जेजे स्कूल ऑफ आर्टमध्ये सीइटीची परीक्षा देऊन प्रवेश घेऊ इच्छिणा-या विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांसाठी
जेजेची सध्याची शिक्षक अवस्था एकूण जागा ५१
१- अधिष्ठाता ( पद रिक्त )
रेखा व रंगकला विभाग
२- प्राध्यापक (४ पैकी ३ पदं रिक्त)
३- अधिव्याख्याता (१६ पैकी ८ पदं रिक्त)
शिल्पकला विभाग
४- प्राध्यापक (पद रिक्त)
५- अधिव्याख्याता (३ पदं रिक्त)
६- फोरमन (पद रिक्त)
७- फौंड्री असिस्टंट (पद रिक्त)
कला व हस्तकला विभाग
८- प्राध्यापक (पद रिक्त)
टेक्सटाईल विभाग
९- अधिव्याख्याता (३ पैकी १ पद रिक्त)
१०- तंत्रसहाय्यक (पद रिक्त)
इंटिरिअर
११- अधिव्याख्याता (३पैकी २ पदं रिक्त)
१२- गॅस वेल्डर (पद रिक्त)
मेटल क्राफ्ट
१३- अधिव्याख्याता (३ पैकी ३ पदं रिक्त)
सिरॅमिक
१४- अधिव्याख्याता (पद चक्क भरलेले आहे)
१५- तंत्रसहाय्यक (हे ही पद चक्क भरलेले आहे)
१६- कुंभार/ परिचर (पद रिक्त)
कलेचा इतिहास
१७- प्राध्यापक (प्रा. मनीषा पाटील यांची नागपूरहून बदली झाल्याने आता हे पद १५ वर्षांनंतर भरले गेले आहे असे म्हणता येईल)
१८- अधिव्याख्याता (दोन्ही पदं रिक्त)
कलाशिक्षण विभाग
१९- प्राध्यापक (पद रिक्त)
२०- अधिव्याख्याता (दोन्ही पदं रिक्त)
या ५१ जागांपैकी फक्त १९ जागांवरच कायमस्वरुपी शिक्षकांच्या नेमणुका करण्यात आलेल्या आहेत. १३ जागी हंगामी शिक्षकांच्या नेमणुका करण्यात आलेल्या आहेत. तर ४ जागी कंत्राटी शिक्षकांच्या नेमणुका करण्यात आलेल्या आहेत. अन्य १५ पदं चक्क रिक्त आहेत. गेली २० वर्ष हे असेच चालले आहे.
यापैकी ८ क्रमांकावरील कला व हस्तकला विभागाच्या प्राध्यापकांचे पद आम्ही मुद्दामच रिक्त आहे असे म्हटले आहे कारण या पदावरील इसमाला सरकारतर्फे शेतक-यांना दिल्या गेलेल्या सुवर्णपदकांच्या घडणीत घोटाळा केल्याबद्दल निलंबीत केले आहे. खरे तर हा इसम आता तुरुंगातच असावयास हवा होता. पण तो आता मुंबईच्या असह्य उकाड्यापासून बचाव करण्यासाठी थंड हवेच्या ठिकाणी असलेल्या आपल्या बंगल्यात बसून मस्त मजा मारतोय. यासाठी महाराष्ट्र शासन त्याला घरी बसून काहीही न करता ७५% पगार नेमाने घरपोच देत असते. असो. या भाग्यवंत इसमाचे नाव लक्ष्मण आयवले असे आहे. हे गृहस्थ ज्या मेटल क्राफ्टच्या वर्गावर शिकवत(?) होते त्या वर्गावरील एका हंगामी शिक्षकाला शिवसेनेच्या महिलांनी भर दिवसा भर कॉलेजमध्ये बदड बदड बदडले होते. त्यानंतर तो शिक्षक नाहीसा झाला. आता या वर्गावर एकही कायमस्वरुपी शिक्षक नाही. मध्ये तर अशी परिस्थिती होती की तब्बल १५ ते २० दिवस शासनाकडून हंगामी शिक्षकाच्या नेमणुका न झाल्याने या विषयाच्या चारही वर्गावर एकही शिक्षक नव्हता. या अभ्यासक्रमाला मुंबई विद्यापीठाची मान्यता आहे. आणि मुंबई विद्यापीठ हे सारे कसे चालवून घेते हे आता कुणीतरी मुंबई विद्यापीठालाच विचारायला हवे. अभ्यासक्रमाला मान्यता देणारी मुंबई विद्यापीठाची समिती वर्षानुवर्षे हे सारे कसे चालवून घेतेय याचं आश्चर्य वाटतं.
आणखी एक गंमत- रेखा व रंगकला विभागात प्राध्यापकांचं जे पद भरलं आहे ते आहे 'चिन्ह'ने कालाबाजार अंकात किंवा ताज्या अंकात ज्यांच्याविषयी प्रामुख्यानं लिहिलं त्या प्राध्यापक(?) विश्वनाथ साबळे यांचं. प्राध्यापकांची इतर तिन्ही पदं रिक्त आहेत. याचाच अर्थ असा की जेजेमध्ये किंवा नागपूर, औरंगाबाद येथील तिन्ही कलामहाविद्यालयात प्राध्यापक साबळे हे आता सर्वात ज्येष्ठ प्राध्यापक गणले जातात. पण असं असतानाही त्यांच्यापेक्षा ज्युनियर असलेल्या प्राध्यापिका मनीषा पाटील यांची जेजे स्कूल ऑफ आर्टच्या अधिष्ठातापदी प्रभारी म्हणून नेमणूक केली गेली तरी कशी? हा साबळे यांच्यावर धडधडीत अन्याय (?) आहे. जेजेचं सोडा नागपूरच्या कलामहाविद्यालयात प्राध्यापक नसलेल्या फक्त लेक्चरर असलेल्या श्री दारोकर यांना तिथल्या अधिष्ठातापदाचा चार्ज दिला पण साबळेंना मात्र सरकारने तिथे पाठवलं नाही. हे कसं??? निदान औरंगाबादला तरी पाठवायचं. पण तेही पाठवलं गेलं नाही. अवघ्या पाच वर्षात अधिव्याख्याताचा प्राध्यापक झालेल्या साबळेंचे गुण आता शासनास का बरं दिसत नाहीत. का यातही काही तरी गोम आहे असं समजायचं?
आणखी एक अफलातून धमाल गोष्ट- महाराष्ट्र शासनाचा कारभार किती बेशरमपणे हाकला जातोय याचा हा घ्या एक धडधडीत पुरावा. प्रा. मनीषा पाटील या जेजेच्या प्रभारी का होईना अधिष्ठाता आहेत. पण त्या बिचा-या ट्रेनमध्ये धक्केबुक्के खात प्रवास करून दररोज कॉलेजला येतात आणि त्यांच्या हाताखाली असलेला एक हंगामी शिक्षक मात्र चक्क जेजे स्कूल ऑफ आर्टच्या डीनच्या बंगल्यात, जिथं रुडयार्ड किपलिंग जन्मला तिथं मोठ्या ऐशोआरामात राहतो आहे. विश्वास बसत नाही ना? म्हणूनच पुरावा देतोय. या लेखाच्या शीर्षकाजवळ जे छायाचित्र दिलं आहे ते डीन बंगलोचेच आहे. आणि या बंगल्यात पोर्चमध्ये जी मारुती कार दिसते आहे ती त्या शिक्षकाचीच कार आहे. या शिक्षकाचं नाव श्रीशैल शिंत्रे असे आहे. जेजेच्या शिल्पकला विभागात ते डिप्लोमाच्या वर्गात म्हणे विद्यार्थ्यांना शिकवतात. कलासंचालनालयातर्फे जी सीईटीची परीक्षा घेतली जाते त्या परीक्षेच्या पॅनलवर गेली तीन वर्षे श्री शिंत्रे काम करीत होते. यंदा चौथ्या वर्षीही त्यांना म्हणे या पॅनेलवर पुन्हा नेमण्यात आले आहे. ( असं पुन्हा पुन्हा एखाद्या शिक्षकाला, जो हंगामी आहे, सीइटीसारख्या महत्त्वाच्या परीक्षेच्या पॅनलवर नेमता येतं का? ) बहुधा विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना भेटीगाठीसाठी सोपे जावे म्हणून श्री शिंत्रे यांना डीनच्या बंगल्यात जागा दिली असावी असे जेजेच्या परिसरात म्हटले जाते. तंत्रशिक्षण खात्याचे प्रधान सचिव सहारिया साहेबांची आता गच्छन्ती ( पक्षी: बदली) झाली आहे. त्यामुळे ते काही या प्रकरणाचं उत्तर देऊ शकणार नाहीत. ते असते तर त्यांनी पुरावा मागितला असता. हे आम्हाला ठाऊक होतं म्हणून आम्ही छायाचित्रही काढून ठेवलं होतं. आता ते नाहीत. त्यामुळे याप्रकरणी नवीन तंत्रशिक्षण सचिव श्री महेश पाठक यांनाच खुलासा करावा लागणार आहे. याची आम्हाला कल्पना आहे. म्हणूनच पाठकसाहेबांना आम्ही थेटच प्रश्न विचारतो यावर काही कारवाई करणार का गेली वीस ते पंचवीस वर्ष तंत्रशिक्षण सचिव ज्या पद्धतीनं जेजेची सर्व प्रकरणं दाबून टाकत होते तीच गादी आता पुढे चालवणार???? सहारियांनी जे 'दिवे' लावलेले आहेत ते पाठकसाहेब विझवतात का ते आपण नुसतं पाहायचं...
1 comment:
sanjeevani says,
It is disgusting. makes one feel depressed. when will our gov wakeup? such a sorry state of affairs of art, in this so called progresive state!shame on us all that we tolerate this type of thing . playing with the future of students and artworld. where will our students go?
sanjeevani kher
Post a Comment