जेजे स्कूल ऑफ आर्टसकट राज्यातील तीन अन्य शासकीय कलामहाविद्यालयं म्हणजेच जेजे इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाईड आर्ट, शासकीय कलामहाविद्यालय नागपूर, आणि शासकीय कलामहाविद्यालय, औरंगाबाद, या चारही संस्थांची सामायिक प्रवेश परीक्षा CAT, येत्या गुरुवारी ३ जुन रोजी घेतली जाणार आहे. या कलामहाविद्यालयात प्रवेश घेऊन आपल्या पाल्याला मोठा चित्रकार बनवण्याची स्वप्न पाहणा-या पालकांना हा आणखी एक सावधगिरीचा अधिक माहितीवजा इशारा. दिनांक २६ मेच्या ब्लॉगवर आम्ही जेजे स्कूल ऑफ आर्टची अवस्था दाखवून दिली होती. या लेखमालिकेत सादर करीत आहोत राज्यातील अन्य तीन कलामहाविद्यालयांची शिक्षकांविना झालेली दूर्दशा. CAT ची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना या चार शासकीय किंवा अन्य खाजगी कलामहाविद्यालयात गुणांनुसार प्रवेश दिला जातो. एखाद्या विद्यार्थ्यास मुंबईतच प्रवेश हवा असेल तर तो मिळतोच असे नाही. तो औरंगाबाद येथेदेखील मिळू शकतो किंवा नागपूर येथेही. तसं जर झालं तर त्या विद्यार्थ्यांना काय काय भोगावे लागेल त्याच्या पुढ्यात काय काय वाढून ठेवलेले असेल ते पुढील मजकुरावरून सहज स्पष्ट होईल. कदाचित आजची परिस्थिती बरी आहे असं म्हणावे लागेल इतकी येत्या पाच शैक्षणिक वर्षात या चारही संस्थामध्ये भीषण अवस्था निर्माण होणार आहे. उदाहरणार्थ एखाद्या विद्यार्थ्याला जेजे स्कूल ऑफ आर्टमध्ये प्रवेश न मिळता औरंगाबाद शासकीय कलामहाविद्यालयात प्रवेश मिळाला तर काय होईल ते आधी पाहुया.
औरंगाबाद शासकीय कलामहाविद्यालयात साधारणपणे सव्वादोनशे ते अडीचशे विद्यार्थी दरवर्षी शिक्षण घेतात. नवी कोरी आणि भव्य इमारत हे या कलामहाविद्यालयाचे वैशिष्ट्य मानता येईल. पण या कलामहाविद्यालयातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचा-यांची अवस्था काय ते पाहा.
औरंगाबाद शासकीय कला महाविद्यालय
अधिष्ठाता- पद रिक्त
रंग व रेखाकला विभाग
अधिव्याख्याता- ७ पैकी ५ पदं रिक्त
उपयोजित कला विभाग
प्राध्यापक- पद रिक्त
अधिव्याख्याता- ९ पैकी ३ पदं रिक्त
कला प्रशिक्षण विभाग
अधिव्याख्याता- ३ पैकी २ पदं रिक्त
टेक्सटाईल
अधिव्याख्याता- ४ पैकी १ पद रिक्त
ही झाली शिक्षकांची तर आता शिक्षकेतर कर्मचा-यांची अवस्था पहा
रजिस्ट्रार- पद रिक्त
हेडक्लार्क- पद रिक्त
लायब्ररीयन- पद रिक्त
सीनिअर क्लार्क- पद रिक्त
स्टेनो- पद रिक्त
संपूर्णपणे 'हेड'लेस कारभार. इथेही प्रभा-यांचीच चलती. प्रभारी कारभारी तरी बरे असावेत तर तेही नाही. निकालाची धावपळ, प्रवेशाची पळापळ चाललेली असताना तिथले प्रभारी अधिष्ठाता प्रा. दिलीप बडे मात्र रजेवर निघून गेले आहेत. परवा कलासंचालनालयावर झालेल्या एका महत्त्वाच्या मिटिंगलासुद्धा ते आले नाहीत. तिथे त्यांनी आपला प्रतिनिधी पाठवला.
आता नागपूरच्या कलामहाविद्यालयातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचा-यांची अवस्था पहा.
अधिष्ठाता पद रिक्त
रंग व रेखाकला विभाग
प्राध्यापक २ पैकी १ पद रिक्त
अधिव्याख्याता ९ पैकी ७ पदं रिक्त
उपयोजित कला विभाग
प्राध्यापक १ पद रिक्त
अधिव्याख्याता १० पैकी १ पद रिक्त
कलाप्रशिक्षण विभाग
अधिव्याख्याता २ पैकी दोन्ही पदं रिक्त
आता शिक्षकेतर कर्मचा-यांची अवस्था-
रजिस्ट्रार पद रिक्त
प्रमुख लिपिक पद रिक्त
वरीष्ठ लिपिक पद रिक्त
संगणक तज्ज्ञ पद रिक्त
दिनांक २६ मे रोजी प्रसिद्ध झालेल्या लेखात आम्ही जेजे स्कूल ऑफ आर्टमधील शिक्षकांच्या रिक्त पदांकडे लक्ष वेधून घेतलं होतं. आता शिक्षकेतर कर्मचा-यांची अवस्था पाहुया.
जेजे स्कूल ऑफ आर्ट, रिक्त पदं आढावा ( शिक्षकेतर )
रजिस्ट्रार पद रिक्त
लघुलेखक पद रिक्त
संगणक तज्ज्ञ पद रिक्त
लिपिक टंकलेखक तिन्ही पदं रिक्त
ग्रंथपाल पद रिक्त
सहायक ग्रंथपाल पद रिक्त
जेजे इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाईड आर्ट
अधिष्ठाता पद रिक्त
प्राध्यापक ४ पदं रिक्त
अधिव्याख्याता ८ पदं रिक्त
या चारही कलामहाविद्यालयातील अधिष्ठाता, प्राध्यापक, अधिव्याख्याता आणि तंत्रसहायकांची एकूण संख्या असावयास हवी १३७. ( चुकभूल द्यावी घ्यावी ) पण प्रत्यक्षात चारही कलासंस्थांमध्ये मिळून फक्त ५८ पदं भरली गेली आहेत. याचाच अर्थ ७९ पदं रिक्त आहेत. येत्या तीन वर्षात त्यातून २१ जणं सेवानिवृत्त होणार आहेत. तर ३ ते ४ जणं या सा-या प्रकाराला कंटाळून नोक-या सोडून जाणार आहेत. याचाच अर्थ असा, २०११ साली या ५८ मधील ६ जण सेवानिवृत्त होणार आहेत. २०१२ साली आणखी ५ जणं निवृत्त होणार आहेत तर २०१३ साली आणखी १० जणं सेवानिवृत्त होणार आहेत. तसेच राजीनामा देणारे तीन ते चार जण ग़ृहित धरले तर २०१३ साली कायमस्वरुपी फक्त ३३ जण चारही कलामहाविद्यालयात उरणार आहेत. या ३३ शिक्षकांवरच चारही कलामहाविद्यालयातील मिळून सुमारे १५०० विद्यार्थ्यांची जबाबदारी टाकली जाणार आहे. म्हणजेच आज प्रवेश घेणारी तुमची मुलं जेव्हा २०१३ साली शेवटच्या वर्षाला असतील तेव्हा त्यांना हे सारं भोगावं लागणार आहे. आणि याला कारण आहे फक्त महाराष्ट्र शासनाची कलाशिक्षणाकडे पाहण्याची बेशरम वृत्ती. कसं ते वाचा उद्याच्या लेखात.
No comments:
Post a Comment