Friday, January 14, 2011

उरकलेलं राज्य कलाप्रदर्शन
आधी जेजे चालवून दाखवा आणि मग नव्याची घोषणा द्या
भाग २
हा ब्लॉग खरंतर ११ जानेवारी रोजी प्रकाशित व्हायचा होता. पण काही तांत्रिक अडचणीमुळे तो प्रकाशित होऊ शकला नाही, तो आता देत आहोत.

राज्यकलाप्रदर्शनाच्या उद्‍घाटन सोहळ्यात तंत्रशिक्षणमंत्री राजेश टोपे यांनी अनेक घोषणा केल्या, अनेक वचनं दिली असल्याचं प्रसिद्ध झालं आहे. ‘शासकीय महाविद्यालयांच्या व्याप्ती वाढविण्याच्या कामाला गती द्यावी लागेल. विभागीय स्तरावर कलाक्षेत्रात फारसं काम झालेलं नाही. त्यामुळे  या क्षेत्राच्या विकासासाठी पुणे, नाशिक, अमरावती येथे कलामहाविद्यालयं स्थापन करण्यात येतील’ अशी घोषणा तंत्रशिक्षणमंत्र्यांनी केली आहे. तंत्रशिक्षण मंत्र्यांची ही घोषणा ‘ठोकून देतो ऐसा जे’ या प्रकारात मोडणारीच आहे. ज्यांना जे जे स्कूल ऑफ आर्टसारखं १५० वर्षांची परंपरा लाभलेलं आर्ट स्कूल जिथं धड चालवता येत नाही, ज्यांनी जे जे इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाईड आर्टसारख्या ७५ वर्ष जुन्या कलाशिक्षण संस्थेची पुरती वाताहत करून टाकली आहे, ज्यांनी औरंगाबाद, नागपूरच्या शासकीय कलामहाविद्यालयांचीही भीषण अवस्था करून ठेवली आहे; त्यांनी पुणे, नाशिक, अमरावती या ठिकाणी कला महाविद्यालयं स्थापन करण्याची घोषणा करणं हे अत्यंत बेजवाबदारपणाचं वर्तन आहे. गेल्या २० २५ वर्षांत त्यांच्या आधीच्या तंत्रशिक्षणमंत्र्यांनी, ‘आदर्श’ सचिवांनी आणि तंत्रशिक्षण खात्यातल्या भ्रष्ट आणि ना लायक  अधिकारी व कर्मचार्‍यांनी या विभागात काय दिवे लावून ठेवले आहेत, काय उद्योग करून ठेवले आहेत याची थोडी जरी माहिती करून घेतली असती तर वरील घोषणा करताना त्यांची जीभ दहावेळा तरी अडखळली असती आणि ही असली अत्यंत बेजवाबदार घोषणा करण्याची त्यांना हिम्मतच झाली नसती.

‘चिन्ह’नं क(।)बाजार अंकामध्ये या सर्वांच्या पापाचे पाढे  अगदी नावानिशीवार, पुराव्यासकट वाचले होते. इतकंच नव्हे तर त्यानंतरच्या अंकातसुद्धा टोपेसाहेबांनी आल्याआल्या कसे चुकीचे निर्णय घेतले यावरही ‘चिन्ह’नं कडाडून टीका केली होती. हे दोन्ही अंक मंत्री महोदयांनी आवर्जून वाचावे. त्यांच्याकडे ते उपलब्ध नसतील तर www.chinha.in या ‘चिन्ह’च्या संकेतस्थळावर ते उपलब्ध आहेत. ते आधी वाचावेत आणि मग या असल्या अफाट घोषणा करण्याचं धाडस करावं. महाराष्ट्राचं मानचं कलासंचालक पद गेली अनेक वर्ष रिक्त आहे. जे जे स्कूल ऑफ आर्ट धरून अन्य तीनही शासकीय कलामहाविद्यालयात अधिष्ठातांची पदंच रिक्त आहेत. या चारही शासकीय कलामहाविद्यालयातील प्राध्यापक, अधिव्याख्याता, व्याख्याता, तंत्र सहाय्यक यांच्या १३५ पेक्षा जास्त पदांपैकी फक्त ५० ५५पदांवरच कायम स्वरूपी शिक्षकांच्या नियुक्त्या केल्या आहेत. अन्य तब्बल ८० ८५ पदं चक्क गेली १५ १५, २० २० वर्षं रिक्त आहेत आणि त्या जागांवर अननुभवी अशा कंत्राटी आणि हंगामी तरूणांची नेमणूक करून कसाबसा कारभार रेटला जातोय. यातल्या काही हंगामी शिक्षकांची तर १८ १८, २० २० वर्षं हंगामी नेमणूक करून त्याचं शोषण केलं जायंत. (त्यातल्या कुणाचं जर काही अचानक बरं वाईट झालं तर त्यांच्या कुटुंबीयांना
सेवानिवृत्तीवेतन किंवा अन्य कोणतेही सरकारी फायदे मिळू शकत नाहीत, जे नागपूर कलामहाविद्यालयातील एक हंगामी शिक्षक रामदास तडका यांच्याबाबतीत घडलं. १३ १४ वर्षं सेवा करूनही त्यांना कायम स्वरूपी नियुक्ती मिळाली नाही आणि काही महिन्यापूर्वी त्यांचं कॅन्सरचं निदान होऊन अचानक निधनही झालं. आता त्यांच्या कुटुंबीयांनी कुणाकडे पाहायचं? काय करणार आहेत टोपेसाहेब त्यांच्यासाठी?) महाराष्ट्रात कलाशिक्षणाची ही एवढी भीषण वाताहत झाली असताना मंत्रीमहोदय कुठल्या तोंडानं पुणं, नाशिक, अमरावती इथे कलामहाविद्यालयाची घोषणा करत आहेत?

काढाल हो! भव्य मोठ्या वास्तूत तिन्ही कलामहाविद्यालयं उघडाल कारण बांधकामाच्या बाबतीत आपला महाराष्ट्र खूपच ‘प्रगतीपथावर’ गेलाय.(या ‘बांध’‘कामा’त प्रगती कुणाची होते ते सार्‍या महाराष्ट्रालाच ठाऊक आहे.) पण या तीनही कलामहाविद्यालयात अधिष्ठाता, प्राध्यापक, शिक्षक हो कुठून आणणार? वर उल्लेख केलेल्या ५० ५५ कायमस्वरूपी शिक्षकांपैकी २० २५ शिक्षक येत्या २०१३ सालापर्यंत सेवानिवृत्त होणार आहेत. म्हणजे उरलेल्या २० २५ कायमस्वरूपी शिक्षकांत आतची चार आणि नवी तीन अशी एकूण सात महाविद्यालयं का हो चालवणार? द्या टोपेसाहेब, आतातरी या प्रश्नाचं उत्तर द्याल का?

1 comment:

bhushan vaidya said...

'टोपे' कसले उत्तर देतायत? आडनावाप्रमाणेच 'टोप्या' घालताहेत ते सगळ्यांना...