Saturday, July 3, 2010

राज ठाकरे यांना अनावृत्त पत्र : भाग ३


या चारही कलामहाविद्यालयांना येत्या पाचही वर्षे अधिष्ठाता नेमता येणार नाही (कारण गेल्या तब्बल २० – २५ वर्षात ओपनची पदं भरलीच गेली नाहीयेत) हे उघड आहे. इतकंच नाही तर कलासंचालकपदावरही पुढली दहा वर्षे तरी कुणाचीच नेमणूक त्यांना करता येणार नाहीये. या अशाच थापा आधीचे तंत्र शिक्षण मंत्री दिलीप वळसे - पाटील मारत होते. २००८ साली  मंत्रालयात झालेल्या एका विशेष सभेत (ज्या सभेला मी स्वत: उपस्थित होतो) वळसे- पाटील हेच म्हणाले होते. त्या सभेचे सर्व मिनिटस्‍ही मजकडे आहेत पण पुढे काही झाले नाही. त्यावेळी मी सर्व नियम दाखवून दिल्यावर वळसे- पाटील म्हणाले होते की ’गरज भासल्यास रिक्रुटमेण्ट रूल्स बदलू’. पण त्याचेही काही झाले नाही, उलट वळसे- पाटीलच बदलले गेले. त्यांची गच्छंती झाल्यावर तंत्रशिक्षण सचिव श्री. सहारिया यांनी सर्व शासन निर्णय धाब्यावर बसवून नागपूरच्या हेमंत नागदिवे नामक सेवानिवृत्त दिवट्याला जेजे आणि कलासंचालनालयाच्या गादीवर आणून बसवले. रिक्रुट्मेंट रूल्स बदलणं हे त्यांचं प्रमुख काम होतं. पण तेव्हढं सोडून बाकी सारे "दिवे" त्यानी लावले. (त्यांनी काय काय "दिवे" लावले या सगळ्याचा परामर्ष ’चिन्ह’ लवकरच जाहिरपणे घेणार आहे) नागदिवे गेल्यानंतर आता कुणी वागदे नावाच्या डेप्युटी सेक्रेटरींना कलासंचालनायाचा प्रभारी केलं आहे. त्यांनी दहा पंधरा दिवसापूर्वी रिक्रुटमेंट रूल्स बदलण्यासाठी एक मिटींग बोलवली. मिटींगला कोण सर्व प्रभारी अधिष्ठाता. वारे प्रशासन! प्रभारी अधिकारी रूल्स तयार करणार आणि नंतर हे ते अंमलात आणणार. पण अंमलात आणण्यासाठी त्यांनीच बोलावलेल्या मिटींगमध्ये त्यांनी स्वत: थांबायला हवं तर ते नाही. मिटींग अर्ध्यावर टाकून ’आता पुढचे तुम्हीच करा’ सांगून त्यांनी थेट मंत्रालय गाठलं. हा असा आणि असला अडाण्याचा कारभार गेली सुमारे २० वर्षे  अव्याहतपणे कलासंचालनालयात सुरू आहे. या अशा ठिकाणी का आपण आपल्या मुलाला उच्च शिक्षणासाठी पाठवणार आहात?


या सगळ्यांच्या विरोधात काही निवडक कलाशिक्षक मित्रांच्या सहाय्याने मी २००३ सालापासून आवाज उठवण्यास सुरूवात केली. लोकसत्ता आणि अन्य वृत्तपत्रांच्या आणि वाहिन्यांच्या माध्यमातून अक्षरश: रान उठवलं. पदरचे दीडदोन लाख रूपये खर्चून तीनशे साडेतीनशे पानांचा जाडजूड ’चिन्ह’ चा ’कालाबाजार’ विशेषांक काढला पण थातूर मातूर कारवायांखेरीज काहीच झालं नाही. भ्रष्टाचाराला काहीसा आळा बसला, नाही असे नाही पण ज्यांनी हे घडवून आणलं त्या यामागच्या सूत्रधारांवर कारवाया काही झाल्या नाहीत. ज्यांच्या काळात हे बहुतांशी घडलं त्या तंत्रशिक्षण मंत्र्यांना केवळ पदावरच नव्हे तर मंत्रीपदावरही पाणी सोडावं लागलं पण खरे गुन्हेगार मात्र मोकळेच राहिले.


२००८ साली ’चिन्ह’चा कालाबाजार अंक प्रसिद्ध झाल्यावर या सार्‍याला पूर्णपणे आळा बसेल असे वाटले होते. पण नंतर लगेचच पाकिस्तानी अतिरेक्यांचा मुंबईवर हल्ला झाला आणि सरकारच बदलले गेल्यामुळे तोही प्रयत्न उधळला गेला. त्याचाच गैरफायदा घेऊन नंतरच्या वर्षभरात कलासंचालनालयात आणि जे जे स्कूल ऑफ आर्ट व अन्य कलाशिक्षण संस्थांत जो भ्रष्टाचार झाला तसा कलासंचालनालयाच्या संपूर्ण ५० वर्षाच्या कारकीर्दीत आणि जेजेच्या १५० वर्षाच्या इतिहासात झाला नसेल. त्या भ्रष्टाचाराची सारीच पाळंमुळं आता ’चिन्ह’ खणून काढाणार आहे. येत्या १जुलैपासून ’चिन्ह’च्या ब्लॉगवर या संदर्भात दररोज काहीना काही लिहिले जाणार आहे. आम्ही ही मोहिम आता थांबवणार नाही. जे जे आणि कलासंचालनालयाच्या शेवटच्या भ्रष्टाचार्‍याला गाडेपर्यंत ती तशीच चालू रहाणार आहे. तंत्रशिक्षण खातं जिंकतं की ’चिन्ह’ ते आता पाहूयाच.


अन्य राजकीय नेत्यांना हे सारं कळणं अवघड आहे. मुळातच त्यांना जेजे कलासंचालनालय वगैरे संस्था महाराष्ट्रात आहेत हे तरी ठाऊक असेल किंवा नाही याबाबत मला प्राथमिक शंका आहे. आपण स्वत: जेजेचे माजी विद्यार्थी असल्याने आपल्या कानावर सारा प्रकार घालणे अवघड जाणार नाही याच हेतूने ’निवडक चिन्ह’ च्या प्रकाशनास आपणास आमंत्रित केलं होतं. पण दुर्दैवाने अशा प्रकारच्या मोठ्या कार्यक्रमाच्या आयोजनाचा पूर्वानुभव नसल्याने आयोजनात आम्हीच कुठेतरी कमी पडलो आणि त्यातच एका दीड शहाण्या चित्रकाराने आपण भाषण करावयास उभे राहिले असताना काही बाही बोलून आपल्या एका कार्यकर्त्याच्या हातून कानाखाली आवाज काढून घेतल्याने मिडियाचा फोकस बदलून गेला. जेजेतील भ्रष्टाचाराचा इंट्रो होण्याऎवजी ’मनसेच्या कार्यकर्त्यांनी चित्रकाराला मारले’ हा इंट्रो झाला आणि ’चिन्ह’चा भ्रष्टाचारविरोधातला आणखी एक प्रयत्न पाण्याखाली गेला. असो. गतम्‍ न शोच्यम्‍


आपल्या चिरंजीवांनी जेजेमध्ये प्रवेशासाठी सीएटी दिल्याचे कानावर आले. तेव्हाच ठरवलं की आता या निमित्ताने आपणास एक अनावृत्त पत्र लिहायचे आणि या प्रश्नी लक्ष घालण्याची जाहीर विनंती करावयाची. मनसेच्या एका आमदाराला जरी आपण या प्रश्नी आवाज उठवायची सूचना दिलीत तरी पुरेसे आहे. त्या आमदाराने फक्त एक वर्ष पिच्छा पुरवायचा. विधानसभेत सातत्याने प्रश्न विचारायचे. (’चिन्ह’ यासाठी लागेल ती कागदपत्रे आणि माहिती पुरवेल) पहा पुढल्या वर्षी जूनमध्ये परिस्थिती बदललेली असेल की नाही ते! ज्यांनी हे सारं घडवलं ते अत्यंत चिरकुट लोक होते, चिंधी चोर होते. त्यांच्याविरूद्ध आधी कुणीच बोललं नाही म्हणून ते माजले. उन्मत्त झाले. त्यांचा माज आता उतरवायचा आहे. त्यासाठी तुमच्या पक्षाचा एक आमदारही पुरेसा आहे.

एवढं कराल ना?
महाराष्ट्रातील कलाविद्यार्थी, त्यांचे पालक, कलाशिक्षक आणि कलावंत तुमचे आयुष्यभर  ऋणी रहातील.

कळावे,
लोभ आहेच तो वाढावा ही विनंती.
तुमच्या सहकार्याच्या अपेक्षेत

सतीश नाईक,
संपादक “चिन्ह”

4 comments:

'चिन्ह' said...

test comments

'चिन्ह' said...

चिन्हला इमेलद्वारे प्रफुल्ल क्षीरसागर यांनी पाठवलेली ही प्रतिक्रिया
kal dinak 1.6 va ajj dinank 2.6 cha blog vachala manapasun avadala ..... hi satya paristhiti ahe yat atishayokti nahi he nakkich ... kala xetratil jastit jasta lokani ha blog nakkich vachava hi eccha .. va pranatna pan .... tuzya ya mohimech mi ABHINANDAN karto ......kahi madat laglyas nakki kalav

'चिन्ह' said...

अरुण मेश्राम यांनी चिन्हला इमेलद्वारे ही प्रतिक्रिया पाठवली
ajj chaha pitana to god vatala karan barobar blog vachayala milala , "raj thakarenna anavruta patra " vachala ... pan cat baddal lihinyasarkha barach kahi ahe yachi kalpana tulahi aselach tyavarahi prakash padava hich eccha ... baki tuze ABINANDAN asach pravas chalu thev ... mazyasarkhe nakkich tuzyabarobar julat jatil ..........tu lihito ho savanach thauk ahe ... pan BOLEL kon ? ashi avastha ahe .... chal parat ekda abhinandan .........

'चिन्ह' said...

अरुण मेश्राम यांनीच चिन्हला इमेलद्वारे पाठवलेली ही आणखी एक प्रतिक्रिया
ajjaschya bloge madhye memory drg baddal vachala .... memory drg che paper set karnare kon hote yacha shodh ghe .... memory drg che paper tapasnare je lok hote tyat 50 % ADHYPAK ase hote ki jyanyi ayushabhar faktha photography hach subject shikavala ..... etc... shri pravin parmar aurangabad... shri vinod mankar . nagpur ...