Sunday, January 2, 2011


कलाशिक्षण :
मृत्युघंटा वाजू लागली!
भाग १

मंत्रालयातल्या तंत्रशिक्षणखात्यामधल्या ज्येष्ठ पदावरच्या उलट्या काळजाच्या अधिकार्‍यांनी आणि चाराणे आठाण्याला हपापलेल्या दुय्यम पण नव्हे तिय्यम दर्जाच्या कारकुंड्यांनी कलासंचालनालयातल्या बेअक्कल, आचरट आणि नालायक  ठरलेल्या अधिकार्‍यांना हाताशी धरून सुमारे २० २५ वर्षांपूर्वी कलासंचालनालय, जे जे स्कूल ऑफ आर्ट व अन्य तीन शासकीय कलामहाविद्यालयं तसंच महाराष्ट्राचं उच्च दर्जाची परंपरा लाभलेलं कलाशिक्षण यांची कबर खणावयाचा जो डाव आखला तो पूर्णत्त्वाला गेल्याची चिन्ह आता दिसू लागली आहेत. याविषयी ‘चिन्ह’नं गेल्या सहा सात वर्षांपासून सातत्यानं आवाज उठवला. ही भयंकर उलथा पालथ थांबावी यासाठी ‘चिन्ह’नं आटोकाट प्रयत्न केले. पुराव्यानिशी वृत्तपत्रांच्या साहाय्यानं सर्व प्रकरणं बाहेर काढली. कलाशिक्षणातल्या भ्रष्ट प्रवृत्तींच्या विरोधात अक्षरश: मोहिमच उभी केली. हेतू हा होता की हे सारं थांबावं आणि पुन्हा महाराष्ट्राच्या कलाशिक्षणाला मानाचं स्थान प्राप्त व्हावं.

अन्यथा महाराष्ट्राच्या कलाशिक्षणाचं भविष्यात कधीतरी पूर्णत:च मातेरं होणार आहे हे ‘चिन्ह’ला स्पष्टपणानं दिसत होतं, जाणवत होतं. पण भ्रष्टाचाराच्या विरोधात एवढी प्रचंड मोहिम राबवूनसुद्धा प्रचंड पगार खाणार्‍या आणि महाराष्ट्रातले होते नव्हते ते भूखंड गिळून टाकणार्‍या तंत्रशिक्षण खात्याच्या बेशरम अधिकार्‍यांना इथं लक्ष द्यायला वेळ नव्हता. या बेशरम अधिकार्‍यांच्या ‘आदर्श’ उद्योगांकडे डोळेझाक करणार्‍या तंत्रशिक्षणमंत्र्यांबद्दल काय, कसं आणि किती लिहावं? कोळसा उगाळावा तेवढा काळाच! परिणामी जे व्हायला नको होतं ते आता झालं आहे.

कलासंचालनालयाच्या अखत्यारित येणार्‍या जे जे स्कूल ऑफ आर्टसह अन्य तीन शासकीय कलामहाविद्यालयं, ३० ३२ अनुदानित कलामहाविद्यालयं आणि दीडशे, दोनशे ते अडीचशे भडभुंजी विनाअनुदानित कलामहाविद्यालयं (ज्यांची खरी संख्या कलासंचालनालयातल्या डफ्फर आणि टिनपाट अधिकार्‍यांना ‘चिन्ह’नं जाहीर आव्हान देऊनसुद्धा अद्यापही सादर करता आलेली नाहीये.) यांच्यात चालू शैक्षणिक वर्षामध्ये अवघ्या २६ ते २८ टक्के विद्यार्थ्यांनीच प्रवेश घेतला आहे. याचाच अर्थ असा शासनानं परवानगी देऊनसुद्धा महाराष्ट्रातल्या ७० टक्के ‘सुजाण’ पालक आणि विद्यार्थ्यांनी या कलाशिक्षणसंस्थांकडे चक्क पाठ फिरवली आहे. आकडेवारी देऊन जर उदाहरणार्थ वगैरे स्पष्ट करावयाचं झालं तर उच्च कलाशिक्षणासाठी आवश्यक असलेल्या फाऊंडेशन कोर्ससाठी जर विविध कलामहाविद्यालयातून शासनानं जर ३,००० जागा मंजूर केल्या असतील तर यंदा त्यातल्या फक्त ७५० ते ८०० जागाच भरल्या गेल्या आहेत.

याचाच अर्थ असा की ३,००० मधल्या २१०० ते २२०० जागा किंवा यापेक्षा अधिकसुद्धा जागा या विद्यार्थ्यांविना रिकाम्या राहिल्या आहेत. गतवर्षीपर्यंत प्रवेश घेण्याचं हे प्रमाण ८० ते ९० टक्क्यांपर्यंत होतं. यंदा फक्त एकाच वर्षात ते शेअर बाजारातल्या इंडेक्ससारखं घसरून थेट २७ २८ टक्क्यांपर्यंत खाली आलं. याचाच दुसरा अर्थ असा की महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांनी किंवा त्यांच्या पालकांनी जिथं पदवी शिक्षण उपलब्ध आहे( मग त्याची फी लाखाच्या घरात का असेना) त्या मुंबई पुण्याच्या कलामहाविद्यालयांत प्रवेश घेणं पसंत केलं. ज्यांना हे शक्य झालं नाही त्यांनी बडोदा किंवा दिल्ली गाठलं. मात्र ज्यांना हेही परवडणारं नव्हतं त्या विद्यार्थी पालकांनी ‘नको ते कलासंचालनालय आणि त्याच्याशी संबंधित कलामहाविद्यालयं’, असं म्हणून संगणकाशी संबंधित कला अभ्यासक्रमांना प्रवेश घेणं पसंत केलं.

ही काही ‘चिन्ह’ची शोधपत्रकारिता वगैरे नाही, ही आकडेवारी दादा आडारकर, माधवराव सातवळेकर, बाबुराव सडवेलकर यांच्यासारख्या नामवंत कलाशिक्षणतज्ज्ञांनी भूषविलेल्या महाराष्ट्राच्या कलासंचालकांच्या खुर्चीवर बसणार्‍या तंत्रशिक्षणखात्यातल्या वागदे नावाच्या अधिकार्‍यानं प्राचार्यांच्या टास्क फोर्स सभेतच दिली असल्याचं कळतं. या वागदे यांनी उपस्थित ‘गरीब - बिचार्‍या’ प्राचार्यांना ‘हे असं का झालं?’ असा प्रश्न विचारल्याचंही कळतं. वागदे यांनी हा प्रश्न त्यांना विचारण्याऐवजी मंत्रालयातल्या तंत्रशिक्षणखात्यात गेल्या २५ वर्षांत शेण खाऊन गेलेल्या आपल्या कर्मचारी बंधू आणि अधिकारी बंधू(भगिन्यांनासुद्धा) विचारला असता तर ‘आदर्श’ उत्तरं मिळाली असती आणि हे विचारावयास त्यांना जर संकोच वाटत असेल तर त्यांनी ‘चिन्ह’चा ‘कालाबाजार’ अंक वाचावा. तो विकत घेण्याचीही आता गरज नाही. ‘चिन्ह’च्या (www.chinha.in) संकेतस्थळावर तो फुक्कट उपलब्ध आहे. जगभरातले वाचक तो मोठ्या चवीनं वाचतायंत. १५ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबर या ४५ दिवसांत जगभरातल्या एक लाखापेक्षाही अधिक कलारसिकांनी त्याचा लाभ घेतला आहे. (टिंग टॉंग. जाहिरात संपली.) गंम्मत म्हणजे यातले ५२ टक्के कलारसिक हे जगभरातले आहेत. अमेरिका, फ्रान्स, इटली, इंडोनेशिया इतकंच काय रशियातसुद्धा तुमच्या आणि तुमच्या वरिष्ठांच्या खुर्च्यांवर बसलेल्या आधीच्या कर्तबगार आणि ‘आदर्श’ अधिकार्‍यांचे प्रताप आणि पराक्रम पोहोचले आहेत. वागदे यांना ते ठाऊक नसावं याचं आश्चर्य वाटतं आणि तरीही त्यांना ही कारणं समजण्यास अडचण येत असेल तर त्यांच्या प्रत्येक प्रश्नास उत्तर देण्यास ‘चिन्ह’ कटिबद्ध आहे. त्यांनी विचारो वा न विचारो; ‘चिन्ह’ या सगळ्या प्रश्नांची उत्तरं पुढल्या आठवड्यापासून तपशीलवारपणे क्रमश: देणारच आहे.

सतीश नाईक
मुख्य संपादक, ‘चिन्ह’

No comments: