Wednesday, June 2, 2010

कलाशिक्षणाच्या आxx x! ( पार्ट 3 )

फोटो: शैलेश जाधव
'कंत्राटी शिक्षक नेमून शिक्षणाचा दर्जा टिकवता येत नाही, उच्च शिक्षणामध्ये प्रचंड बदल घडत आहेत. त्यामुळे नियमित शिक्षक नेमणे आवश्यक आहेत. दुर्दैवाने महाराष्ट्रातही २५ ते ३० टक्के शिक्षक कंत्राटी आहेत याची राज्यकर्त्यांनीही गांभीर्याने दखल घ्यायला हवी. महाविद्यालयात नियमित शिक्षक नेमले जावेत असे आदेश मनुष्यबळ विकास मंत्रालय व विद्यापीठ अनुदान आयोगाने सर्व राज्यांना दिले आहेत' इति विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष डॉ.सुखदेव थोरात. २८ नोव्हेंबर २००६, दै. सकाळ.

विद्यापीठ अनुदान आयोगाचेच नव्हे तर मुंबई उच्च न्यायालयाचे आदेशसुद्धा धाब्यावर बसवून उच्च तंत्रशिक्षण विभागाने राज्याच्या कलाशिक्षणाचा अक्षरशः खेळखंडोबा करून टाकलाय. जेजे स्कूल ऑफ आर्ट आणि अन्य तीन शासकीय कलामहाविद्यालयांची तंत्रशिक्षण खात्यातील भ्रष्ट अधिका-यांनी कशी पुरती वाताहत करून टाकली आहे ते पुढील सूचीवर नजर टाकल्यास लक्षात येईल. १६- १६, १७-१७ वर्ष अवघ्या १२ हजार वेतनावर कलाशिक्षकांना हंगामी स्वरुपात नोकरी करावयास भाग पाडणं हा खरं तर मानवाधिकार आयोगाने दखल घ्यावी असा विषय आहे. अवघे १२ हजार वेतन तेही ब-याचदा वेळेवर मिळत नाही. आणि त्यासाठी त्यांना कुठून कुठून लांबून यावयास भाग पाडले जाते. अस्थिर मनस्थितीत काय ते शिकवत असतील आणि विद्यार्थीही काय शिकत असतील? अशाच व्यवस्थेत त्यांनी आपला संसार उभारायचा, लग्न करायची, मुलांना वाढवायचं, त्यांच्या शिक्षणाची व्यवस्था करायची, स्वतःलाही घडवायचं आणि वर शिक्षणदानाचं काम करायचं. हे २१ व्या शतकात मुंबईसारख्या महानगरात रहाणा-यांना शक्य तरी आहे का? पण याचा कुठलाच विचार केला जात नाही. विचारलं तर दाबून टाकलं जातं. बदल्यांच्या किंवा काढून टाकण्याच्या धमक्या दिल्या जातात. तोंड दाबून बुक्क्याचा मार. सहन होत नाही आणि सांगताही येत नाही अशी विचित्र अवस्था. म्हणूनच गुणवंत कलावंत शिक्षणक्षेत्रात यायला नकार देतात. जेजे स्कूल ऑफ आर्ट किंवा जेजे अप्लाईड आर्टमध्ये शिकलेले हल्ली शिक्षणक्षेत्रात येणंच टाळतात. इथं जे शिकवायला येतात ते महाराष्ट्रात जी बांडगुळांसारखी कलामहाविद्यालयं पसरली आहेत त्यांचे विद्यार्थी असतात. त्यांना जेजेची परंपरा, संस्कृती याविषयी काहीच ज्ञान नसते. त्यामुळे इथल्या वातावरणात ते रुळूच शकत नाहीत. वेगवेगळे कंपू करुन राहतात. या सा-याचा परिणाम कलाशिक्षण क्षेत्रावर अतिशय विपरीत पद्धतीने झाला आहे. एक नजर टाकूया चारही कलामहाविद्यालयातील हंगामी आणि कंत्राटी शिक्षकांवर म्हणजे गेली कित्येक वर्ष हा जुलुम सुरू आहे हे लक्षात येईल.

जेजे स्कूल ऑफ आर्ट ( हंगामी शिक्षक )
शिल्पकला
मधुकर वंजारी ( १७ वर्ष )
नितीन मेस्त्री ( सुमारे १२ वर्षं )
श्रीशैल शिंत्रे ( सुमारे १२ ते १३ वर्षं )

शिक्षण- प्रशिक्षण
राजेंद्र पाटील ( १६ वर्षं हंगामी )

रंग व रेखाकला
गणेश तरतरे ( १३ ते १४ वर्षं )
(कंत्राटी शिक्षक )
शार्दुल कदम ( २ वर्षं )
विजय बोंदर ( ३ वर्षं )
प्रकाश सोनावणे ( ३ वर्षं )
दीपक सिनकर ( २ वर्षं )

आर्ट अँड क्राफ्ट
इंटिरिअर (कंत्राटी शिक्षक )
नेहा रेडेकर ( २ वर्षं )
सुचेता गायकर ( २ वर्षं )

मेटल क्राफ्ट (कंत्राटी शिक्षक )
श्रीकांत खैरनार ( २ वर्षं )
यशवंत भावसार ( २ वर्षं )
अ. साळुंखे ( २ वर्षं )
कलेचा इतिहास (कंत्राटी शिक्षक )
प्रफुल्ल सातोस्कर ( २ वर्षं )

जेजे स्कूल ऑफ अप्लाईड आर्ट
हंगामी शिक्षक
आशिष विळेकर ( १४ वर्ष )
कृष्णा फुलकुंडवार ( १४ वर्षं )
संजय कुरवाडे ( १४ वर्षं )
कंत्राटी शिक्षक
राहुल थोरात ( ४ वर्षं )
हेमंत रवंदळे ( ४ वर्षं )
केशव घोडके ( ३ वर्षं )
राहुल मेश्राम ( ३ वर्षं )
चेतन जगताप ( ४ वर्षं )
शैलेश साऊतकर ( २ वर्षं )
दीपा शेगोकर ( २ वर्षं )
आणखी दोन कंत्राटी शिक्षकांमधला एक नागपूरला बदली म्हणून निघून गेला. तर दुसरा कंटाळून सोडून गेला.

औरंगाबाद शासकीय कलामहाविद्यालय
हंगामी शिक्षक
श्री चिखले ( सुमारे १२ ते १३ वर्षं )
कंत्राटी शिक्षक
शैलेश दुधळकर ( सुमारे ३ वर्षं )
प्रफुल्ल नायसे ( ३ वर्षं )
पंकज इटकेलवार ( २ वर्षं )
अश्विनी साल्लोडकर ( २ वर्षं )
प्रदीप कुमावत ( ३ वर्षं )
नारायण सोनावणे ( ३ वर्षं )
शरद माहुरे ( ३ वर्षं )
किशोर इंगळे ( ३ वर्षं )

Bold
नागपूर शासकीय कलामहाविद्यालय
रंग व रेखाकला
हंगामी शिक्षक
मारुती शेळके ( १२ पेक्षा जास्त वर्ष )
रामदास तडका ( १२ पेक्षा जास्त वर्षं )
विकास जोशी ( १२ पेक्षा जास्त वर्षं )
अब्दुल गफार ( १२ पेक्षा जास्त वर्षं )

कंत्राटी शिक्षक
संदीप डोंगरे ( ७ वर्षं )
मृणाल जोहरापूरकर ( ७ वर्षं )
संतोष खडसे ( ७ वर्षं )
वीरेंद्र चोपडे ( सुमारे २ वर्षं )

जेजे स्कूल ऑफ आर्टमध्ये १७ वर्षं नोकरी करुनही एक कलाशिक्षक अद्यापही हंगामी आहे. यावर आपला विश्वास बसणार नाही पण ही वस्तुस्थिती आहे. जेजे स्कूल ऑफ आर्टमधील जवळजवळ ५ शिक्षक १२ ते १६ वर्षं नोकरी केलेले आहेत. अन्य सर्व दोन किंवा तीन वर्षं कंत्राटी म्हणूनच राबत आहेत. कंत्राटी या शब्दाला नेहमीच कामगार असा शब्द जोडून येतो, त्यामुळे असा उल्लेख करणं योग्य वाटत नाही पण शासकीय कागदपत्रातच हे शब्द वापरले गेल्याने नाईलाजाने हा शब्द वापरावा लागत आहे. १५- १५, १६-१६ वर्षं नोकरी करुनही ज्यांचं संपूर्ण भवितव्य अंधारात आहे. ज्यांना उद्याची कोणतीच शाश्वती नाही. ज्यांना कलासंचालनालयातल्या गुन्हेगारी वृत्तीच्या भ्रष्ट अधिका-यांसमोर नतमस्तक व्हावे लागते. त्यांच्या गलिच्छ सूचना अमलात आणावयाची वेळ येते, ते शिक्षक उद्याच्या पिढीला काय शिक्षण देणार आहेत? यातल्या कंत्राटी शिक्षकांना तर दरमहा फक्त १२ हजार रुपये दिले जातात. वर्षभरापूर्वी तर फक्त ८ हजार रुपयात त्यांची बोळवण केली जात असे. ते ही वेळेवर मिळत नसत. त्यासाठी झोंबाडेसायेबांच्या नाकदु-या काढाव्या लागत असत. आजही लागतात.

तंत्रशिक्षण खात्याला या सा-यात काडीचंही स्वारस्य नाही. एआयसीटी फक्त नियम करते. ते अंमलात आणले की नाही ते पाहत नाही. मुंबई विद्यापीठाचं म्हणावं तर आनंदी आनंदच आहे. ते हिंग लावूनसुद्धा जेजे स्कूल ऑफ आर्टला विचारत नाहीत. ( गतवर्षी 'कालाबाजार' अंकामध्ये मुंबई विद्यापीठाच्या वरिष्ठ अधिका-यांनी जेजेमध्ये काय दिवे लावले होते त्यावर आम्ही प्रकाशझोत टाकला होता. अगदी नावानिशीवार सर्व भ्रष्टाचार उघडकीला आणला होता. पण ना कुलगुरुंना खुलासा करावासा वाटला ना कुलपतींना. सर्टीफिकेट कोर्स करायला आलेली ती परदेशी मुलगी कुठलीही शैक्षणिक पात्रता नसताना मुंबई विद्यापीठासारख्या मोठ्या विद्यापीठाचं एमएचं सर्टीफिकेट घेऊन घरी गेली. हे आम्ही नावानिशीवार पुराव्यानिशी उघडकीला आणलं पण कुणाच्याही तोंडून चकार शब्द उमटला नाही. विद्वत सभा तर मूग गिळून बसली असावी.)
मुंबई विद्यापीठाच्या महाविद्यालयांना मान्यता देणा-या समितीने खरं तर यावर आक्षेप नोंदवून जेजे स्कूल ऑफ आर्टची मान्यता काढून घ्यावयास हवी. पण वर्षानुवर्ष ही समिती जेजेमध्ये जाऊन कुठल्याही प्रकारचा प्रतिकूल अहवाल न देता विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांची फसवणूकच करत आहे. खरं तर या आणि वरील हंगामी व कंत्राटी शिक्षकांच्या प्रकरणात मानवाधिकार आयोगाने लक्ष घालावयास हवे असे आम्हास वाटते. तरच तंत्रशिक्षण खात्यातील काही आणि कलासंचालनालयातील बहुसंख्य भ्रष्ट अधिका-यांच्या कुटील कारवायांना लगाम बसेल.

सतीश नाईक
संपादक 'चिन्ह'

No comments: