.jpg)
कलाशिक्षणाच्या आxx x! ( पार्ट ४ )
आधी त्याला कलासंचालनालयाचा अनभिषिक्त सम्राट मानलं जायचं. आता याला. आधी तो म्हणायचा तसा वारा कलासंचालनालयात वहायचा, आता हा म्हणतो तसा वाहतो. आधी कलासंचालनालयाच्या परिसरात घडलेल्या प्रत्येक अनधिकृत घटनेमागे त्याचा हात असायचा, आता याचा असतो. सेवानिवृत्तीच्याच दिवशी त्याची काय हालत झाली हे यानं अगदी जवळून पाहिलं पण त्यातून काही हा धडा शिकला नाही. तो जसा मागासवर्गीय असल्याचा खोटा दाखला देऊन आपल्या कार्यकाळात गोरगरीब कलाशिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांना लुटत राहिला तसाच हा ही अगदी तसाच वागतोय. फरक इतकाच की तो मागासवर्गीय नव्हता, हा आहे. आणि याने ज्यांना लुटलंय ते ही बहुसंख्येनं मागासवर्गीयच आहेत.
त्याने निदान शाळेच्या विद्यार्थ्यांना तरी हात लावला नव्हता पण हा ते ही करून मोकळा झालाय. हा तर म्हणे एलिमेंटरी आणि इंटरमिजिएटच्या ग्रेडबरोबरच ए, बी ग्रेड देण्याचे पैसेही घ्यायचा. ए ग्रेडचा रेट वेगळा, बी ग्रेडचा रेट वेगळा. शालेय विद्यार्थ्यांच्या आई वडिलांकडून पैसे घेण्याचे पापकर्म जर याने केले असेल तर काय काय धंदे याने कलासंचालनालयाच्या आवारात केले असतील याविषयी वेगळे काही बोलावयास नकोच.
हा अवघ्या दहा वर्षांपूर्वी अचानक येऊन कलासंचालनालयात उपटला. तो कुठे होता, कुठून आला, कसा आला याविषयी कुणालाच काही ठाऊक नाही म्हणजे नव्हतं. पण एके दिवशी एक इसम कलासंचालनालयात आला आणि साराच उलगडा झाला. तो आला होता ते खरा याला भेटायला पण नेमका त्यादिवशी हा होता रजेवर. कुणीतरी कलासंचालनालयातल्या भल्या माणसाने ( तिथे भली माणसं अद्यापही आहेत ) चहा पाजला तर गडी खुलला, भडाभडा सांगून बसला, तो म्हणाला, 'हे आमचं बेनं लय भारी हाय, त्येच्या सफारीवर जाऊ नका भौ. चांगली नोकरी होती सरकारी खात्यात शिक्षनाची काय म्हनतात ती, पन तिकडं बी यानं घान केली. चौकशी झाली आनि याला निलंबित केलं तवा प्येपरात तुमची झाहिरात आली व्हती, ती यानं पाहिलं अन इकडं सरकला. खरं सांगायचं तर ह्येनं इंटरव्ह्यूमद्ये आधीच्या नोकरीचं काही सांगितलंच नै. दाखवलं भी नै. आधी ढाकण लावून सर्वच ठरवल्यालं तर कोण याला इचारतो. जाला की हो हा शिलेक्ट'
याचा तो गाववाला गेला अन ही बातमी अख्ख्या जेजेच्या परिसरात पसरली. पण कुणीच काही केलं नाही. या असल्या लोकांच्या नादाला तरी कोण लागणार.मंत्रालयापासून सारं सडलेलं तर कोण याच्याशी पंगा घेणार. त्यामुळे सारेच गप्प राहिले आणि याची भोकरदन एक्सप्रेस मग भन्नाट सुटली. अवघ्या दहा वर्षात सर्वोच्च पदाला पोहोचलेल्या याने मग प्रत्येक बाबतीत हापसाहापशी सुरू केली. कलासंचालक पद रिक्तच असल्याने याचं फावतंच. आपणच कलासंचालक असल्यासारखा तो वागू लागला. कागदाचं, रंगाचं प्राथमिक ज्ञानही नसलेला हा परीक्षेसाठी कलासाहित्याची खरेदी करू लागला. कॉम्प्युटर हा शब्द लिहावयाची किमान अक्कल नसलेला हा माणूस कोट्यवधी रुपयांचे कॉम्प्युटर खरेदी करू लागला. कॅमेरासुद्धा कधी हातात न धरलेला हा लाखो रुपयांचं फोटोग्राफीचं मटेरियल खरेदी करू लागला.
ही खरेदी सटीसहामाशी चालायची त्यामुळे मग याने परीक्षांना हात घातला. एलिमेंट्री इंटरमिजिएटच्या विद्यार्थ्यांचे पालक मग याचे पहिले ग्राहक बनले. याच्या टेबलासमोर गरजू पालकांची रांग लागू लागली. तिथूनही पोट भरेना म्हणून तो उच्चकला परीक्षांना हात घालू लागला. उच्चकला परीक्षांना बसणा-या दहा हजार विद्यार्थ्यांपैकी अनेकांना तो आपल्या तालावर नाचवू लागला. प्रदर्शनं, साहित्य, खरेदी, बांधकाम यातूनही त्याचा सफारी भरेना तेव्हा याने शिक्षकांच्या नेमणुकांनाच हात घातला. कुठे नेमणूक हवी यावर याचे रेट ठरू लागले. कुणाला कुठे पाठवायचं, कुणाला कुठे हे हा ठरवू लागला. सरकारच्या खर्चाने हा जाहिराती द्यायचा. त्यात चुका झाल्या की ( आणि त्या व्हायच्याच ) शुद्धीपत्रकाच्या नव्या जाहिराती ( त्या ही सरकारी खर्चाने ) हाच द्यायचा. शिक्षकांच्या कायमस्वरुपी नेमणुका झाल्या तर आपल्या पोटावर गदा येईल म्हणून मग याने सरकारला कायमस्वरुपी शिक्षकांच्या शिफारसी पाठवणंही बंद केलं असं म्हणतात. हंगामी, कंत्राटी शिक्षकांची संख्या वाढू लागली आहे तिचं रहस्य हेच आहे. ओळखा पाहू हा कोण? आणि हिंमत असेल तर त्याचं नाव कमेंटमध्ये टाईप करा.
No comments:
Post a Comment