पोलीस कमिशनरच्या कार्यालयापासून अंजुमन इस्लाम शाळेपर्यंतचा जेजेचा संपूर्ण निसर्गरम्य परिसर जेजे स्कूल ऑफ आर्टच्या डीनच्या अखत्यारीत येतो. पण जेजेच्या डीनच्या पदावर सातत्याने आचरट लोकांच्या नेमणुका करून आणि नंतर-नंतर तर वेडेबिंद्रे प्रभारी कारभारी नेमून तंत्रशिक्षण विभागाने जेजेच्या डीनचे अधिकार बासनात बांधून ठेवले. तंत्रशिक्षण खात्याच्या अनेक माजी अधिका-यांचा या जागेवर डोळा होता. कुणी तिथे अधिका-यांची निवासी इमारत बांधण्याचं स्वप्न रचत होतं. तर कुणी ही जागा फुंकून टाकण्याच्या प्रयत्नात होतं. तर काही दीडशहाणे तिथं तंत्रशिक्षण खात्याची कार्यालयं आणण्याचा प्रयत्न करीत होते. पण वृत्तपत्रांनी ही सारी प्रकरणं चव्हाट्यावर आणली आणि कधी नव्हे ते जेजेचे माजी विद्यार्थीही जागृत झाले. त्यामुळे हे डाव उधळले गेले. म्हणूनच की काय? तंत्रशिक्षण खात्यातील उच्च अधिका-यांनी जेजेकडे संपूर्णतः दुर्लक्ष केलं. त्याचा परिणाम असा झाला की तंत्रशिक्षण विभागातल्या दुय्यम दर्जाच्या अधिका-यांनी किंवा ज्यांना अधिकारीही म्हणता येणार नाही अशांनी जेजे स्कूल ऑफ आर्टसकट कलासंचालनालयाचा ताबा घेतला आणि गेली तब्बल दोन दशकं तिथं अक्षऱशः लांडगेतोड केली. अधिकारी-शिक्षकांच्या नेमणुकांपासून ते विद्यार्थ्यांच्या प्रवेशापर्यंत प्रत्येक बाबतीत या हरामखोरांनी पैशाचे खेळ खेळून कलासंचालनालयाच्या प्रशासनाचा आणि जेजे स्कूल ऑफ आर्टच्या शिक्षण परंपरेचा अक्षरशः मसणवटा केला.
( अधिक माहितीसाठी वाचा- चिन्हचा कालाबाजार विशेषांक )
तंत्रशिक्षण सचिव श्री सहारिया यांनी तर या सर्वांवर कडीच केली. त्यांनी नागपूरच्या कलामहाविद्यालयातून दोन-अडीच वर्षांपूर्वी सेवानिवृत्त झालेल्या श्री हेमंत नागदिवे या गृहस्थांना जेजे स्कूल ऑफ आर्टचा कारभार सुधारण्यासाठी आणून अधिष्ठात्यांच्याच जागी बसवले. जेजेच्या अधिष्ठात्यांच्या खुर्चीवर फाईन आर्टचाच प्रशिक्षित शिक्षक बसवावयास हवा हा शासननिर्णयच त्यांनी स्वतःच निकालात काढला. आणि उपयोजित कलेचं शिक्षण घेतलेल्या नागदिवेंना आधी जेजे स्कूलच्या अधिष्ठात्याच्या खुर्चीवर आणून बसवलं आणि नंतर थेट महाराष्ट्राचं कलासंचालक पदच त्यांना बहाल केलं. दोन-अडीच वर्षांपूर्वी नागपूर स्कूल ऑफ आर्टमधून सेवानिवृत्त होण्याच्या आधी जेमतेम महिना- दीड महिना अधिष्ठातापदावर नेमल्या गेलेल्या नागदिवे यांचा बॅक रेकॉर्ड काही फारसा चांगला नव्हता. किंबहुना वाईटच होता. म्हणूनच शासनानं त्यांना तब्बल ११-१२ वर्षे नागपूर स्कूल ऑफ आर्टच्या अधिष्ठातापदी प्रभारी म्हणूनच ठेवले होते. नागदिवे यांनी आधी नागपूर आणि मग औरंगाबाद आणि मग पुन्हा नागपूर येथे वेळोवेळी जे 'दिवे' लावले होते. ते काही फारसे चांगले नव्हते. किंबहुना वाईटच होते. म्हणूनच त्यांना पदोन्नती देण्यात आली नव्हती. ( जिज्ञासूंनी अधिक माहितीसाठी चिन्हचा ताजा अंक वाचावा ) असे असतानाही तंत्रशिक्षण सचिव सहारिया यांनी श्री नागदिवे यांची सेवा समाप्त झाल्यावरसुद्धा जेजेमध्ये आणून बसवले. नागपूर औरंगाबादच्या शिक्षकांनी यासंदर्भात श्री सहारिया यांना लेखी निवेदन दिले. त्यांच्या भेटीची वेळ मागितली. पण त्या निवेदनास कच-याची टोपली दाखवून सहारिया यांनी सदर शिक्षकांची भेट नाकारली आणि बेमुर्वतखोरपणे नागदिवेंची नेमणूक केली.
( या नागदिवे यांनी नंतरच्या वर्षभरात फक्त जेजे स्कूल ऑफ आर्टमध्येच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातल्या कलामहाविद्यालयांमध्ये काय काय दिवे लावले त्याचा विस्तृत समाचार आम्ही पुढल्या लेखमालिकेत घेणार आहोत. )
याच नागदिवे यांनी आपल्या कार्यकालात जेजेच्या डीन बंगलोचा ताबा घेतला. वर्षभर ते तिथेच राहत होते. सोबतीला जेजेतले हंगामी कलाशिक्षक शिंत्रे होतेच. मध्यंतरीच्या काळात महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील एका मंत्र्याची ( त्याचे 'खाजगी गुपित' फोडल्याबद्दल ) नाराजी ओढवून घेतलेला खाजगी सचिवही काही काळ या बंगल्यात स्वतःच्या मुलीसोबत वास्तव्याला होता. वा रे प्रशासन... डीन बंगलो की धर्मशाळा???
श्री नागदिवे यांच्या कार्यकाळाची एक वर्षाची मुदत संपल्यानंतर श्री नागदिवे यांना स्वतःसही या पदावर पुन्हा राहावयाचे होते आणि तंत्रशिक्षण सचिव श्री सहारिया यांनासुद्धा नागदिवेंना त्याच पदावर नेमावयाचे होते. पण कोर्टानेच पाचर मारली आणि महाराष्ट्रातल्या सगळ्याच सेवानिवृत्तांच्या पुनर्नेमणुका बोंबलल्या. तरीसुद्धा सहारियासाहेब प्रयत्नशील होते. नागदिवेंची फाईल घेऊन स्वतःच मंत्रालयातल्या इतर विभागात खेटे घालत होते. पण इतर विभागात त्यांची डाळ शिजली नाही. पाहिजे तर विचारा अर्थखात्याच्या सचिवांना... सहारियासाहेब दर आठवड्याला नवीन तारखा जाहीर करत आणि मग नागदिवेसाहेबसुद्धा इकडे जेजेमध्ये नव्या नव्या पुड्या सोडत. एक तारखेला येतो, १५ तारखेला येतो अशा तारखांवर तारखा देत. बंगला हातचा जाऊ नये म्हणून त्यांनीच श्री शिंत्रे यांना त्यांच्या पादुका मारुती(गाडी)सकट राखायला दिल्या असाव्यात. शेवटी नको तेच झाले सगळ्या अधिका-यांच्या बदल्या झाल्या. सहारिया गेले, पाठक आले. आता बंगला खाली झाला असेलच.
ता.क.- या बंगल्यात जे कामचलाऊ फर्निचर आहे ते शासनाचे आहे की नागदिवेंचे स्वतःचे की कुण्या काँट्रेक्टरने आणून दिलेले? ते आता कोण घेणार? शासन की स्वतः नागदिवे??
याच बातम्यांसंदर्भातला पुढचा दणका आम्ही सोमवार दिनांक ३१ मे पासून देणार आहोत.
No comments:
Post a Comment