मुख्यमंत्री, अजिंठा वेरूळ आणि जे जे स्कूल
जेजेच्या संग्रहातलं वाळवीनं पोखरलेलं जांभळीकरांचं पेंटिंग |
कालपासून महाराष्ट्र टाइम्सच्या अंकात मुख्यमंत्र्यांची अजिंठा – वेरूळच्या पार्श्वभूमीवरची प्रकाशचित्रं प्रसिद्ध होत आहेत. ती पाहून बरं वाटलं. महाराष्ट्र राज्य स्थापनेनंतर अजिंठा – वेरूळला भेट देणारे पृथ्वीराज चव्हाण हे बहुधा पहिलेच मुख्यमंत्री आहेत असा त्या बातमीत उल्लेख आहे. तो बहुधा खराच असावा. जे पाहिल्यावर मती अक्षरश: कुंठीत होते अशा या जगातल्या निवडक आश्चर्यांपैकी एक आश्चर्य आपल्या महाराष्ट्रात असूनसुद्धा एकाही मुख्यमंत्र्याला आपल्या कारकीर्दीत त्यांना भेट द्यावीशी वाटू नये यातच महाराष्ट्राच्या चित्रकलेच्या क्षेत्रात झालेल्या पिछेहाटीची कारणं दडलेली असावीत.
पृथ्वीराज चव्हाण यांनी इसवीसनापूर्वी दोनशे वर्षांपासून ते सातव्या शतकापर्यंतच्या काळात निर्माण झालेल्या या अद्भूत आश्चर्याची जातीनं जी दखल घेतली, तीनं महाराष्ट्रातल्या कलावंतांच्या मनाला नक्कीच दिलासा मिळाला असेल. आता माननीय मुख्यमंत्री भारतीय कलेची जननी असलेल्या आणि अवघ्या१५० वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या जे जे स्कूल ऑफ आर्ट या कलासंस्थेची आपल्याच पक्षाच्या आधीच्या राज्यकर्त्यांनी आणि ‘आदर्श’ अधिकार्यांनी काय धूळधाण करून ठेवली आहे, याची दखल घेतील काय?
१८६२ ते १८८५ या कालखंडात इ. डब्ल्यू. ग्रिफिथ्स यांनी अजिंठ्याच्या चित्रांच्या प्रतिकृती तयार करून घेतल्या होत्या. प्रख्यात चित्रकार पेस्तनजी बोमनजी यांच्या नेतृत्वाखाली तब्बल १२ वर्षं हे काम चाललं. ज्या कलाकृतींची किंमत आज आंतरराष्ट्रीय कलाबाजारात कोट्यवधीत मोजली जाईल अशा त्या प्रतिकृती आता जे जे स्कूल ऑफ आर्टमध्ये धूळ खात, वाळवीशी झगडा देत काय अवस्थेत पडल्या आहेत याविषयीही मुख्यमंत्र्यांनी संबंधितांकडून माहिती घेण्यास हरकत नाही. आमच्या माहितीप्रमाणे त्यातली ब्लॅक प्रिंसेस् ची एक प्रतिकृती जेजेच्या अधिष्ठात्यांच्या कपाटात धूळ खात पडली आहे. त्या कपाटात जर वाळवीनं घर केलं नसेल तर ती निश्चितपणानं मुख्यमंत्रांना पहावयास मिळेल.
मुख्यमंत्रीपदी निवड होताच ‘चिन्ह’नं त्यांना एक प्रदीर्घ अनावृत्त पत्र ‘प्रश्न-चिन्ह’ या ब्लॉगवर लिहीलं होतं. मुख्यमंत्र्यांनाही ते मेल करण्यात आलं होतं. दुर्दैवानं त्याची पोच देण्याएवढीही तत्परता मुख्यमंत्री कार्यालयाला दाखवता आली नाही. (तीन आठवड्यात तब्बल तीन – साडे तीन हजार वाचकांनी ते पत्र वाचल्याची नोंद आमच्याकडे आहे. पण दुर्दैवानं त्यावर एकही प्रतिक्रिया येऊ नये याचं आश्चर्य बाटतं आणि खेदही! हे आपलं सहज जाता जाता) मुख्यमंत्र्यांची केवळ एक विचारणाही जेजेची आजची भयावह अवस्था बदलण्यास कारणीभूत ठरू शकेल. मुख्यमंत्रांकडून ही एवढी माफक अपेक्षा तरी करावी का?


1 comment:
देव करो आणि असच काही तरी होओ.कारण आता तोच सरकारला सुबुध्दी देऊ शकेल (कदाचित)!
Post a Comment