Monday, July 12, 2010

CD का शिडी? ( भाग 5 )

प्रश्न १ संगणकाला लागणार्‍या सीडीज् मागवताना यादीत ‘सीडी’ हा शब्द CD किंवा सीडी असा न लिहिला जाता ‘शिडी’ किंवा ‘शिडीज्’ असा लिहिला गेल्याने कलासंचालनालयात संगणकाच्या सीडीज्‍ऐवजी ऍल्युमिनियमच्या ‘शिडीज्’ अवतरल्या हे खरं आहे का?

उपप्रश्न अ) ज्याने सीडी ऐवजी शिडी लिहिले तो अल्पशिक्षित किंवा अशिक्षित (म्हणा हवं तर) अधिकारी कोण?

उपप्रश्न ब) त्याचं नाव जाहीर करू शकाल काय?

उपप्रश्न क) या अधिका-याची नेमणूकही महाराष्ट्र लोकसेवा आयोगानेच केली होती का?

उपप्रश्न ड) महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या तज्ज्ञाच्या पॅनलवर त्यावेळी कोणकोण होते? वडिलांच्या नावासकट त्या पॅनलवरच्या तज्ज्ञांची नावे आपण देऊ शकाल काय?

प्रश्न  २ कलासंचालनालयातले सर्वोच्च अधिकारी म्हणून सदर शिड्यांची यादी आपणाकडे मंजूरीसाठी आली होती का?

उपप्रश्न अ: ती वाचून त्यावर सही करून अंतिम कारवाईसाठी आपण ती पुढे पाठवली होती का?

उपप्रश्न ब: दिवसाच्या कोणत्या प्रहरी आपण त्या यादीवर सही केली होती? वेळ १ ते २४ आकडत्याच द्यावी. म्हणजे सायंकाळी ३ वाजता असेल तर १५:००, सायंकाळी ५ वाजता असेल तर १७.०० वगैरे.

उपप्रश्न क: यादी न वाचताच आपण त्यावर मंजुरीची सही केली असेल तर तसे स्पष्ट करावे(ते ही वेळेसकटच म्हणजे उदाहरणार्थ १ ते २४ वगैरे आकड्यात) त्याच बरोबर आपण तसे का केलेत याचाही खुलासा द्यावा.(खुलासा आटोपशीर भाषेतच असावा. उगाचच पाल्हाळ लावू नये.)

प्रश्न  ३ वर विचारलेल्या प्रश्नांप्रमाणे जर वस्तूस्थिती नसेल तर म्हणजे ‘सीडी ऐवजी शिडी’ वगैरे तर मग शिड्या आणि त्याही ऍल्युमिनियमच्या त्याही चार-दोन नव्हे तर चक्क २०-२५ किंवा २५-३० किंवा ३०-४० कलासंचालनालयात आल्या तरी कशा?

उपप्रश्न अ: शिड्या हव्यात अशी मागणी केली तरी कुणी?

उपप्रश्न ब: त्याही एवढ्या मोठ्या संख्येने मागवायची आयडियाची कल्पना कोणाची ?

उपप्रश्न क: ज्याने ही मागणी नोंदवली त्याने ती दिवसाच्या कोणत्या प्रहरी नोंदवली?

उपप्रश्न ड: त्याच्या वरिष्ठाने त्यावर ‘ओके’ची सहीसुद्धा दिवसाच्या कोणत्या प्रहरी दिली?

प्रश्न ४ आता या शिड्यांचं आपण काय करणार आहात?

उपप्रश्न अ: ज्याच्याकडून शिड्या आणल्या त्याला त्या लागलीच परत देता आल्या नसत्या का?

उपप्रश्न ब: त्या शिड्यांऐवजी विद्यार्थ्यांना उपयोगी ठरणारे अन्य साहित्य खरेदी करता आले नसते का?

उपप्रश्न क: ज्याने या शिड्या पुरवल्या त्याने त्या परत घ्यायला नकार दिला काय?

या लेखमालेचा अंतिम भाग वाचा उद्या

No comments: