तुम्हाला आर्ट कॉलेज काढायचंय?
अगदी असाच प्रश्न महाराष्ट्राच्या प्रख्यात-विख्यात-सुविख्यात आणि Xख्यात असलेल्या कला-संचालनालयानं विचारला. आणि त्याला हो-नाय, हो-नाय म्हणत महाराष्ट्रातल्या तब्बल ३५ हौशी, होतकरू, महत्त्वाकांक्षी कला महाविद्यालयाच्या चालक-मालक-संचालकांनी माना डुलवल्या.
झालं, मिटिंगचा दिवस ठरला ३ मे २०१०. मिटिंग होती छत्रपती शिवाजी स्थानकासमोरच्या त्याच त्या प्रख्यात जागेत ज्या वास्तुला महाराष्ट्राचं कलासंचालनालय म्हणून ओळखलं जातं त्या जागेत. संस्थाचालकांना त्यांच्यासोबत आणखी एका व्यक्तीला संस्थांची मूळ कागदपत्रं सोबत घेऊन येण्यासाठी मान्यता होती. ही बैठक होणार होती प्रभारी कलासंचालक, उप कला संचालक, कला निरीक्षक, उपकला निरीक्षक यांच्यासोबत.
३ मे उजाडला खरा, पण २ मे पासून मुंबईतल्या वाहतुकीच्या समस्येने पुरती दैना उडवून दिली होती. मोटरमननी पुकारलेल्या संपामुळे प्रवाशांची आणि मुंबईकरांची प्रचंड गैरसोय झाली होती. बसेस वगैरे कोंबून वाहत होत्या... या अशा स्थितीतच ते ३५ संस्थाचालक आणि त्यांच्यासोबत प्रत्येकी १ व्यक्ती या हिशोबाने आणखी ३५ जण असे एकूण ७० जण कलासंचालनालयात कसेबसे येऊन पोहोचले. रात्रभर प्रवास करून सकाळी ७ वाजता मुंबईत उतरलेले दुपारी दीडदीड दोन वाजेपर्यंत कलासंचालनालयात येत होते.
कोणी चंद्रपूरवरून आले, कोणी नागपूरवरून आले होते, कोणी औरंगाबादवरून आले ( येणार नाही तर काय, नाही आलात तर मान्यता देणार नाही, कोर्स अपग्रेडेशन देणार नाही अशा धमक्याच दिल्या गेल्या होत्या. ) त्यामुळे माडीवरची सगळी मंडळी खाली आली तरीपण भागाबाईचा मात्र काही पत्ता नव्हता.... कलासंचालनालयातर्फे ज्यांनी ज्यांनी उपस्थित राहणं गरजेचं होतं, त्यांच्यातल्यांनीच गैरहजेरी लावली.
या मिटिंगला उपकलासंचालक श्री झोंबाडे ( जे की मु.पो. कोपरखैरणे येथे राहतात. ) आणि उपकला निरीक्षक श्री. तिखे ( जे की मुं.पो. डोंबिवली येथे राहतात ) हेच गैरहजर होते. आता मालकच गैरहजर असल्याने या चालकांचा ( पक्षीःसंस्थाचालक ) जामच वैताग झाला, वेडात दौडलेल्या या ७० जणांनी मग कलासंचालनालयच डोक्यावर घेतलं. त्यांचं म्हणणं एकच होतं जर आम्ही चंद्रपूरवरून येऊ शकतो, जर आम्ही नागपूरवरून येऊ शकतो, जर आम्ही औरंगाबादवरून येऊ शकतो तर तुम्ही इथल्या इथे का नाही येऊ शकत? मालकांचा आराम, आणि चालकांचा निघालेला घाम यानंतर जेजेची बाजू सावरावी लागली ती जेजेच्या पालकांना अर्थात प्रभारी कलासंचालकांना. त्यांनी मंत्रालयातून येऊन कशीबशी मिटिंग घेतली ( पक्षीः उरकली ) आणि मग कोर्टात पडते तशी या मिटिंगला पुढची तारीख पडली १२ मे ची.
या ३५ संस्थाचालकांचं म्हणणं एवढंच होतं की मुंबई आणि उपनगरातील ही वाहतुकीची समस्या २ मे पासूनच तुम्ही लोक पाहत होता, मग आम्हाला किमान एसएमएस तरी टाकायचा की मिटिंग रद्द झाली आहे म्हणून, तेवढंही सौजन्य महाराष्ट्राच्या उपकला संचालक, उपकला निरीक्षकांकडे नाही काय? ( आता या ३५ आणि त्यांच्यासोबतच्या ३५ म्हणजे ७० जणांना कोणी सांगायला हवं की तुम्हाला असा प्रश्नच पडणं चुकीचं आहे. सौजन्य असतं तर????????? )
ही मिटिंग झाली असती तर कदाचित पुढल्या वर्षापर्यंत महाराष्ट्रभरात ३५ कलामहाविद्यालयं तरी उघडली असती. पण तसे होणे नव्हते. आता १२ मेलाच पुढे काय होईल ते ठरेल. तूर्तास १२ मेला ही अशी काही गडबड होणार असेल तर त्याआधीची तयारी म्हणून कलासंचालनालयातील संबंधित अधिकारी व्यक्तींनी टाटा-डोकोमोचं सिम कार्ड घेऊन ठेवायला हरकत नाही. त्यात दिवसाला १०० एसएमएस फ्री असतात. म्हणजे ७० जणांना मिटिंग रद्दचे एसएमएस पाठवले तरीही ३० उरतातच.
1 comment:
good that we came to know about this. talking about going to be world power! here we lack simple and plain use of mobil? it it so? or we just do not care about others,wasted, troublr they took to reach mumbai. who cares? so much for the love and cae for art!!
sanjeevani kher
.
Post a Comment