Tuesday, June 1, 2010

कलाशिक्षणाच्या आxx... x!


२००२ पासून 'चिन्ह'ने महाराष्ट्राच्या कलाशिक्षणाच्या वर्तुळात कोणकोणत्या भयंकर गोष्टी घडत आहेत, घडू घातल्या आहेत किंवा घडणार आहेत त्याविषयी सातत्याने आवाज उठवण्यास सुरुवात केली. सुरुवातीला संबंधितांनी 'चिन्ह'ला हसण्यावारी नेलं. जेजेतल्या तथाकथित विद्वानांनी नाकंही मुरडली. एवढासा अंक, त्याचा जीव तो किती? हे छापून का कुठे बदल होणार आहे? म्हणून खिल्लीही उडवली. पण लोकसत्तेत लेख व लेखमालिका प्रसिद्ध होऊ लागताच यांची धाबी दणाणली. अन्य वृत्तपत्रांनीही मग या सर्व प्रकाराची दखल घेण्यास सुरुवात केली. वाहिन्याही या स्पर्धेत उतरल्या. आणि त्यामुळेच या सर्व प्रकारांना आळा बसत गेला. अनेकांना मेमो मिळाले. अनेकांना पोलीस चौकीत खेटे घालावे लागले. अनेकांना निलंबित व्हावे लागले. अनेकजण तुरुंगवारी करून आले आणि अनेकजण सहीसलामत सुटले. 'पकडला तो चोर, बाकीचे शिरजोर' पण अनेक मुजोर-शिरजोर मात्र सेवानिवृत्त झाले. गेल्या २५ वर्षाच्या कारभाराची न्यायालयीन चौकशी झालीतर ५०% पेक्षा जास्तजण तुरुंगात डांबले जातील इतका यांनी जेजेत भयंकर गोंधळ घातला आणि जेजेच्या दीडशे वर्षांच्या परंपरेचा चुथडा चुथडा केला.

सुमारे २०-२५ वर्षांपूर्वी तंत्रशिक्षण खात्याच्या सचिवांनी जातीयतेचा आधार घेत जे बीजारोपण केलं. त्या बीजाचा आता वृक्ष झाला आहे. त्या बीजाची विषारी फळे आता महाराष्ट्राच्या कलाशिक्षण परंपरेची राखरांगोळी करून टाकत आहेत. त्या सचिवाच्या करणीमागे एक निश्चित अशी भूमिका होती, ( पण त्याचा मार्ग चुकीचा होता. ) या सचिवाच्या सेवानिवृत्तीनंतर आलेल्या बहुसंख्य सचिवांनी जेजे आणि कलासंचालनालयाच्या प्रश्नाकडे संपूर्ण दुर्लक्षच केलं. परिणाम असा झाला की या आधीच्या सचिवानेच घुसवलेले दुय्यम अधिकारी माजले. त्यांनी वरील दोन्ही संस्थांचा ताबा घेतला आणि कालपरवापर्यंत तिथे अत्याचाराचा अक्षरशः नंगानाच केला. त्या सचिवाने त्याच्या भूमिकेसाठी जातीयतेचा आधार घेतला पण त्याच्या चेल्यांनी अर्थप्राप्तीसाठी या सा-याचा वापर केला. वेळप्रसंगी आपल्याच जातीतल्यांना लुटावयासही त्यांनी मागेपुढे पाहिलं नाही.

त्यामुळे जेजे आणि कलासंचालनालयातील महत्त्वाच्या पदांवर अक्षरशः गाढवं आणि बैल आणून बसवले गेले. खरं तर यांची आणि त्या बिचा-या मुक्या चतुष्पाद प्राण्यांची तुलना करणं सर्वथा गैर आहे किंबहुना ते त्या प्राण्यांवर अन्यायकारकच आहे. नांगराला बैल जोडता येतो वा घाण्याला बैल जोडता येतो. झालंच तर गाढवावरून माती वाहता येते, पण यांची तर तेवढीही पात्रता नव्हती तरीही ते नेमले गेले आणि जेजेच्या सुंदर इमारतीचे एक एक दगड ढासळू लागले.

शिक्षण आणि प्रशासन या दोन्ही बाबतीत आज जेजेची ७५% अधोगती झाली आहे. अन्य तिन्ही शासकीय संस्थांची हीच हालत आहे किंबहुना याच्यापेक्षाही वाईट. येत्या तीन वर्षात ५८ पैकी २१ अनुभवी शिक्षक सेवानिवृत्त होणार आहेत. तीन ते चार शिक्षकांनी या सा-या प्रकाराला कंटाळून राजीनामा देण्याचे ठरवले आहे. म्हणजे तुमच्या मुलाला जर यंदा या चारपैकी एका कलामहाविद्यालयात प्रवेश मिळाला तरी शेवटच्या वर्षी अवघे ३३ कायमस्वरुपी शिक्षक त्यांना शिकवावयास असणार आहेत. जेजेच्या दोन्ही कलामहाविद्यालयातील सुमारे १००० तर नागपूर-औरंगाबाद मिळून ५०० कलाविद्यार्थी. म्हणजे १५०० विद्यार्थ्यांना ३३ कलाशिक्षक. म्हणजे सरासरी एका कलाशिक्षकाच्या डोक्यावर किती विद्यार्थ्यांचा भार याचं गणित तुम्हीच करा. काय हे विद्यार्थ्याना शिकवणार आणि काय विद्यार्थी यांच्याकडून शिकणार. गुणवत्ता असूनही २५-२५, ३०-३० वर्ष नोक-या करून ज्या पदावर लागला त्याच पदावरून सेवानिवृत्त होण्यासारखी भयंकर अवस्था जेजे आणि अन्य चार कलामहाविद्यालयाती अनेक कलाशिक्षकांच्या नशीबी आली आहे. तर दुसरीकडे ज्यांना 'प्राध्यापक' या शब्दात 'ध' हा 'य' ला जोडायचा की 'य' हा 'ध' ला जोडायचा हे माहीत नाही, असले आचरट नोकरीला लागल्यापासून चार-पाच वर्षात प्राध्यापक पदावर बसू लागले आहेत. इतकेच नव्हे तर अधिष्ठाता पदावर हक्क सांगू लागले. आता हेच पहा ना, जेजे स्कूलच्या प्रभारी अधिष्ठाता पदी असलेल्या डॉ. मनिषा पाटील १९८८ साली सरकारी नोकरीत रुजू झाल्या. पण त्यांना कलेच्या इतिहासाचे प्राध्यापक पद सातत्याने नाकारण्यात आले. ( ते पद व्यपगत झाले असंही भासवण्यात आले. ) अखेर २००९ साली म्हणजे तब्बल १४ वर्षांनी त्यांना ते पद दिले गेले. ( म्हणजेच तब्बल १४ वर्षे जेजेत कलेच्या इतिहासाचे प्राध्यापक पदच रिक्त ठेवण्यात आले. ) याउलट तंत्रशिक्षण खात्याचं लाडकं बाळ विश्वनाथ साबळे हे ८-११-२००१ रोजी जेजेत रुजू झाले. पदवी नव्हे तर पदविकाधारक असलेले साबळे अवघ्या चार वर्षांच्या आत २९-९-२००५ रोजी प्राध्यापकही झाले आणि डॉक्टर मनीषा पाटलांच्या डोक्यावर येऊन बसले. बेशरमपणाला काही सीमा? ( गोंडाणेबाई माफ करा, हे तुम्हाला उद्देशून नव्हे. ) हा असला भयानक कारभार जेजे आणि अन्य तीन कलामहाविद्यालयात गेली तब्बल २०-२५ वर्ष चालला आहे. काय शिक्षक शिकवणार आणि विद्यार्थी शिकणार?

१९८९ पासून मी याविरोधात आवाज उठवतो आहे. ( पहा लोकसत्तेच्या बातमीचे कात्रण. येथे क्लिक करा ) पण एकाही शिक्षणमंत्र्याला किंवा शिक्षण सचिवाला याची दखल घ्यावीशी वाटली नाही. जवळ जवळ ९ ते १० वर्षे या खात्याचा कारभार सध्याचे विधानसभेचे सभापती श्री दिलीप वळसे-पाटील यांच्या हाती होता. ( अधिक माहिती- श्री विश्वनाथ साबळे हे वळसे पाटलांच्याच गाववाले ) या सर्व प्रकारावर मी लोकसत्तामधून हल्ला चढवताच दि. ३ एप्रिल २००८ रोजी मंत्रालयात एक विशेष बैठक बोलावली गेली जिला मी हजर होतो. त्या बैठकीचे हे मिनिट्स पहा. ( बैठकीतील मिनिट्स पाहण्यासाठी येथे क्लिक करा ) श्री वळसे पाटील आणि सचिव जॉयस शंकरन काय म्हणाले ते मुद्दाम हायलाईट केलं आहे. यापैकी पुढे काहीही झाले नाही हे वेगळं सांगावयास नकोच. ( 'सभापती महोदय, प्लीज नोट' ) हां एक मात्र झालं. गेल्या दीडशे वर्षात आले नाहीत एवढे पैसे गेल्या दोन वर्षात जेजेत व अन्य तीन कलामहाविद्यालयात आले. ( थँक्स टू श्री वळसे पाटील आणि श्री जयंत पाटील ) पण त्या पैशाचे पुढे काय झाले? ते कसे गेले? कुठे गेले ? कुणी लुटले ? कोणी लाटले ? जेजेला किती मिळाले आणि अन्य तीन कलामहाविद्यालयांना किती मिळाले? कॉम्प्युटरमध्ये किती गेले आणि नूतनीकरणावर किती गेले? या सर्वावरच येता महिनाभर आम्ही प्रकाश टाकणार आहोत.

या सगळ्या आख्यानाचे तात्पर्य काय तर महाराष्ट्रात आता कलाशिक्षण घेण्यासाठी एकही पात्र कलामहाविद्यालय राहिलेलं नाही. सगळ्यांचीच, सगळ्याच कलामहाविद्यालयांची आता पुरती वाताहत झाली आहे. मग आता यावर उपाय काय? हा प्रश्न तुम्ही आम्हालाच विचारू नका. जा आणि थेट तंत्रशिक्षण मंत्री राजेश टोपे यांना हा प्रश्न विचारा. ते नाही भेटले तर विधानसभेचे सभापती दिलीप वळसे पाटील यांना भेटा. त्यांच्याच हातात या विभागाचा कारभार तब्बल ८-९ किंवा ९-१० वर्षे होता. त्यांनाच विचारा की!

सतीश नाईक
संपादक 'चिन्ह'

1 comment:

Vinod Patil said...

You r doing a great job........keep it up!