Saturday, December 18, 2010

.


पत्रास कारण की...

महाराष्ट्राच्या भ्रष्ट कलाशिक्षण व्यवस्थेवर टीका करणार्‍या लेखनास सुमारे पाच सहा वर्षांपूर्वी मी सुरूवात केली. दै. लोकसत्तामधील प्रदीर्घ लेखमाला तसेच ‘चिन्ह’मधील लेखनासंदर्भात आजवर कुणी दावे प्रतिदावे केले नव्हते किंवा या प्रदीर्घ लेखनाच्या हेतूंविषयी कुणी शंकाही उपस्थित केल्या नव्हत्या अथवा त्याच्या एकांगीपणाविषयीही कुणी आक्षेप नोंदवले नव्हते. यास अपवाद ठरलं ते रहेजा कला महाविद्यालयातून गतवर्षी पदविका घेतलेल्या भूषण वैद्य यांचं पत्र. त्यातही त्यांनी थेट आरोप करणं टाळलेलं आहे पण त्यांच्या पत्रातील अनेक जागांमधून ‘चिन्ह’नं राबवलेल्या कलाशिक्षण भ्रष्टाचार मोहिमेविषयी अथवा माझ्याविषयी वाचकांच्या मनात शंका उपस्थित होऊ शकतात. म्हणूनच त्यास प्रदीर्घ उत्तर दिलं आहे. भूषण वैद्य यांचं हे पत्र ‘चिन्ह’नं कलाशिक्षणातील भ्रष्टाचाराच्याविरोधात राबविलेल्या मोहिमेचंच एक फलित म्हणता येईल, असं मी मानतो. महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात कुत्र्यांच्या छत्र्यांप्रमाणे पसरलेल्या टिनपाट कलामहाविद्यालयात असे एक दोन, एक दोन विद्यार्थी जरी निर्माण झाले तरी महाराष्ट्राच्या कलाशिक्षणात शिरलेल्या भ्रष्टाचारी वृत्ती प्रवृत्तींना जरब बसण्यास फारसा वेळ लागणार नाही. फक्त अन्यायाविरूद्ध पेटून उठलेल्या विद्यार्थ्यांच्या भावनांचा अन्य शिक्षक अथवा शिक्षकेतर कर्मचारी किंवा प्रशासनातील अन्य व्यक्ती आपापल्या स्वार्थासाठी उपयोग तर करून घेणार नाहीत ना याकडे लक्ष द्यावयास हवे. वैद्य यांच्या दीर्घ पत्राला हे  प्रदीर्घ उत्तर म्हणूनच ...
भूषण वैद्य यांचं मूळ पत्र 
 वाचा

श्री. भूषण वैद्य यास

आपलं१९ नोव्हेंबर २०१०चं पत्र मिळालं. इतक्या उशीरा का होईना मनमोकळेपणानं आपण लिहिलंत याबद्दल आपलं मनापासून अभिनंदन! बहुसंख्य लोक अशा संदर्भात जाहीरपणे बोलावयास अथवा लिहावयास टाळाटाळ करतात आणि मग काही कारण नसतानाही त्याला कुजबूज मोहिमेचं स्वरूप प्राप्त होतं. त्यामुळे होतं काय की त्या घटनेशी संबंधितांना धडपणे खुलासेही करता येत नाहीत अथवा जाहीर भूमिकाही घेता येत नाही. म्हणूनच काही संबंध नसताना माझ्याशी अथवा ‘चिन्ह’शी अकारण जोडल्या गेलेल्या घटनेसंदर्भात आपण जवळजवळ दीड दोन वर्षांनंतर का होईना ‘फेसबुकवर’ जे  जाहीर पत्र लिहीलं त्याबद्दल मी आपले मनापासून आभार मानतो. अन्यथा अशी संधी मला कधी मिळली असती? पुन्हा एकदा मनापासून आभार. आता हे माझं उत्तर.

१)    पत्रकारितेत तब्बल २० वर्षं काढल्यामुळे माणसं जोडायची सवय लागली. त्यामुळे बातमीसाठी, लिहा असं सांगण्यासाठी किंवा लेख प्रसिद्ध करण्यासाठी आलेल्या माणसांना जोडत गेलो, मैत्री करत गेलो. (ही जोडलेली माणसं कालांतरानं, म्हणजे बातमी प्रसिद्ध झाल्यावर, लेख लिहिल्यावर अथवा न लिहिल्यावर, लेख प्रसिद्ध केल्यावर अथवा न केल्यावर तुटतात हेही अनुभव घेत गेलो. पण अगदी मनापासून सांगायचं झालं तर कुठल्याही चांगल्या संपादकाला कधीच शत्रू नसतात व ते नसावेतच आणि मित्र तर नसतातच नसतात. अशा मैत्र्या जर संपादक करू लागले तर त्यांना लिहीणं आणि जगणंही अशक्य होऊ शकतं. 2G स्पेक्ट्र्मचा वाद वाचताय ना. त्यात पत्रकार - संपादकाची काय अवस्था झाली आहे ते पहाताय ना?) होय. त्या अर्थानं पाहिलं तर श्री. शिरीष मिठबावकर, कदाचित नव्हे मित्रच आहेत. मिठबावकरच काय, तुमच्या रहेजा कला महाविद्यालयातील अन्य शिक्षकही माझे मित्रच आहेत.  

२)    पाचव्या वेतन आयोगाच्या संदर्भात अशासकीय चित्रकला महाविद्यालयीन कर्मचारी महासंघानं जो प्रदीर्घ लढा दिला तो मला अनेक दृष्टीनं महत्त्वाचा वाटला म्हणून त्याला ‘कालाबाजार’ अंकातील १६ पानं दिली.(तुमच्या भाषेत खर्ची घातली.) विषयाचं महत्त्व लक्षात आल्यावर, विषय आवडल्यावर मग त्यावर कुणी काय छापलं, किती छापलं ते माझ्या दृष्टीनं महत्त्वाचं नव्हतं. मी या संदर्भात काय भूमिका घेणार होतो आणि काय प्रसिद्ध करणार होतो, ते माझ्या दृष्टीनं महत्त्वाचं होतं. सदर अंक प्रसिद्ध झाल्यावर समाजाच्या विविध स्तरामधून ज्या विभिन्न प्रतिक्रिया आल्या त्या पाहता माझा निर्णय योग्यच होता हे नंतर लक्षात आलं. पाचव्या वेतन आयोगाच्या त्रांगड्यात अडकलेल्या एका नामवंत संघटनेच्या नेत्यानं तर ‘सर्व सरकारी नियमांतर्गत’ राहून ज्या शांतपणे श्री. मिठबावकर आणि त्यांच्या सहकार्‍यांनी जो हा लढा लढवला त्याचं विशेष कौतुक केलं.‘सरकारी नियमात राहून आपल्या न्याय्य मागण्यासाठी लढाई कशी लढावी याचा हा लढा म्हणजे आदर्श वस्तुपाठच होय’, असं त्यांचं मत होतं. संघटनेच्या ३०० पेक्षा जास्त शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचार्‍यांच्या आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या सुमारे ६०० ७०० कुटुंबीयांच्या भवितव्याचा हा प्रश्न होता. अंतिम निर्णयानंतर १५ कोटीपेक्षा जास्त रक्कम सरकारला द्यावी लागली. यावरून या लढ्याचं महत्त्व लक्षात यावयास हरकत नाही.

कला संचालनालयातील दोन तीन भ्रष्ट अधिकारी आणि मंत्रालयातील आणखी दोन तीन भ्रष्ट अधिकारी यांना पाचव्या वेतन आयोगातील शिफारशींची अंमलबजावणी करण्यासाठी या शिक्षकांकडून कमिशन हवं होतं आणि देण्यास या शिक्षकांनी नकार दिला म्हणून त्या सर्व अधिकार्‍यांनी अशा काही पाचरी मारून ठेवल्या की त्या सोडवता सोडवता वर्षां मागून वर्षं गेली. प्रत्येक कोर्टातला निर्णय या शिक्षकांच्या बाजूनं लागला पण कार्यवाही झाली नाही. प्रकरण थेट सुप्रीम कोर्टापर्यंत गेलं. तिथंही निर्णय शिक्षकांच्याच बाजूनं लागला. पण तरीही ते भ्रष्ट अधिकारी शिक्षकांना पाचव्या वेतन आयोगाप्रमाणे वेतन द्यावयास तयार नव्हते. पण इतका मोठा कालावधी उलटल्यानंतर सरकारला नमतं घ्यावंच लागलं. एक क्षण तर असा आला होता कलासंचालनालय आणि तंत्रशिक्षण खात्यातील बहुसंख्य अधिकार्‍यांना तुरूंगात खडी फोडायला जायची वेळ आली होती. पण न्यायालयाच्या संयमित भूमिकेमुळे ती टळली. अशा या सर्वच दृष्टीनं अभूतपूर्व ठरलेल्या या लढ्याचं नेतृत्त्व श्री. मिठबावकर यांनी केल्यामुळे त्यांना या संपूर्ण लढ्याचे अनुभव सांगण्याची विनंती केली, जी त्यांनी मान्य केली. या लढ्यात सहभागी असलेल्या अनेकांचे अनुभव प्रसिद्ध करण्याची तयारी ‘चिन्ह’नं दाखवली होती. पण दुर्दैवानं त्या कामी कुणाचंही सहकार्य मिळू शकलं नाही. काही घाबरले तर काहींनी नकार दिला. काहींनी तयारी दर्शवली पण दुर्दैवानं संघटनेतल्या अन्य सभासदांची उणी दुणी काढून आपणच कसे श्रेष्ठ आहोत हे सांगण्यापलीकडे प्रसिद्ध करण्याजोगं त्यांच्याकडून काहीच मिळालं नाही. अंक प्रसिद्धीला जाण्यापूर्वी ज्यांनी या लढ्यात पुढाकार घेतला त्यांचं एकत्र प्रकाशचित्र प्रसिद्ध करावयाची इच्छा होती. पण तेही शक्य झाले नाही.(कारणं त्यांची त्यांनाच ठाऊक.) समाजातील विविध घटकांकडून, संघटनांकडून जो प्रतिसाद या लेखाला मिळाला त्यावरून सदर लेख प्रसिद्ध करण्यामागचा हेतू सफल झाला असं म्हणता येईल.

३)    अगदी अलीकडची बातमी द्यायची तर पाचव्या वेतन आयोगाच्या सर्व शिफारसी केवळ श्री. मिठबावकरांनाच नव्हे तर लढ्यात सहभागी असलेल्या (आणि नसलेल्याही) क्रियाशील (आणि निष्क्रिय) कलाशिक्षकांनाही लागू झाल्या आहेत. १५ कोटींपेक्षा जास्त रक्कम त्यांच्या हातीही पडली आहे. पण हे सारं सहजगत्या घडलेलं नाही. त्यातही बरेच नाट्यमय प्रसंग घडले. ते सारेच आपणास ‘चिन्ह’च्या येत्या अंकात वाचावयास मिळतील (लागतील). सहाव्या वेतन आयोगाच्या शिफारसी आता लागू झाल्या आहेत. कलासंचालनालय आणि तंत्रशिक्षण खात्यातील भ्रष्ट अधिकार्‍यांनी त्या जर या कलाशिक्षकांना मिळू दिल्या नाहीत आणि त्यासाठी लढा देण्यास जर अन्य कलाशिक्षकांपैकी(श्री. मिठबावकर यांनी ‘कार्य सिद्धीस जाताच’ संघटनेचं अध्यक्षपद सोडलं आहे) कुणी पुढं आलं, अगदी श्री. मुकुंद गावडे इतकंच काय श्री. सुरेंद्र जगताप यांचेही लेख छापावयाची ‘चिन्ह’ची तयारी आहे. हे आधीच जाहीर करून ठेवतो.

४)    जेजेच्या ज्या विद्यार्थ्यांबाबत तुम्ही लिहिलं आहे ते विद्यार्थी सर्व उपाय थकल्यावर माझ्याकडे आले होते. म्हणूनच मला त्यांची समस्या कळू शकली. त्यामुळेच मी त्यांना त्यांनी काय करावयास हवे याविषयी मार्गदर्शन करू शकलो. मी त्यांना फक्त मार्गदर्शन केलं. बाकी पुढचं सारं त्यांचं त्यांनीच केलं. ही बातमी पहिल्यांदा ज्यांनी दिली त्या भाग्यश्री कवठेकरांना आलेल्या अनुभवांचं चित्रण करणारा लेख मी नंतर कालाबाजारच्या अंकात प्रसिद्ध केला कारण अशा प्रकारची घटना तोपर्यंत मुंबई विद्यापीठाच्या १५० वर्षांच्या इतिहासात कधीच घडली नव्हती. म्हणूनच मी कवठेकरांचा तो लेख प्रसिद्ध केला होता. त्या सर्व प्रकरणात मी जे केलं ते हे एवढंच!


५)    रहेजामध्ये घडलेल्या ज्या दोन प्रकरणांबाबत तुम्ही लिहिलंय ती दोन्ही प्रकरणं वृत्तपत्रात बातम्या प्रसिद्ध झाल्यावरच मला कळली. बातम्या प्रसिद्ध झाल्यावर मग मी आणखी काय करायला हवं होतं असं तुम्हाला वाटतं? पत्रकाराचं, संपादकाचं काम हे एवढंच आहे.  ही दोन्ही तथाकथित प्रकरणं घडली त्यावेळी विद्यार्थी किंवा आपण स्वत: माझ्याकडे आला असता आणि मला त्या प्रकरणात तथ्य वाटलं असतं तर मी निश्चितपणानं वार्ताहर अथवा संपादकांना त्याविषयी कळवण्यास मागंपुढं पाहिलं नसतं. पण पहिलं प्रकरण घडलं २००६ ०७ सालच्या एप्रिलमध्ये. पण त्याविषयी सांगण्यासाठी बाळू माळी नावाचे विद्यार्थी माझ्याकडे आले ते २००८ सालच्या सप्टेंबरमध्ये म्हणजे तब्बल १७ महिन्यांनी ते देखील कालाबाजारचा अंक छपाईला जात असण्याच्या सुमारास.(कालाबाजार अंकाचं काम सुमारे सहा - सात महिने चालू होतं) हा एवढा कालावधी लोटल्यानंतर मी संपादक म्हणून काय करावयास हवं होतं असं आपणास वाटतं? यासंदर्भात श्री बाळू माळी यांनी दिलेले दोन किंवा तीन कागदपत्र अजूनही माझ्या संग्रहात आहेत (महाराष्ट्रातल्या अन्य कलामहाविद्यालयातील अशी सुमारे ५०० ते ६०० प्रकरणं माझ्याकडे कागदपत्रांसह आहेत. ह्या सगळ्यांवर लिहायचं म्हटलं तर आयुष्यभर मला हेच काम करावं लागेल आणि हीच घाण उपसावी लागेल. ते करायला माझी हरकत नाही पण हे सारं वाचणार कोण? सुमारे दीड दोन लाख रूपये खर्च करून प्रसिद्ध केलेल्या कालाबाजार अंकाच्या जेमतेम ८०० ते ९०० प्रती विकल्या गेल्या.(उरलेल्या सध्या मी बेडसारख्या वापरतो. आईशप्पथ!) उरलेल्यांचं काय करायचं हा माझ्यापुढे मोठा यक्ष प्रश्न आहे. वाचकांचं म्हणणं आहे ‘हा अंक अंगावर येतो’, ‘वाचवत नाही त्रास होतो’. अंकातल्या एकाहून एक भयंकर लेखामुळे अंकातला चित्रकलाशिक्षणविषयक परिसंवाद मात्र दुर्लक्षिला गेला याचं अतिशय वाईट वाटतं.

६)    आता तुम्ही म्हणता त्या २००७ - ०८ सालच्या बॅचवरच्या अन्यायाबाबत. हे प्रकरण घडलं असणार २००८ सालच्या एप्रिलमध्ये. परीक्षेचा निकाल लागला असणार मे मध्ये. ‘चिन्ह’च्या कालाबाजार अंकाचं काम सुरू झालं मे मध्ये आणि  नंतरचे सहा महिने रोजच तब्बल १२ १८ तास अंकाचं काम चालू होतं. तब्बल सहा महिने मी घराबाहेरसुद्धा पडू शकलो नव्हतो. हा अंक प्रसिद्ध झाला नोव्हेंबरमध्ये. मे पासून अंक प्रसिद्ध होईपर्यंत तुम्ही अथवा तुमच्या मित्रांनी किंवा ज्यांच्यावर अन्याय झालाय म्हणताय त्यातल्या कुणीही माझ्याशी अथवा माझ्या सहकार्‍यांशी संपर्क साधला नसताना यावर मी काही करावं अशी अपेक्षा तुम्ही कशी काय करू शकता? म.टा., लोकसत्तासारख्या बड्या वृत्तपत्रात बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर मी असं काय वेगळं करणार होतो? ज्याबाबतीत मला काही माहिती नाही, माझ्याकडे कोणतीही कागदपत्रं नाहीत किंवा पुरावे नाहीत अथवा तक्रारही नाही तिथे मी काही करणं निव्वळ मूर्खपणा आहे असं मी समजतो. ‘चिन्ह’नं आधी वृत्तपत्रातून, नंतर कालाबाजारमधून आणि आता ब्लॉगमधून जी मोहिम उघडली म्हणूनच तिला आजवर कुणीही उत्तर देऊ शकलेलं नाही.


७)    ज्या शिरीष मिठबावकरांचा उल्लेख आपण, माझे ‘कदाचित मित्र’ म्हणून केला आहे त्याच
शिरीष मिठबावकरांवर अतिशय तिखट असे ताशेरे कालाबाजारच्याच अंकात ओढावयास मी मागेपुढे पाहिलेलं नाही. (त्यासंदर्भात श्री. मिठबावकरांनीही माझ्याकडे कधी विचारणा केलेली नाहीये किंवा निषेधही व्यक्त केला नाही अथवा जाबही विचारलेला नाहीये.) कालाबाजारचा अंक काळजीपूर्वक वाचला असता तर हे तुम्हाला निश्चित दिसलं असतं. बाकी शिरीष मिठबावकरांविषयी तुम्ही जे लिहिले आहे त्याचे उत्तर देण्यास ते समर्थ आहेतच.

जाता जाता
८)    ज्या प्रदीप दारोळेसरांचा उल्लेख तुम्ही केलाय ते दारोळेही माझे मित्रच होते. त्यांच्याविषयी इतकंच सांगेन; समाजात इतरांना पुढं करून अथवा भडकवून मागाहून/ मागून त्याची गंमत पाहणारे अनेक असतातच; दारोळे हे अशाच गंमत पाहणार्‍यांच्या कारस्थानांना बळी पडले, असं माझं स्पष्ट मत आहे. अशा गंमत पाहणार्‍यांना आपण आपला बळी होऊ द्यायचा का नाही हे ज्याचं त्यानं ठरवायचं असतं, पण श्री. दारोळे मात्र हे ठरवू शकले नाहीत. त्यामुळे त्यातच त्यांचा दुर्दैवी अंत झाला. ज्यांनी हे घडवून आणलं आणि गंमत पाहिली त्यांना दारोळे आणि त्यांच्या कुटुंबीयांची जी वाताहत झाली त्याची जाणीव झाली असेल किंवा नाही याची मला कल्पना नाही. पण बहुधा नसावीच.

इतक्या दिवसांनी का होईना मोकळेपणानं तुम्ही जे लिहीलंत ते नक्कीच भूषणावह आहे. त्याबद्दल तुमचं खरंच पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन! तुमच्यासारखे अन्य कला महाविद्यालयातील विद्यार्थीही जर तुमचा मार्ग अवलंबून जर असे लिहीते झाले तर कला शिक्षणातला संपूर्ण भ्रष्टाचार नष्ट व्हायला फारसा वेळ लागणार नाही, हे निश्चित समजा. ‘चिन्ह’वर आपण वेळोवेळी जो लोभ व्यक्त करत असता त्याबद्दलही आभार मानायची संधी घेतो. ‘चिन्ह’च्या संकेतस्थळाच्या आणि येत्या अंकाच्या कामात व्यस्त असल्यामुळे पत्राला उत्तर द्यावयास उशीर झाला. याबद्दल क्षमस्व.

तुमचा

सतीश नाईक
मुख्य संपादक ‘चिन्ह’

2 comments:

shirish mitbawkar said...

DEAR SATISH
U R ALWAYS WITH THE PERSONSHO R
PUT THERE EFFORTS FOR ART EDUCATION.
BHUSHAN WAS MY STUDENT, HE IS ALSO KEEN BUT SOMETIME COULDNT UNDERSTANDS THE SITUATION
THANKS FOR ANSWERING THE SAME WITHOUT ANY HESSITATIONS
THANKS
SHIRISH

Unknown said...

satish
thanks
for answer without any hesitation
shirish