण्य जमात.यामुळे मताच्या राजकारणात आपल्याकडॆ साफ दुर्लक्ष केले तरी याच्या खुर्चीला ओरखडाही उठणार नाही. मुख्य प्रश्न आहे आपण आर्टिस्ट म्हणवणारे कम्युनिटी म्हणून याबाबत किती संवेदनशीलता दाखवतो व जबाबदरी निभावतो?

Unknown said...

apalya prayatnanana mi daad deto. abhinandan.