
कार्यकर्ते
जिंकणार
की
कलाकार?
तर.... लिहिण्यास कारण की,
बहुचर्चित आणि अनेक कारणांमुळे कलावर्तुळात गाजत असलेली बॉम्बे आर्ट सोसायटीची निवडणूक उद्या म्हणजे दिनांक १५ मे रोजी आहे. आणि त्याच दिवशी रात्री उशिरा या निवडणुकीचा निकाल लागणार आहे. या निवडणुकीत जिंकून येण्यासाठी दोन्ही मुख्य पॅनल्सनी आपापली कॅम्पेनिंग जोरदार केली आहेत. याव्यतिरिक्त आणखी एक पॅनेल आहे, पण ते असेच नावापुरते. प्रचारात कोणकोणत्या मुद्द्यांचा वापर केला जातोय हे जाणून घेण्याआधी आपण लढत कोणामध्ये आहे ते पाहू.
अध्यक्षपदासाठी थेट लढत आहे ती श्रीमती प्रफुल्ला डहाणूकर आणि श्री विजय राऊत यांच्यात. विजय राऊत हे गेली ६ वर्षे सोसायटीचे अध्यक्ष आहेत. सेक्रेटरी पदासाठी लढत आहे ती सुरेंद्र जगताप, विठ्ठल लोखंडकर आणि नरेंद्र विचारे यांच्यात. यापैकी विठ्ठल लोखंडकर हे विजय राऊत पॅनेलचे. लोखंडकर हे मनसेवाले. ( मग त्यांचा बॉम्बे आर्ट सोसायटीशी संबंध काय असा प्रश्न त्यांना न ओळखणा-यांना पडेल. तर त्यांच्यासाठी ही माहिती. त्यांना जेजेत शिकायचं होतं. त्यांनी जेजेत प्रवेशही घेतला होता. पण तिस-या वर्षानंतर त्यांना जेजेमधून काढून टाकण्यात आले होते. असो, ) नरेंद्र विचारे हे प्रफुल्ला डहाणूकर पॅनेलचे. ( हेच ते विचारे ज्यांना गेल्या वर्षी सोसायटीच्या मिटिंगमध्ये विजय राऊत यांनीच मारहाण केली होती. तशी बातमीच लोकसत्ताला आली होती. खरं तर राऊत हे विचारांचेच विद्यार्थी पण... असो! ) आणि सेक्रेटरीपदासाठी तिसरे उमेदवार आहेत सुरेंद्र जगताप. खजिनदारपदासाठीची लढत आहे गणपत भडके, अश्वीन कदम, आणि चंद्रजित यादव यांच्यात. यापैकी गणपत भडके हे सुरेंद्र जगतापांचे मित्र. अश्वीन कदम हे विजय राऊत पॅनेलचे ( आणि तरीही ते कलाक्षेत्रात गुणी कलाकार म्हणून ओळखले जातात. त्यांना अमेरिकेतली एक शिष्यवृत्तीही मिळाली आहे. आणि दोनच महिन्यात ते अमेरिकेला जाणार आहेत. हे जर आधीच ठरले होते तर मग त्यांना खजिनदार पदासाठी उभेच का केले? आणि ते जर जाणार असतील तर मग खजिना कोण सांभाळणार की जाणीवपूर्वकच हे केले गेले अशी चर्चा चित्रकार मंडळींमध्ये आहे. )
तिसरे चंद्रजित यादव यांच्याबद्दल कलाक्षेत्रात आदर आहे. एक स्वच्छ माणूस अशी त्यांची प्रतिमा असल्याचं कलावर्तुळात बोललं जातं. अध्यक्षपदाच्या काळातील विजय राऊत यांच्या कारभाराला त्यांनी वेळोवेळी आक्षेप घेऊन पारदर्शकपणाचा आग्रह धरल्याच्या बातम्या जहांगीरच्या बाहेर सर्रास ऐकायला मिळतात.
हे झाले तीन मुख्य पदांसाठीचे उमेदवार. याव्यतिरिक्त असलेल्या सात सदस्यपदांसाठी प्रत्येक पॅनेलने आपापले उमेदवार उभे केले आहेत. त्यापैकी उत्तम पाचारणे, सुरेशचंद्र आवारी, मनोहर गांगण, ( हे तिघं खरे तर आडिवरेकर ग्रुपचे. कोणे एके काळी यांनीच मिळून प्रफुल्ला डहाणूकर यांना बॉम्बे आर्ट सोसायटीच्या बाहेर घालवले होते. ) याशिवाय प्रकाश घाडगे, श्रीकांत कदम, ओमप्रकाश राजपूत आणि अनिल नाईक हे डहाणूकर पॅनेलकडून रिंगणात आहेत. तर रमेश भोसले, अंजली गवळी, अर्चित जयकर ( यांचं नाव मनसेच्या अनेक बॅनरवर तुम्ही पाहिलं असेल ) जय कोळी ( हे डिझायनरपण आहेत, प्रशासकपण आहेत आणि बॉक्सिंगशीही यांचा संबंध आहे. इंडियन बॉक्सिंग फेडरेशनचे आणि महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनचे हे जॉईंट सेक्रेटरी. शरद पवार आणि कलमांडींसोबत काम करतात. असं या पॅनेलच्याच माहिती पत्रकात लिहिलं आहे. ) याशिवाय व्यंकटेश पाटे, प्रभाकर पाटील, रवींद्र साळवे हे राऊत पॅनेलचे आहेत. याव्यतिरिक्त अजून ११ जण उभे आहेत. म्हणजेच सदस्यांच्या ७ पदासाठी एकूण २५ जण निवडणुकीच्या रिंगणात आहेत. आणि खरी लढत आहे ती डहाणूकर पॅनेल आणि राऊत पॅनेल यांच्यात. पण त्यापेक्षाही या निवडणुकीला राजकीय रंग मिळालाय तो राऊत पॅनेलमधील मनसे पदाधिका-यांच्या समावेशामुळे. जे पॅनेल जिंकून येईल ते पुढील ३ वर्ष कार्यभार सांभाळेल. आणि विशेष म्हणजे या ३ वर्षातच बांद्रा रेक्लमेशन येथील सोसायटीची बहुचर्चित इमारत सुसज्ज होत आहे.
खरं तर बॉम्बे आर्ट सोसायटीचे सभासद कोणीही होऊ शकतं. त्यासाठी आर्टिस्ट असण्याची गरज नाही. डहाणूकर पॅनेलवाल्यांचं मात्र मत आहे की सभासद कोणीही होऊ दे, पण मतदानाचा अधिकार आर्टिस्ट असलेल्यालाच मिळायला हवा. डहाणूकर पॅनेल निवडून आल्यास तशाप्रकारची तजवीज ते करणार आहेत. मध्यंतरीच्या काळात म्हणजे राऊत अध्यक्ष झाल्यापासून मनसेचे सुमारे दीडशेहून जास्त कार्यकर्ते अशाप्रकारे बॉम्बे आर्ट सोसायटीचे सभासद झाल्याचं विरोधी गटाचं म्हणणं आहे. सोसायटीच्या मिटिंगमध्ये तर, ''बॉम्बे आर्ट सोसायटीच्या नव्या इमारतीवर मनसेचा झेंडा लावू आणि तिथे मनसेचंच ऑफिस थाटू'' अशी धमकीवजा भाषाही केल्याचं म्हटलं जातंय. तेव्हापासूनच खरं तर आर्टिस्ट असलेल्या आणि कलेत राजकारण शिरू नये असं वाटणा-यांना धक्का बसलाय.
जहांगिरबाहेर चाललेल्या चर्चेप्रमाणे राऊत यांच्या कार्यक्षमतेवर विश्वास असणा-या अनेकांनी आज त्यांच्याकडे पाठ फिरवलीय. बांद्रा रेक्लमेशन येथे होणा-या इमारतीचा कॉर्पस फंड वापरण्यावरून हे मतभेद आहेत. सुमारे दीड कोटीचा हा फंड आहे. या फंडाची रक्कम कलाकारांसाठी वापरली जावी असं राऊत यांचं म्हणणं आहे. तर डहाणूकर पॅनेलचे चंद्रजित यादव यांचं म्हणणं आहे की फंडची रक्कम न वापरता ते पैसे कलाकारांसाठीच फिक्स डिपॉझिटमध्ये ठेवण्यात यावेत आणि त्याचं व्याज वापरण्यासाठीही योग्य ते नियम आणि अटी असाव्यात. अन्यथा हा फंड 'आला कसा आणि गेला कसा' हे कळणारही नाही. नेमक्या याच मु्द्द्यावरून मिटिंगमधील वादावादी विकोपाला जाऊन त्याचं पर्यवसन डहाणूकर पॅनेलच्या नरेंद्र विचारे यांना मारहाण करण्यापर्यंत झालं होतं असं कलाकार खुलेपणाने सांगतात. लोकसत्तेत त्याची बातमीही आली होती. राऊत यांच्या मनमानी निर्णयाला कलाकार कंटाळलं असल्याचंही बोललं जातंय. अशावेळी लवकरच तयार होणारी बॉम्बे आर्ट सोसायटीची इमारत अशी आयतीच कोणत्याही राजकीय पक्षाच्या हाती सापडू नये म्हणूनच एवढी वर्ष सोसायटीपासून लांब असलेल्या प्रफुल्ला डहाणूकर पुन्हा रिंगणात उतरल्या आहेत. डहाणूकर यांनी प्रचारासाठी वाटलेल्या पत्रकातच याचा उल्लेख केला आहे.
काही कलाकारांचं तर असं म्हणणं आहे की मनसेच्या जीवावर जरी राऊत उड्या मारत असले तरीही खुद्द मनसेमध्येच राऊत यांना विचारत नाही. राऊत हे लोखंडकरांच्या मागे राहून स्वतःचा कार्यभार उरकत असतात. आणि मनसेही लोखंडकर यांच्याकडे पाहूनच त्यांना सपोर्ट करतेय. असंही म्हटलं जातं की राज ठाकरे यांनी खुद्द राऊत यांना खडसावलं होतं की ''तू कलाकार आहेस ना मग हे धंदे सोडून दे.''
राऊत यांच्या पॅनेलचं मात्र म्हणणं आहे की डहाणूकर यांच्या काळात जरी सोसायटीला भूखंड मिळाला असला तरी त्यावर काहीच बांधकाम न झाल्यानं तो शासनाकडे परत गेला होता. तो शासनाकडून पुन्हा मिळवण्याचं कार्य राऊत यांनी केलंय आणि आता त्यावर बिल्डिंग तयार होताना दिसताच डहाणूकरांसारख्या वयस्कांना त्यात पुन्हा रस वाटू लागलाय. एवढी वर्ष सोसायटीपासून लांब राहिलेल्या डहाणूकरांना पुन्हा अध्यक्षपदाच्या खुर्चीचा मोह का होतोय असा सवाल राऊत पॅनेलकडून विचारला जातोय.
तर याचं स्पष्टीकरण करताना प्रफुल्ला डहाणूकर यांनी काढलेल्या पत्रकात म्हटलंय की- ''सोसायटीच्या भूखंडाचं स्वप्न डॉ. शरयू दोशी यांच्या मदतीने मी सत्यात उतरवलं. कलाक्षेत्रात काम करणारी नवी पिढी तयार व्हावी म्हणून मी जाणीवपूर्वक पदांपासून दूर राहिली होते. पण त्या भूखंडावर जशी इमारत तयार होऊ लागली तशी त्यातील निधीसंबंधी संशयास्पद राजकारणाचा कुबट वास येऊ लागला. कागदपत्र गहाळ होऊ लागले. संस्थेच्या प्रतिनिधींना मारहाण झाली. मग अशावेळी थंड डोळ्यांनी एक सुंदर स्वप्न भंग होताना मी कसं पाहू, म्हणूनच मी पुन्हा रिंगणात उतरले आहे.''
या मुद्द्यांसोबतच कार्यकर्ते किती आणि कलाकार किती याही मुद्द्यावर ही निवडणूक लढवली जातेय. कलाकारांकडे पाहूनच मतदान करा, कलाकारच या सोसायटीचं हित पाहू शकतील असं डहाणूकर पॅनेलचं मत आहे. तसंच नुसता कलाकार आहे का ते पाहू नका, तर कलाक्षेत्रात तो सक्रीय आहे का? त्याचं काम काय ते पाहा, असंही त्यांचं मत आहे. त्यासाठी त्यांनी छापलेल्या पँप्लेटमध्ये त्यांचा प्रत्येक उमेदवार कलाक्षेत्रात कसा सक्रीय आहे याची माहितीच दिली आहे. त्याजोडीने छापलेल्या विजय राऊत पॅनेलच्या पँप्लेटमध्ये कलाकार नसलेल्या उमेदवारांचाही सोसायटीला कसा फायदा होईल याचीही माहिती दिली आहे. जसं की वकील असलेले मनसेचे अर्चित जयकर यांच्या रुपाने कायदेशीर सल्लागार मिळेल असं या पँप्लेटमध्ये सांगण्यात आलंय. दोघाही पॅनेल्सच्या उमेदवारांनी आपापला जोरदार प्रचार चालवला आहे. कलाकारांचं पारडं ज़ड की कार्यकर्त्यांचं हे निकालानंतर कळेलच. पण मनसेच्या फेव्हरमध्ये असलेल्या अनेक कलाकारांचाही रोष आहे तो राऊत यांच्या कार्यपद्धतीवर. खरं काय खोटं काय त्यांचं त्यांनाच ठाऊक.
ही महत्त्वाची निवडणूक असल्यामुळे सोसायटीच्या प्रत्येक सभासदाने मतदान करायला यायला हवं. चांगलं कार्य व्हावं असं वाटत असेल तर आपली मतदानाविषयीची उदासीन भूमिका सोडायला हवी. सारासार विचार करून योग्य उमेदवारांनाच निवडून आणायला हवं. जे खरंच कलाकारांचं आणि संस्थेचं भलं करतील असं आवाहन आम्ही नि:पक्षपातीपणे करत आहोत. अन्यथा सोसायटीच्या नव्या इमारतीसमोरील रंगशारदा नाट्यगृहाचं काय झालं याचं ढळढळीत उदाहरण डोळ्यासमोर आहेच.
मतदानाची वेळ संध्या- ५ ते ८.३०
स्थळ- जहांगिर आर्ट गॅलरी
2 comments:
CLEAR TRANSPARENT PICTURE OF BOMBAY ART SCO,ELECTION 2010 GIVEN BY CHINHA THANKS SAMPAT NAYAKAWADI
धन्यवाद आपल्या प्रतिक्रियेबद्दल, आमचा निःपक्षपातीपणा कायम राहील याची खात्री आम्ही देतो.
Post a Comment