Sunday, May 16, 2010

'आता वाजले की १२'















इंजिनाची शिटी वाजे फूसsss फूसsss फूसsss

''काय हो, कोण जिंकणार?''
''सांगणं कठीण आहे बाबा!''
''एवढं मतदान तर बॉम्बे आर्ट सोसायटीच्या इतिहासात कधीच झालं नाही''
''हो! एवढे मतदार तर कधीच आले नव्हते''
''अहो, पण यातले आर्टिस्ट किती आणि मनसेवाले किती?''

१५ मेच्या संध्याकाळी जहांगीरच्या बाहेर मतदानासाठी जमलेल्या बॉम्बे आर्ट सोसायटीच्या सभासदांमध्ये हीच चर्चा होती. घोळक्या घोळक्यांनी ही चर्चा रंगत होती. अंदाज वर्तवणं सर्वांनाच कठिण जात होतं. जहांगिरच्या बाहेर कलाकारांची गर्दी होती, कार्यकर्त्यांची गर्दी होती. ही गर्दी पाहणा-या बघ्यांची गर्दी होती. मध्येच पोलिसांची व्हॅनही होती. साध्या वेषातील काही पोलीस हातात दंडुके घेऊन होते. तिकडे बाजूच्याच म्युझियम आर्ट गॅलरीच्या बाहेरही घोळके होते. तेवढ्यातच दोन-चार जण कोणीतरी यायचे. आणि विचारायचे, 'जहांगीर कुठेय हो??' आणि मग ते आतमध्ये मतदानासाठी शिरल्यावर कलाकारांच्या घोळक्यातले पुटपुटायचे- 'हे मनसेवाले असणार....निव़डणुकीच्या निमित्ताने तरी बॉम्बे आर्ट सोसायटीचे सदस्य बनलेल्या मनसे कार्यकर्त्यांनी जहांगीर पाहिली हे जहांगिरचं भाग्यच म्हणायचं.'

आतमध्ये शिरल्यावर मात्र इतर मतदान केंद्रात दिसतं तसं चित्र नसल्यामुळे या मनसे कार्यकर्त्यांची जामच गोची झाली असणार. सगळीकडे चित्रच चित्रं टांगून ठेवलेली. त्यातली बरीचशी ( त्यांना ) न कळणारी... ती चित्र बघण्याच्या नादातच बिचारे मत कोणाला द्यायचं हे ते विसरले असणार. किंवा मतदान पत्रिकेतले नेमके मनसेवाले कोण? यावरून सुद्धा त्यांची गोची झाली असावी, कारण विजय राऊत पॅनेलतर्फे उभे असलेले आर्टिस्टही बघावं तर प्रफुल्ला डहाणूकर पॅनेलच्या आर्टिस्टसोबत मस्तपैकी गप्पा छाटत... आणि त्यांच्या गप्पांचा सूर असा की- ( पराभवाची जबाबदारी काही आमची असणार नाही, पराभव जर झालाच तर कोणाच्या कारभारामुळे हे समजून जा... )
जहांगिरच्या ऑडिटोरियम हॉलमध्ये जिथे मतदान सुरू होतं तिथल्या एका कोप-यात एक शिल्प होतं. हे शिल्प होतं बंदुकीचं. पण ती बंदुक ख-यातली वाटत होती. मनसेचे कार्यकर्ते ती बंदुक मोठ्या हौसेने बघत होते. बहुधा गरज लागलीच तर कामाला येईल काय याच्या विचारात ते असावेत. पण 'विजया'च्या फैरी काही झडल्याच नाहीत. त्यामुळे बंदुकीची गरज सुदैवाने लागली नाही. प्रफुल्ला डहाणूकर पॅनेलचे सर्व उमेदवार मात्र बहुमताने निवडून आले.

महाराष्ट्राच्या राजकारणाचा जिथे भाग येतो तिथे राजकीयदृष्ट्याही अनेक आर्टिस्ट मनसेवाले आहेत. पण जिथे कलेत राजकारण शिरू पाहतं तिथे मात्र आर्टिस्ट हा निखळ आर्टिस्ट आहे, किंबहुना तो असावा. आणि त्या आर्टिस्टला कुठलीही अयोग्य माणसं बॉंम्बे आर्ट सोसायटीत नको आहेत हेच मतदानासाठी लांबून लांबून आलेल्या आर्टिस्टमंडळींनी दाखवून दिलं.

बॉम्बे आर्ट सोसायटीच्या इतिहासात असं मतदान झालं नाही. जिथे एवढी वर्ष दोन-अडीचशेच्या वर मतदानाचा आकडा जात नव्हता, तिथे यंदाच्या मतदानाने ६२८चा आकडा गाठला. मतदानकर्त्यांनी मोठ्या मतांनी डहाणूकर पॅनेलच्या सर्व उमेदवारांना निवडून दिलं. तर विजय राऊत पॅनेलचा पूर्ण पाडाव झाला.

या मतदानासाठी सोसायटीचे सभासद अमरावती, चिपळूण, कोल्हापूर कुठून कुठून आले होते. इतकंच काय राजस्थानमधूनही सभासदांनी हजेरी लावली होती. खुद्द शरयू दोशी मतदानाला येऊन गेल्या आणि आपल्यासोबत चार-पाच मतदारांना घेऊन आल्या यावरून काय तो बोध घ्यावा. सोसायटी अयोग्य माणसांच्या हाती जाऊ नये म्हणून आर्टिस्टमंडळी एकत्र झाल्याचं चित्र असं पहिल्यांदाच दिसलं.

बॉम्बे आर्ट सोसायटीसारख्या कलाकारांच्या संस्थेत शिरू पाहणा-या मनसेचं इंजिन रुळावरून का घसरलं? याचा विचार करताना राजसाहेबांनी कोणत्या प्रवृत्तीच्या आणि कोणते हेतू बाळगणा-या लोकांना पाठिंबा दिला पाहिजे याचा विचार भविष्यात तरी जरूर करावा अशीच चर्चा आर्टिस्ट मंडळींमध्ये होती. माजी अध्यक्ष विजय राऊत यांच्या अपारदर्शी कारभाराला कंटाळलेल्या सोसायटीच्या सदस्यांनी ठरवून राऊत पॅनेलचा पाडाव केला असं कलावर्तुळात म्हटलं जातंय. खरं तर मनसेनं जय्यत तयारी केली होती. जवळपास २०० च्या वर कार्यकर्त्यांना सोसायटीचं सभासदही बनवून घेतलं होतं. त्यांचेही मतदार कुठून कुठून म्हणजे वांद्रे, दादर-बिदरवरून आले होते. ( बिदर म्हणजे महाराष्ट्राच्या सीमेवरचे नव्हेत तर ते 'असेच' दादरला जोडलेले )

एवढे लोक पाहून पोलीसही चक्रावले. पोलीस म्हणत होते की इतकी लोकं येणार होती तर तुम्हाला आधीच तशी सोय करता आली नाही का? अशा एवढ्या मोठ्या संख्येने झालेल्या मतदानाचा निकाल पहाटे ६ वाजता लागला. ( त्यावेळी राऊत यांच्या घड्याळाने १२ वाजल्याचे दाखवले. गेल्या ३ वर्षातल्या अध्यक्षपदाच्या काळात घड्याळाला चावी न दिल्याचा परिणाम दुसरं काय? ) असो... अध्यक्षपदाच्या निवडणुकीत त्यांचा पुरता पराभव झाला. प्रफुल्ला डहाणूकरांची बाजी मारली. सेक्रेटरीपदासाठीच्या निवडणुकीत नरेंद्र विचारे यांनी मनसेच्या विठ्ठल लोखंडकर यांना धूळ चारली. ( पराभवानंतर लोखंडकर यांना त्यांच्या विठ्ठलाकडून काय काय ऐकावे लागेल याची कल्पनाच केलेली बरी. ) खजिनदार पदासाठीच्या लढतीत राऊत पॅनेलच्या अश्विन कदम यांचा पराभव करून चंद्रजित यादव निवडून आले. सदस्यपदासाठीच्या सात जागांवरही डहाणूकर पॅनेलच्या उमेदवारांनीच बाजी मारली. यात चित्रकार अनिल नाईक हे सर्वाधिक मतांनी निवडून आले. त्यापाठोपाठ ओमप्रकाश राजपूत, सुरेशचंद्र आवरी, मनोहर गांगण, प्रकाश घाडगे, श्रीकांत कदम, उत्तम पाचारणे, या डहाणूकर पॅनेलच्या उमेदवारांनी निर्विवाद वर्चस्व मिळवलं. स्वच्छ व पारदर्शी कारभाराची अपेक्षा करणारे कलाकार या निवडणुकीच्या निमित्ताने एकत्र आले हे मात्र या निवडणुकीचं खरं फलित आहे.

( असे म्हटले जाते की, एरव्ही साहेबांसोबत एसी गाड्यांमधून फिरणा-या मनसेच्या कार्यकर्त्यांचा ऑडिटोरियम जहांगिरच्या हॉलमध्ये फॅनसुद्धा अपुरे असल्यामुळे पुरता घाम निघाला होता. पण आर्टिस्ट लोकांना ऑडिटोरियममधील घामाची सवय असल्यामुळे ( आणि भविष्यात आपला घाम कोण काढू शकेल हे ध्यानात आल्यामुळेच ) डोके ठिकाणावर ठेवून मत दिले. जे राऊत पॅनेलच्या कार्यकर्त्यांना जमले नाही. हे ही राऊत पॅनेलचा घाम निघण्याचे ( पक्षी: पराभवाचे ) कारण असल्याचे समजते )

या गाजलेल्या मतदानाचे फोटो पाहायचे असतील तर क्लिक करा-http://picasaweb.google.com/115812695131756205142/Voting#
बॉम्बे आर्ट सोसायटीच्या बहुचर्चित इमारतीचे बांधकाम पाहण्यासाठी क्लिक करा-


8 comments:

Unknown said...

ज्यांना बॉम्बे आर्ट सोसायटीवर झेंडा फडकावता आला नाही, ते महाराष्ट्रावर राज्य करायला काय जाणार????

Deepak said...

Batami Anandachi ahe,Dahanukar madam ani sarva kalakaranchya prayatnanna Yash ale!

'चिन्ह' said...

प्रा.मंगेश राजाध्यक्ष यांनी 'चिन्ह'ला इमेलद्वारे पाठवलेली ही प्रतिक्रिया-
Satish,

Bombay Art Society chya electionchi utsukata aapalya chinha- blog mule aadhich vadhali hoti. Jodila apalya khmang bhashechi khuskhushit phodani lajjat vadhavit hoti. Ani nikal ala (aani Nikal lagalahi.)

Maatra yavarun ek goshta spashta zali, ti mhanaje, apalya kalakaranmadhye ajun kalatmak rug jabardast aahe. Kitihi matabhed asot, he kalakar apalya kalakshetrala rajakarnyancha aakhada kadhich karu denar naahit.

Ata garaj aahe ti Prafullatainchya netrutwakhali Bombay Art Society che vividh upakram honyachi.

Apalya chinha blog tasech, Bombay Art Societychya kalakar niyukta panel la hardik shubhechha!

Prof. M.G.Rajadhyaksha

Santosh More said...

Cogratullations to all winners. Aata jababdari vadhli aahe. Vijayacha anand mavlala ki kamala laga.

'चिन्ह' said...

सुहास निंबाळकर यांनी 'चिन्ह'ला इमेलद्वारे पाठवलेली ही प्रतिक्रिया- Congratulations. In general no politician (of any colour or shade) should be allowed to mess-up art or art organisations.

श्रीनिवास नार्वेकर said...

"बॉम्बे आर्ट सोसायटी" मध्ये कलेशी सुतराम संबंध नसणा-या मनसेच्या कार्यकर्त्यां(?)चे काय काम ? त्यानी आपली 'मनसे' त्यांच्या साहेबांची तळी उचलावी की ! खरे तर, कोणाला कुठे पाठवावे, याचा गाम्भिर्याने विचार राज ठाकरेंनी करायला हवा. उद्या मल्लिका शेरावत Censor Board ची अध्यक्षा झाली तर कसे वाटेल ? मराठीला जसा मराठीचा हक्क मि...ळवून देण्याची भाषा केली जाते, तसेच कलाकारांना त्यांचा हक्क मिळू द्या, ठाकरे साहेब.. Shriniwas Narwekar "बॉम्बे आर्ट सोसायटी" कलाकारांची आहे, ती कलाकारांचीच राहू द्या.. त्याचा राजकीय पक्ष आणि आखाडा करू नका, रे बाबांनो..

'चिन्ह' said...

'चिन्ह'कडे इमेलद्वारे भास्कर हांडे यांनी पाठवलेली ही प्रतिक्रिया-
Satish
mee aajach Bharatat Aalo. farch changali gost ghadali. motha utsava sajara kela pahije. nidan Dadagiri tari kami hoil. Arthat hya madhye punha shivsena panel vhayala nako.
far samadhan vatale tuzi email Pahoon.
bhaskar hande

pradeep9 said...

sarvanche aabhinandan karan ha vijai sarva chitrakarancha ahe, aso aata pudhe chagali kame karun dhakavalit tar vijayache sone hoel
bombay art society hi chitrakarnchi pandhari aahe, aathatari taycha maan rakha aani milalelay sandtiche sone karuya.

PRADEEP V. NERURKAR
MUMBAI