Monday, January 10, 2011

उरकलेलं राज्य कलाप्रदर्शन 

भाग १
चटावरचं श्राद्ध उरकतात तसं ५१ वं राज्य कलाप्रदर्शन कलासंचालनालयानं उरकलं. फरक इतकाच ते उरकण्याच्या कामी यंदा तंत्रशिक्षणमंत्री, राज्यमंत्री, सचिव इत्यादी खात्याची बडी मंडळी वेळातवेळ काढून उपस्थित होती. त्याबद्दल त्यांचं अभिनंदनच करावं लागेल. गेल्या १५ ते २० वर्षांत असे प्रसंग अगदी अपवादानंच आले. कदाचित हा नव्या मुख्यमंत्र्यांचा पायगुण असावा. यंदाचं प्रदर्शनही कलासंचालनालयानं घातलेल्या गडबड गोंधळाला अपवाद ठरलं नाही. याची सुरूवात प्रवेशिका स्वीकारण्याच्या तारखेपासूनच झाली. ज्या दिवशी प्रवेशिका स्वीकारल्या जाणार होत्या त्याच्या आदल्या दिवशी तारीख जाहीर करण्यात आली. एका वृत्तपत्रानं तर प्रवेशिका स्वीकारणाच्या तारखेनंतरच ते वृत्तं प्रकाशित केलं. त्यातच प्रवेश शुल्क २५० रूपयांवरून थेट ५०० रूपयांपर्यंत वाढविण्यात आलं. त्यामुळेच प्रदर्शनाला चित्रकारांनी जेमतेम प्रतिसाद दिला. जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये १६० कलाकृती प्रदर्शित करता येतात आणि प्रदर्शनाला फाइन आर्ट विभागात अवघ्या १८० कलाकृती आल्या. सहाजिकच दाढीचा ब्रशसुद्धा वर्षभर हातात धरत नाहीत अशा कलासंचालनालयातल्या भ्रष्ट अधिकार्‍यांच्या कलाकृतीसुद्धा जहांगीरच्या भिंतीवर झळकून गेल्या. त्यांना राज्य पुरस्कार दिला गेला नाही हे आपलं आणि प्रदर्शनात सहभागी झालेल्या प्रामाणिक कलावंतांचं नशीबच म्हणायला हवं. हे एवढं लिहिल्यानंतर प्रदर्शनाचा दर्जा काय लायकीचा असेल ते वेगळं लिहायची आवश्यकता नसावी.

रहेजा कलामहाविद्यालयातील शिक्षण घेतलेल्या कलाशिक्षक – कलावंतांनी ज्येष्ठ कलाभ्यासक/ शिक्षक श्री. दत्ता परूळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन केलेल्या आर्टबॅंड या संस्थेनं राज्य कलाप्रदर्शनाच्या उद्‍घाटन सोहळ्यात ‘बँड’ वाजवून सोहळ्याला छान रंगत आणली. त्यांना या कामी आर्ट सोसायटी ऑफ इंडिया, बॉंम्बे आर्ट सोसायटी या संस्थांच्या पदाधिकार्‍यांनी तसंच दत्तात्रय पाडेकर यांच्यासारख्या चित्रकारांनी सहकार्य दिलं. (त्याबद्दल त्यांचं अभिनंदन! कारण अशा कामांसाठी संस्था एकत्र येण्याची, कलावंत पुढे येण्याची प्रथा महाराष्ट्रात अजून रूजलेली नाही. म्हणून पुन्हा एकदा अभिनंदन.) या सर्वांनी मिळून सोहळा सुरू होताच एकदम उठून सभागृहाच्या बाहेर उभं राहून बहिष्काराचा मार्ग चोखाळला आणि कार्यक्रम संपल्यानंतर तंत्रशिक्षणमंत्री राजेश टोपे यांची सभागृहाबाहेर भेट घेतली. राजेश टोपे मोठे हुशार! त्यांना या आंदोलनाची कुणकुण लागताच त्यांनी आपल्या भाषणात ५०० रूपये शुल्क वाढविण्याचा अध्यादेश मागे घेत असल्याचं जाहीर केलं आणि आंदोलनकर्ते भेटताच ‘तुमच्या मागण्यांचं निवेदन द्या, तीन आठवड्यात भेटीला बोलावतो असं आश्वासन दिलं.

आर्टबॅंड या संस्थेनं ज्या मागण्या दिल्या आहेत त्या अशा :
१)    राज्य कलाप्रदर्शनास आकारण्यात आलेलं प्रवेश शुल्क रद्द करून ते परत करण्यात यावं आणि पूर्वीप्रमाणेच ते विनाशुल्क करावं.
२)    आर्ट कौन्सिलचं पुनरूज्जीवन करून नामवंत कलावंतांच्या मार्गदर्शनाखाली कलासंचालनालयाचा कारभार चालवावा.
३)    शालेय अभ्यासक्रमासाठी कलातज्ज्ञांची स्वतंत्र समिती नेमून एनसीइआरटीच्या निर्देशांची अंमलबजावणी केली जावी.
४)    कलासंचालक, महाराष्ट्र राज्य या पदावर कलावंत तज्ज्ञाची कायमस्वरूपी नेमणूक करावी.
५)    जे जे स्कूल ऑफ आर्ट मधील कलादालन कलावंतांना विनाशुल्क उपलब्ध करून द्यावं.
आर्टबॅंडनं केलेल्या या पाच मागण्यांची तंत्रशिक्षण खातं आणि कलासंचालनालयातले भ्रष्ट अधिकारी कशी वासलात लावतात ते आता पाहायचं. तीन आठवड्यात भेटीला बोलावतो असं आश्वासन देणारे तंत्रशिक्षणमंत्री राजेश टोपे; तीन आठवडे लावता का ३० आठवडे ते आता लवकर दिसेलच.

उद्‍घाटन सोहळ्यात राजेश टोपे यांनी केलेल्या भाषणावरील प्रतिक्रिया उद्या भाग २ मध्ये वाचा. 

No comments: