जेजे स्कूल ऑफ आर्टमध्ये 'स्कूल ऑफ आर्ट' पाहायला किंवा रुडयार्ड किपलिंगचा बंगला पाहायला सातत्याने परदेशी पर्यटक भेट देत असतात. असंच एकदा रुडयार्ड किपलिंग यांचा बंगला पाहण्यासाठी काही परदेशी नागरिक जेजेमध्ये प्रवेशले. जेजे अप्लाईडमधून सेवानिवृत्त झालेले ज्येष्ठ प्राध्यापक त्यांच्यासोबत होते. जेजेच्या इमारती पाहून ही मंडळी थेट बंगल्याच्या आवारात शिरली. त्यांच्यासोबतचे ज्येष्ठ प्राध्यापक त्या बंगल्यात काही काळ राहून गेले असल्यामुळे त्या बंगल्याची आणि परिसराची एकूण अवस्था पाहून अतिशय अस्वस्थ झाले होते. त्यातच त्या परदेशी नागरिकामधल्या एकाने त्या शिक्षकांना थेट सांगितलं की 'खूप उकडतंय, मला एक बीअर मिळेल का?' ते शिक्षक चक्रावलेच. हा असं काय बोलतोय त्यांना कळेचना. त्या माणसाला काय उत्तर द्यावं हे ही त्यांना कळेना. ते काहीतरी बोलणार इतक्यात त्या माणसाने त्यांना बंगल्याच्याच खिडकीजवळ पडलेला दारुच्या बाटल्यांचा ढीग दाखवला. देशी-परदेशी दारुच्या असंख्या बाटल्या तिथे विसावल्या होत्या. त्यात बीअरचे रिकामे टीनही दिसत होते. आता त्या शिक्षकांच्या डोक्यात प्रकाश पडला. त्यांनी त्या परदेशी नागरिकाला समजावले की तुझा काहीतरी गैरसमज झालाय. इथे काय हॉटेल-बिटेल नाही किंवा येणा-या जाणा-या परदेशी पर्यटकांसाठी अशी काही सर्विस ठेवलेली नाही. या बाटल्या इथे अशाच कोणीतरी आणून टाकल्या आहेत असं म्हणून त्याने कशीबशी वेळ मारून नेली. इतक्यात त्यांच्यासोबत आलेली महिला बंगल्याच्या खिडकीतून आत पाहून आरडाओरडा करू लागली. such a nice, superb, very inteligent, very creative वगैरे असं ओरडून ती त्या सर्वांना 'ते' बघायला जवळ या म्हणून खुणावू लागली. आपण इतकी वर्ष इथे राहत होतो आणि आपल्याला इथे काही क्रिएटिव्ह दिसलं नाही, हिला कुठून दिसलं असा प्रश्न त्या शिक्षकांना पडला आणि त्यांनीही त्या काचेतून डोकावून पाहिलं तर दीडशे वर्ष जुन्या असलेल्या त्या हेरिटेज बंगल्याच्या दिवाणखान्यात अनेक आडव्या तिडव्या दो-यांवर असंख्य कपडे वाळत घातलेले दिसले. त्यातल्या दोन-तीन लाल जर्द लंगोटांना आणि तीन चार ज्यांग्यांना पाहून ती परदेशी बाई ओरडत होती. तिला बहुधा हा इन्स्टॉलेशनचा प्रकार वाटला असावा. दिवाणखान्यातलं ते भयंकर दृश्य पाहून ते शिक्षक मात्र गोरेमोरे झाले पण लगेचच त्यांनी स्वतःला सावरलं आणि त्या सर्वांना बंगल्याच्या कंपाऊंडमधून शिताफीने बाहेर नेलं.
रुडयार्ड किपलिंगचा जन्म झालेल्या त्या बंगल्याची सध्याची अवस्था ही अशी आहे. यात किंचितही अतिशयोक्ती नाही. ज्या बंगल्यात कोणे एके काळी जेजेचे विद्यार्थीच नव्हे तर शिक्षक प्राध्यापकसुद्धा पाय टाकण्यास दबकत असत त्या या बंगल्याचं सध्या गेस्ट हाऊसमध्ये रुपांतर झालेलं आहे. महाराष्ट्राच्या कानाकोप-यातून कुणीही आणि कधीही येतं. हवं तितका काळ राहतं. च़ड्ड्या, लंगोट, ज्यांगे दोरीवर वाळत घालतं आणि सुकले का निघून जातं.
खोल्याखोल्यातून कामचलाऊ फर्नीचर पडलेलं आहे. पेपर तपासायला आलेल्या शिक्षकांसाठी गाद्या-गिरद्या आणून टाकलेल्या आहेत. त्यांच्या वळकट्या अस्त्याव्यस्त पसरलेल्या दिसतात. वेळीच तेलपाणी न केल्याने या दीडशे वर्ष जुन्या बंगल्याचा कुठलाही भाग कधीही कुठल्याही क्षणी खाली येऊ शकतो. वाळवीचं साम्राज्य संपूर्ण बंगलाभर पसरलेलं आहे. बंगला ज्यावेळी वापरात होता त्यावेळच्या अधिष्ठात्यांनी लावलेली झाडं मरून गेली आहेत. वृक्ष-वेली कुजून गेल्या आहेत. बंगल्याच्या सुंदर हिरवळीचं संपूर्ण वाळवंटात रुपांतर झालंय. या अशा अवस्थेत या बंगल्यात गेली दीड वर्षं भूतासारखी एकच व्यक्ती राहते आहे. ती म्हणजे जेजे स्कूल ऑफ आर्टचे हंगामी शिक्षक श्रीशैल शिंत्रे. सुमारे दीड वर्षांपूर्वी श्री शिंत्रे हे तंत्रशिक्षण सचिव श्री सहारिया यांच्या कृपेने जेजेमध्ये अधिष्ठाता म्हणून आलेल्या श्री हेमंत नागदिवे यांना सोबत करण्यासाठी म्हणून या बंगल्यात प्रवेशले. पण सुमारे तीन महिन्यांपूर्वी श्री नागदिवे यांची गच्छन्ती झाल्यावरसुद्धा श्री शिंत्रे गेली तीन-चार महिने तिथेच राहत आहेत. हा काय प्रकार आहे???? हे कुठलं प्रशासन आहे??? श्री शिंत्रे यांच्यासाऱख्या हंगामी शिक्षकाला दीडशे वर्ष जुन्या आणि हेरिटेजचा 'अ' दर्जा मिळालेल्या विशालकाय अशा बंगल्यात राहण्याची परवानगी दिली तरी कोणी??? आणि का दिली? हा शासननिर्णय कोणी घेतला? राज्यपालांच्या सहीने तसा काही आदेश निघाला आहे का? का हे दस्तुरखुद्द सहारियांचं कर्तृत्व? की हे स्वतः नागदिवे साहेबांनीच लावलेले दिवे??
गेल्या चार महिन्यात श्री शिंत्रे यांना कुणीच कसा जाब विचारला नाही? शिंत्रे यांच्या पगारातून गेल्या दीड वर्षात निदान 'एचआरए' तरी कापला गेला आहे का? नसेल कापला तर का नाही कापला? ज्यांच्या हातात या बंगल्याची व्यवस्था सध्या आहे त्या उपकला संचालक रो.ज. झोंबाडेसायेब यांनी शिंत्रे यांना का नाही जाब विचारला?? या तीन-चार महिन्याचं बंगल्याचं भाडं तरी त्यांनी शिंत्रे यांच्याकडून वसूल केलंय का? का स्वतः झोंबाडेसायेब काही वर्षांपूर्वी वांद्र्यातल्या जेजेच्या हॉस्टेलमध्ये शासनाला फुटकी कवडीही न देता तब्बल दोन ते तीन वर्ष तसेच ( फुकटात ) राहत होते म्हणून तर नाही ना शिंत्रेंवर ही खास मेहेरबानी????
जर त्या बंगल्यात काही अघटीत घडले असते तर त्याची जबाबदारी सहारियासाहेब घेणार होते? का नागदिवेसाहेब? की झोंबाडेसाहेब? शिंत्रे यांच्यासारख्या हंगामी शिक्षकांवर ही मेहेरबानी कुणी केली याचं उत्तर तंत्रशिक्षण खात्याने आता द्यायलाच हवं. जेजेची 'प्रभारी' का होईना पण डीन झालेली व्यक्ती ट्रेनमधून धक्काबुक्की करून रोज जेजेत येते आणि जेजेतला एक हंगामी शिक्षक मात्र खुशाल दीडशे वर्ष जुन्या हेरिटेज बंगल्यात सगळ्यांच्या नाकावर टिच्चून राहतो, हे असलं बेशरम महाराष्ट्राचं प्रशासन. हे सारं आम्ही पुराव्यानिशी छापलं आहे. नवे तंत्रशिक्षण सचिव श्री महेश पाठक आतातरी संबंधितांना जाब विचारणार आहेत का?
आयत्या बंगल्यावर 'नागोबा'- पार्ट ३ उद्या वाचा.
3 comments:
shasanachi zop udavnare patrakaritchya angane janare aritcle utkrushta aahe. aaplya ya ariclemule patrakaranchi zop udu shakate. krantikumar odhe
faarach vaait aahe . purvi hanumante sar hote tevhaa kunihi bangalyaat yet nase. maazi bahin jj madhe shikat hoti tevha mi 8 varshacha hoto. tevhaa hanumante saraanchaa pahunaa mhanun mi 8-10 divas hya bangalyat rahilo hoto. vatvaghalyaachi khaan sodali tar baki sarva thikani saaf ase.
Thanks for throwing light on such disgusting thing...shame...same on maharashtra Govt.
Post a Comment