Thursday, April 29, 2010

कलेवर




प्रस्तुत लेख हा 'चिन्ह' वार्षिकाचे संपादक सतीश नाईक यांनी 'महाराष्ट्र माझा' ( संपादक- शिरीष पारकर ) या पाक्षिकाच्या १ मे २०१० च्या अंकासाठी लिहिला आहे. 'चिन्ह'च्या वाचकांसाठी आम्ही हा लेख या ब्लाॅगवर उपलब्ध करून देत आहोत.

महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली तेव्हा मी असेन साधारण पाचेक वर्षाचा. पण कशा कुणास ठाऊक त्यावेळच्या ब-याचशा आठवणी अद्यापही माझ्या स्मरणात रेंगाळून राहिलेल्या आहेत. उदाहरणार्थ सांगायचं झालं तर १ मे च्या त्या सायंकाळी वडिलांनी मला सचिवालय, गेटवे आॅफ इंडिया वगैरे रोषणाई दाखवत बेस्टच्या बसमधून मुंबईभर हिंडवलं होतं. मिळेल त्या वाहनाने त्या संध्याकाळी लोकं मुंबईभर फिरताना दिसत होते. सर्वत्र एकच उत्साहाचं, आनंदाचं अन् जल्लोषाचं वातावरण भरून राहिलेलं दिसत होतं. 'आता आपलं राज्य आलं', 'आता मराठी राज्य आलं', 'महाराष्ट्र राज्य स्थापन झालं', 'आता निश्चितपणे आपलं भलं होणार' अशा काहीशा भावना त्यामागे असाव्यात. फिरणा-या सर्वच लोकांच्या तोंडी मोरारजींच्या निषेधाच्या घोषणा होत्या आणि 'जय महाराष्ट्र'चा गजर.
मुंबईच्या ज्या उपनगरात मी रहात होतो तो चेंबुरचा परिसर त्याकाळी समाजवाद्यांचा बालेकिल्लाच होता. समाजवादी म्हणजे प्रजासमाजवादी, झोपडीवाले अन्य नव्हे. ( ते लालू-बिलू सगळे यादव हे अलिकडचे ) ज्या शाळेत मी शिकलो ती शाळाही समाजवाद्यांचीच होती. साहजिकच आधी साने गुरुजी कथामालेचे अन् नंतर चेंबूर सोडेपर्यंत म्हणजे ६८ सालापर्यंत राष्ट्र सेवादलाचे संस्कार मजवर झालेच. त्यामुळेच की काय कुणास ठाऊक लोहिया, सानेगुरुजी, एसएम, गोरे, दंडवते इतकंच काय पण डांगे, अत्रे ही नावंसुद्धा त्याकाळी मला ठाऊक होती असावी. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाविषयी सतत काहीना काही आजूबाजूच्या परिसरातून विशेषतः काॅलनीतल्या मैदानातून चाललेल्या सभांमधून ऐकावयास मिळत असे हे बहुधा हे 'असलं जनरल नाॅलेज' वाढण्यामागचं कारण असावं.
याच सभा-मेळ्यातून कधीतरी बहुधा शाहीर अमरशेख, शाहीर आत्माराम पाटील, शाहीर साबळे वगैरेंच्या नावांची ओळख झाली असावी. उठ उठ सह्याद्रे, घुमवीत बोल मराठी खडे, तांबडं फुटलं, सुटला वादळी वारा ( अमर शेख ) खुशाल कोंबडं झाकून धरा ( आत्माराम पाटील ), जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा... ( शाहीर साबळे ) सारखी गाणी याच सभा मेळ्यातून बहुधा प्रथम परिचयाची झाली असावीत. आणि मग रेडिओवर सतत वाजणा-या रेकाॅर्डसनी ती ओळख पक्की झाली असावी. दुरून जरी या गाण्याचे स्वर कानी पडले तरी अंगात एक विलक्षण चैतन्य पसरायचं. काय करू न काय नाही असं काहीतरी वाटून जायचं. त्या काळातली आणखीही काही गाणी आज आठवतात. उदाहरणार्थ माधव ज्युलियनांचं 'मराठी असे आमुची मायबोली' किंवा श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांचं 'बहु असोत सुंदर संपन्न की महा' ही ज्योत्स्ना भोळे यांनी गायलेली दोन गाणी. दिवसभरातून एकदा तरी ही गाणी हमखास रेडिओवर लागायची अन् मन उचंबळून जायचं, मोहरून जायचं.
वयोपरत्वे आता अनेकदा पुनःपुन्हा स्मरणरंजनात गुंतून जायला होतं. अशावेळी चार-पाच दशकापूर्वीची ही अन् अशीच असंख्य गाणी जी मी एका सीडीत काॅपी करून ठेवली आहेत, ती सीडी मी लावून बसतो. मन पुन्हा भूतकाळात फेरफटका मारून येतं. पण हल्ली का कुणास ठाऊक एखाद्या गाण्याच्या अंत-यात 'महाराष्ट्र' हा शब्द जरी आला तरी मी घाईघाईने 'नेक्स्ट'चं बटण दाबून पुढचं गाणं तरी लावतो किंवा ती सीडी ऐकणं बंद तरी करतो. ज्या गाण्यांवर, ज्या राज्यावर आपण खूप प्रेम केलं त्या गाण्यातला 'महाराष्ट्र' हा शब्द आता अंगावर काटा आणतो, शहारा आणतो. अगदी शिसारीच येते. शीsss
आपला महाराष्ट्र आता आपला राहिलेला नाही. माझी मुंबई आता माझी राहिलेली नाही. ज्या मुंबईत आपण जन्मलो, वाढलो, लहानाचे मोठे झालो ती मुंबईही आपल्याला आता परकी झाली आहे. ( कोण कुठला काल परवा मुंबईत आलेला परप्रांतिय सिक्युरिटीवाला आमच्याच शहरात आम्हाला हटकतो, 'एss कहा जाने का है' म्हणून विचारतो. आपल्या बॅगेत हात घालतो. नको नको तिथे स्पर्श करतो आणि हे सारं आपण हतबल होऊन पाहत राहतो. 'सुंदर मुंबई'चं, 'मराठी मुंबई'चं रुपांतर आता एका अक्राळ-विक्राळ पसरलेल्या महानगरात झालं आहे. आठवड्या-आठवड्याला मुंबईची स्कायलाईनच बदलत चाललीये. आता 'आपली मुंबई' ही गुरुदत्त किंवा देवानंदच्या ब्लॅक अँड व्हाईट सिनेमातच उरलीये ही जाणीव रोजच नव्याने अस्वस्थ करीत राहते.
वरच्या परिच्छेदात उल्लेखलेली 'शहारा, शिसारी किंवा शीsss' ज्या क्षेत्रात मी गेली ३०-३५ वर्षे आहे, त्या चित्र आणि शिल्पकलेच्या क्षेत्रातल्या महाराष्ट्राच्या आजच्या अवस्थेला उद्देशून जरी असली तरी महाराष्ट्राशी संबंधित प्रत्येक क्षेत्रालाच ती लागू होईल असं माझं प्रामाणिक मत आहे. पण पत्रकारितेत तब्बल वीस वर्षे काढूनही 'ज्येष्ठ पत्रकार' म्हणून मिरवत 'आपल्याला सर्वच क्षेत्रातले कळते' असा 'सोयीस्कर' समज मी करून घेतला नसल्याने किंवा तेव्हढी बहुश्रुतताही माझ्यापाशी नसल्याने मी माझे विश्लेषण हे माझ्या विषयापुरतेच मर्यादित ठेवतो आहे. संपादकांनी निवडलेले अन्य विषयातील तज्ज्ञ किंवा अभ्यासक त्या त्या क्षेत्रांचा योग्य तो समाचार घेतीलच. याविषयी माझ्या मनात कोणतीच शंका नाही.
तब्बल दीड-दोन दशकापूर्वी मंत्रालयातल्या तंत्रशिक्षण खात्यामधल्या एका 'तोंडपाटीलकी' करणा-या सचिवाने जागतिक कीर्तीचं जेजे स्कूल आॅफ आर्ट आणि भारतात एकमेव ठरलेलं 'कला संचालनालय' याची कबरच खणण्याचा जो घाट घातला तो आता महाराष्ट्राच्या सुवर्ण महोत्सवी वर्षातच पूर्णत्वाला गेला असल्याचं आता मान्यच करायला हवं. आपल्या जातभाईंवर विशिष्ट वर्गाकडून झालेल्या अन्यायाचा बदला घ्यायचाच या सूड भावनेने पेटलेल्या सदर सचिवाने पद ग्रहण करताच आधी आपल्या खात्यातून विशिष्ट वर्गातील लोकांना 'ठिकाणी' लावलं. ती साफसफाई होताच त्याने कलासंचालनालयाला हात घातला. सडवेलकर गेल्यानंतर तिथं वेड्यांचाच बाजार असल्याचं त्याच्या लक्षात येताच 'कला संचालनालय' हेच आता भविष्यात आपल्याला आपलं आयडियल माॅडेल बनवता येईल हे त्याच्या लक्षात आलं. आणि तो कामाला लागला. विशिष्ट वर्गाची पदं त्याने अक्षरशः तलवारीने कापावी तशी कापून काढली. आणि सर्वच मानाच्या पदावर त्याने आपल्या जातीची माणसं भरली. 'आपल्या जातीचा' म्हणून त्याने अनेक किंबहुना बहुसंख्यांना मानाच्या पदांवर बसवलं. ते पात्र आहेत का अपात्र हेसुद्धा त्याने पाहिलं नाही. किंबहुना अपात्रता हाच पात्रतेचा निकष ठरला. विशिष्ट वर्गाची पदं त्याने अक्षरशः दाबून टाकली, भरलीच नाहीत किंवा रद्दच केली. कोर्टाने आक्षेप घेतला पण सगळ्यांनाच त्याने अक्षरशः फाट्यावरच मारलं. विचारलं तर म्हणायचा, 'येमपीयेशीकडे पाठवलंय, येईल तेव्हा भरू!' त्यालाही आता सुमारे २०-२५ वर्षे झाली. अद्यापही ती पदं रिक्तच आहेत. एमपीएससीही अद्याप झोपलेलीच आहे.
जी अपात्र माणसं पात्र म्हणून त्याने मोठमोठ्या पदांवर आणून बसवली होती, त्यांनी लागलीच आपले रंग दाखवायला सुरुवात केली. एकाने तर तीन-चार महिन्यातच भरपूर पैसे खाऊन दीड-दोनशे विनाअनुदानित कलामहाविद्यालयांना मान्यता देऊन महाराष्ट्राच्या मानाच्या चित्रकला-शिक्षण परंपरेला धंद्यालाच लावले. दुसरा तर जेजे स्कूल आॅफ आर्टचं पीडब्ल्युडीचं
डिपार्टमेंट करून मोकळा झाला. कधीही जा हा आपला भिंतीची रंगरंगोटी करत बसलेला दिसायचा. साफसफाईचा याला एवढा षौक की जेजेच्या संग्रहातली कोट्यवधी रुपयांची दुर्मिळ चित्रंसुद्धा याने साबणाच्या पाण्याने धुवून घेतली आणि ती नाश झालेली पाहताच गच्चीवर नेऊन जाळून टाकली. तिस-याने तर जेजेच्या प्रत्येक सीटमागे लाख-लाख रुपये घेऊन जेजेत धंदाच उघडला. चौथा तर इस्सेभी भारी निकला, किमान पात्रता नसताना हा जेजेत लागला. स्वतःचं नाव, पत्ता लिहिण्याचीही लायकी नसताना हा प्राध्यापक झाला, मग विभागप्रमुख झाला. विभागप्रमुखाचा अधिष्ठाता झाला आणि सहा महिन्यातच अधिष्टात्याचा थेट कलासंचालक झाला. आणि शेतक-यांना दिल्या जाणा-या सुवर्णपदकांमध्ये घोटाळा करून महाराष्ट्र शासनाला मान खाली घालायला लावून मोकळा झाला. ( आता खरं तर तो तुरुंगात असायला हवा होता. पण लाँग लिव्हर असल्यासारखा घरात बसून पूर्ण पगार घेऊन तो मजा मारतोय. ) त्याच्या वर्गावर आता एकही कायमस्वरुपी शिक्षक नाही. ४० विद्यार्थी तब्बल चार वर्षाच्या अभ्यासक्रमात डोक्याला हात लावून बसलेत. ( या ही अभ्यासक्रमात मुंबई विद्यापीठाची अद्यापही मान्यता आहे बरं का? )
हे सारं अती झालं तेव्हा यातल्या एकेका प्रकरणाला वाचा फुटू लागली. पण मंत्रालयातही यांचे सारे जातभाईच असल्याने त्यांनी कुणावरच कसलीच कारवाई होऊ दिली नाही. दरम्यान ज्याने हे घडवलं तो सचिव सेवानिवृत्त झाला होता. त्या सचिवाने त्याच्या परीने सामाजिक पण निश्चित अशी भूमिका घेऊन हे सारं घडवलं पण त्याने निवडलेल्या नंतरच्या त्याच्या जातभाईंनी मात्र 'पैसा हाच परमेश्वर' मानून आपल्याच जातीतल्या लोकांनाही लुबाडायला मागेपुढे पाहिलं नाही. 'अपात्रता हीच पात्रता आणि पैसे देतो तो पूर्ण पात्र' हे तत्व स्वीकारल्याने त्या जातीतल्या पात्र उमेदवारांनाही डावललं गेलं आणि ज्यांनी पैसे फेकले त्या दगडांनाही मानाच्या पदावर आणून बसवलं गेलं. या नालायकांनी मंत्रालयातून असे काही कारनामे करवून आणले की चार-पाच वर्षातच ते अपात्र दगड प्राध्यापक- अधिष्ठात पदांवर अधिकार सांगू लागले. कलासंचालक व्हायची स्वप्न पाहू लागले. दुसरीकडे इतर वर्गातले गुणी शिक्षक मात्र २०-२०-२५-३० वर्षे नोक-या करून पदोन्नतीशिवाय गाढवांना साहेब साहेब म्हणून सेवानिवृत्त झाले, पात्रता असूनही आयुष्यभर भरडले गेले.
आज परिस्थिती अशी आहे, महाराष्ट्राचं कला संचालकपद अद्याप रिक्तच आहे. चारही शासकीय कला-महाविद्यालयातील अधिष्ठाता पदही रिक्तच आहेत. प्राध्यापक शिक्षक कर्मचा-यांची पदं तर किती रिक्त आहेत याची गणतीच नाही. त्या नालायक सचिवाने आणि त्याच्या सहका-यांनी अशा काही पाचरी मारून ठेवल्या आहेत की सरकारला आता तेथे नव्या माणसांच्या नेमणुकाही करता येत नाहीत. पैसे चारून आलेले सारेच नालायक ठरल्याने त्यांनाही आता सरकारला पदं देता येत नाहीत. वेळच्यावेळी पदोन्नती न दिल्याने कलासंचालक- अधिष्ठाता पदांसाठी कुणी गुणी उमेदवार नुसता अर्जही करू शकत नाही. अशी एकूण विचित्र आणि भयानक परिस्थिती आहे.
त्या नालायक सचिवानंतर जे जे म्हणून सचिव तंत्रशिक्षण खात्याला लाभले त्या सा-यांनीच जेजे आणि कला संचालनालयाच्या प्रश्नाकडे संपूर्णपणे दुर्लक्ष केलं. त्यामुळे तंत्रशिक्षण खात्यातले भ्रष्ट कारकूनसुद्धा माजले, इतके माजले की महाराष्ट्राच्या कलासंचालकपदावर बसलेल्या व्यक्तीला तो आपल्या टेबलासमोर उभे करून ठेवण्यात धन्यता मानू लागले. आणि भ्रष्ट ( आणि मूर्ख व आचरट ) कलासंचालक ढुंगणात शेपट्या सारून तासन् तास त्यांच्या टेबलासमोर उभं राहण्यात धन्यता मानू लागले.
जे जे आणि कलासंचालनालय प्रकरणात तंत्रशिक्षण खात्याची ( आणि मुंबई विद्यापीठाचीही पुरती बे-अब्रू झाली. एका माजुर्ड्या मंत्र्याची खुर्चीही गेली. पण सारेच्या सारे प्रश्न अद्यापी तसेच प्रलंबित आहेत. सरकारने काहीही केलं तरी समोरच्या दोन्हींपैकी एक पार्टी कोर्टात जाणार आणि स्टे आणणार हे उघड असल्याने सरकारला हे प्रश्न सोडवताच येणार नाहीत. यावर तंत्रशिक्षण खात्याचे विद्वान सचिव सहारिया यांनी मोठा नामी तोडगा काढला. त्यांनी चक्क एका सेवानिवृत्त कलाशिक्षकाला जो नागपूरला आपल्या अनोख्या कर्तृत्वामुळे तब्बल नऊ वर्षे हंगामी अधिष्ठाता पद भूषवित होता, ज्याच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होते, ज्याच्यामुळे नागपूर, औरंगाबादेत विद्यार्थ्यांनी संप केले होते अशाच माणसाला आधी जे जे स्कूलच्या अधिष्ठाता पदी ( तेही त्याची शैक्षणिक पात्रता नसताना, शासकीय आदेश धाब्यावर बसवून ) आणि नंतर राज्याच्या कलासंचालकपदी बसवले. गेल्या एका वर्षात त्याने तिथे एवढे गोंधळ घातले की गेल्या ४० वर्षातले सर्वांनी घातलेले गोंधळ त्यापुढे काहीच नाहीत, असं कला संचालनालयातले माहितगार सांगतात.
सांगायचा मुद्दा असा की, हे असंच रेटत रेटत आणखी थोडीथोडकी वर्षं पुढे नेलं जाईल. नव्या नेमणुका करता येत नसल्याने सेवानिवृत्त भ्रष्ट शिक्षकांना इथे आणून बसवलं जाईल व कलाशिक्षणाच्या नावाखाली स्वतःच्या तुंबड्या भरवल्या जातील. शिक्षक नाही, व्यवस्था नाही ही अवस्था पाहून हळूहळू विद्यार्थी येईनासे झाले की तोट्यात चालतंय, विद्यार्थीच मिळत नाही असं भासवून जे जे स्कूल आॅफ आर्ट बंद केलं जाईल. ती प्रचंड जागा नंतर कवडीमोलाने एखाद्या राजकारण्याला नाहीतर उद्योजकाला फुंकून टाकली जाईल किंवा सरकारी अधिका-यांच्या गृहनिर्माण संस्थेला ती देऊन टाकली जाईल. आणि जे जे स्कूल आॅफ आर्ट या विषयावर कायमचा पडदा टाकला जाईल.
थोडक्यात महाराष्ट्राचं सुवर्ण महोत्सवी वर्ष सुरू असता जे जे स्कूल आॅफ आर्ट आणि कलासंचालनालय यांचं आता निदान अस्तित्व तरी दिसतंय. आणखी २५ वर्षांनी जेव्हा महाराष्ट्र अमृतमहोत्सवी वर्ष साजरं होईल तेव्हा ते असेलच याची आता कुठलीच शाश्वती उरलेली नाही. महाराष्ट्रातल्या भावी चित्रकारांना शिकावयासाठी आता महाराष्ट्रात एकही कला महाविद्यालय राहिलेलं नाही. सगळ्यांचा बट्ट्याबोळ झाला आहे. ही वस्तुस्थिती आहे. जागतिकीकरणाच्या झपाट्यात आज शिक्षणाला प्रचंड महत्त्व आलेलं असताना भारतात जिने कलाशिक्षणाचा पाया घातला, गायतोंडे, बरवे, सूझा, रझा, हळदणकर, पळशीकर, धुरंधर, तासकर, सातवळेकर, करमरकर, पदमसी, तैय्य, अरुण कोलटकर, कोलते यांच्यासारख्या शेकडो कलावंतांचं व्यक्तिमत्व ज्या संस्थेने फुलवलं त्या संस्थेची ही अशी एवढी भीषण आयझेड अवस्था झाली असताना महाराष्ट्राच्या गेल्या ५० वर्षांच्या चित्रकला आणि शिल्पकलेचा काय घंटा आढावा घेणार?
संपादक महोदय,
हे २०१० साल आहे आणि महाराष्ट्राचं पन्नासावं वर्ष. आणखी २५ वर्षाने म्हणजे २०३५ साली जेव्हा महाराष्ट्राचं अमृतमहोत्सवी वर्ष साजरं होईल तेव्हा तुमचा अंक २५ वर्षांचा झालेला असेल. तोपर्यंत मी जगलो वाचलोच तर ८० वर्षांचा झालेला असेल. महाराष्ट्राच्या अमृतमहोत्सवी वर्षी आणि तुमच्या अंकाच्या रौप्य महोत्सवी वर्षी पुन्हा महाराष्ट्राच्या ७५ वर्षाचा कर्तबगारीचा आढावा घेणारा अंक काढणार असाल तर तेव्हा मात्र कृपा करून मला लिहायची गळ घालू नका. कारण तोपर्यंत जे जे स्कूल आॅफ आर्टच्या जागी एखादा माॅल किंवा सरकारी अधिका-यांचा निवासी टाॅवर किंवा एखादी इन्व्हर्टर कंपनी ( तेव्हाही वीज टंचाई असेलच ) असं काहीबाही झालेलं असेल आणि महाराष्ट्रातून कलेचं आणि कलाशिक्षणाचं संपूर्णपणे उच्चाटन झालेलं असेल आणि या सा-यावर पुनःपुन्हा लिहिणं म्हणजे मरण यातना भोगणं होय. तर तेव्हा तेवढा त्रास कृपया तुम्ही मला त्या वयात देऊ नका, अशी या वयातच आगाऊ(पणे) विनंती करून ठेवतो, कसे?
अमृतमहोत्सवी वर्षाच्या वेळी महाराष्ट्राच्या सत्तास्थानी आपलाच पक्ष असेल याविषयी माझ्या मनात कुठलीही शंका नाही, पण तुमच्या मुख्यमंत्र्यांना मात्र दादाभाई नौरोजी मार्गावरून मंत्रालयात जाताना गाडीत शेजारी बसलेल्याला सांगावं लागेल की हा जो मोठा माॅल दिसतोय किंवा हा जो माजी सरकारी अधिका-यांचा टाॅवर दिसतोय ना, तिथं आमचं जे जे होतं तिथंच मी शिकलो वगैरे... हे आपलं जाता जाता सहजच....
सतीश नाईक
संपादक- चिन्ह वार्षिक

6 comments:

शर्मिला said...

मराठी ब्लॉगविश्वात 'चिन्ह'चं स्वागत! खूप छान वाटलं चिन्हने ब्लॉग काढलेला पाहून.

लेख सुरेख झाला आहे." 'सुंदर मुंबई'चं, 'मराठी मुंबई'चं रुपांतर आता एका अक्राळ-विक्राळ पसरलेल्या महानगरात झालं आहे. आठवड्या-आठवड्याला मुंबईची स्कायलाईनच बदलत चाललीये. आता 'आपली मुंबई' ही गुरुदत्त किंवा देवानंदच्या ब्लॅक अँड व्हाईट सिनेमातच उरलीये ही जाणीव रोजच नव्याने अस्वस्थ करीत राहते." >>> हे अगदी मनापासून पटलं.

कलाविश्वातील घडामोडींबद्दल, कलाकार आणि कलानिर्मितीबद्दल नियमित या ब्लॉगवर वाचायला मिळेल याची खात्री आहे. शुभेच्छा!

मराठी ब्लॉग्ज ईन्डेक्समधे ब्लॉग जोडला गेला तर सर्व ब्लॉगवाचकांना अपडेट्स सहज उपलब्ध होऊ शकतील. त्यासाठी या लिन्कला भेट द्या >>> http://marathiblogs.net/

'चिन्ह' said...

धन्यवाद, शर्मिला तुझी प्रतिक्रिया उत्साह वाढवणारी आहे. आम्ही तू व्यक्त केलेल्या विश्वासाला पुरेपूर उतरण्याचा प्रयत्न करू...
- कमलेश देवरुखकर

'चिन्ह' said...

ज्येष्ठ चित्रकार प्रभाकर कोलते सध्या जपान दौ-यावर आहेत. त्यांनी ब्लॉग वाचून 'चिन्ह'ला इमेलद्वारे पाठवलेली ही प्रतिक्रिया-

Dear Satish,
I have just read your article in Chinha Blog. Its good and I hope it will reach to appropriate readers who will burry their differences and unite themselves to respond positively to it and due to their strength some miracle may take place to save J.J. and art in maharashtra.
I also hope the concerned authority who has recently designed the policy of Education and Culture in Maharashtrea to recommence the affair of art and culture on a healthy note that tunes with the celebration of 50 years of the state. I hope they read your article and take it seriously.

I will wait for the next Blog.
With best wishes and regards,

Prabhakar Kolte

PravinDhopat said...

सतीश नाईक,

सप्रेम नमस्कार

ब्लॉग अतिशय देखणा आहे.(हे आपलं उगाचंच) 'महाराष्ट्र माझा' मध्ये प्रकाशीत झालेला तुमचा लेख मी आतापर्यंत दहाएक वेळा वाचला आहे. तेव्हा छापायचा होता म्हणून... आता छापलेला आहे म्हणून. उत्तरोत्तर त्यातली गंम्मत वाढत जाते. 'मी महाराष्ट्राचा महाराष्ट्र माझा' पाक्षिकाचा उल्लेख केल्याचे सौजन्य दाखवलेत त्याबद्दल आभारी.

हा ब्लॉग रोज अपडेट करणार अहात का? अर्थात (तुमच्या स्टाईलला) मटेरियल पुरवायला महाराष्ट्र सज्ज आहे.

शुभेच्छा.

कमलेश ओळखलस?

प्रवीण धोपट

PravinDhopat said...

सतीश नाईक,

ब्लॉगच्या देखणेपणाबद्दल वरील आगाउपणा आणि अपेक्षा अशासाठी की आपण चित्रकार आहात. आपला ब्लॉग वाचनीय आणि प्रेक्षणीयही असायला हवा.

प्रवीण

'चिन्ह' said...

नमस्कार प्रवीणजी

प्रथम माझ्याकडून ( कमलेश ) आपले मनःपूर्वक आभार. याचे कारण आपण 'महाराष्ट्र माझा' या पाक्षिकाचे उपसंपादक झाला आहात त्याबद्द्ल. आपल्यासारख्या जाणत्या लोकांनी १ मे च्या अंकात कलेवर हा लेख प्रसिद्ध केल्याबद्दल पुन्हा एकदा आभार. हा ब्लॉग आम्ही रोज अपडेट करणार आहोत. तसेच त्यात अनेक गमतीजमती करण्याचेही योजिले आहे. अर्थात काही तांत्रिक अडचणी येत आहेत, पण त्यावर हळूहळूच मात होईल. एक खात्री मात्र नक्की आपण दर २४ तासांनी एकदा या ब्लॉगला भेट दिल्यास त्यात तुम्हाला नवीन काहीतरी नक्कीच आढळेल. आपण त्यावर आपल्या प्रतिक्रिया द्याल ही खात्रीही आहे.
राहता राहीलं एक- आपल्या स्टाईलचं मटेरियल पुरवायला महाराष्ट्र सज्ज आहे असं आपण म्हणालात, वाईट हेच वाटतं की ब्रशऐवजी लेखणीचे फटकारे चालवण्यात वेळ वाया घालवणं ही आमची स्टाईल नव्हे पण तसं मटेरियल दुर्दैवाने महाराष्ट्रात भरपूरच असल्याकारणाने आम्हाला ती स्टाईल पत्करावी लागली. पण आता आपल्या पाक्षिकाने आमचा भार थोडाफार हलका झाला आहे अशी आम्ही आशा बाळगली तर ती गैर ठरू नये असे वाटते. जर महाराष्ट्राच्या कलाविश्वातल्या भ्रष्टाचाराला आणि अनागोंदीला आपण 'खास मनसे स्टाईलने' चपराक लगावलीत तर मात्र आम्हाला लेखणीऐवजी ब्रश हातात धरण्यास थोडाफार वेळ मिळेल. त्याचे आगाऊ आभार आम्ही आत्ताच मानुन ठेवावेत काय???

पुन्हा एकदा नमस्कार, आणि धन्यवाद.
कमलेश देवरुखकर