॥श्री गजानन प्रसन्न॥
श्री. गजानन पाटील यांनी बहुधा कोल्हापूरहून ‘चिन्ह’कडे कलानिकेतन कलामहाविद्यालयाविषयी फेसबुकवर चौकशीची विनंती केली होती, ताज्या अंकाच्या कामात व्यग्र असल्यानं त्या विनंतीकडे लगेचच लक्ष देता येणार नाही हेही त्यांना कळवलं होतं पण ‘चिन्ह’वरील त्यांच्या अत्यंतिक प्रेमामुळे हे उत्तर त्यांना बहुधा पटलं नसावं. म्हणून त्यांनी फेसबुकवर पुढे दिलेली पोस्ट टाकली, जी ‘चिन्ह’च्याच विश्वासार्हतेला धक्का देणारी होती. म्हणूनच तिची दखल घ्यावी लागली. ‘चिन्ह’नं दिलेलं उत्तर गजानन पाटील यांच्या पोस्टच्या पुढे वाचा.
नमस्कार,मी चिन्हला या करीता सामील झालो की आपण कलाक्षेत्रातील भ्रष्टाचार उघङकीस आणता, मी तुम्हाला या पुर्वी दोन वेळा कलानिकेतन महाविद्यालयातील(कोल्हापूर) कामकाजाची चौकशीची विनंती केली होती पण आपणाकङून कोणताच प्रतिसाद मिळाला नाही.ह्याचा अर्थ आपण सर्व एका माळेचे मणी आहात असा लावायचा का?
साष्टांग नमस्कार,
आपण कोल्हापूरच्या कलानिकेतन महाविद्यालयाविषयी लिहिलं होतं. त्याला आम्ही लगोलग उत्तरही दिलं होतं. पण बहुधा तुमच्यापर्यंत ते पोहचलं नसावं. आता पुन्हा हे उत्तर. कलानिकेतन महाविद्यालयाच्या कामकाजाची चौकशी करायची म्हणजे नेमकं काय करायचं? ती चौकशी कुणाकडे करायची? कशी करायची? का करायची? याविषयी काहीही न कळवता तुम्ही थेट फेसबुकवर पोस्ट टाकणं हे अत्यंत आक्षेपार्ह आहे. याविषयी तुम्ही जर पत्र लिहून किंवा दूरध्वनीवरून कळवलं असतं तर अधिक बरं झालं असतं. तुम्हाला दिलेल्या आधीच्या उत्तरात आम्ही ‘चिन्ह’च्या आगामी अंकात व्यग्र आहोत, आता लगेचच काही करणं शक्य नाही हेही स्पष्ट केलं होतं. असं असताना आपण जर आम्हाला एका माळेचे मणी ठरवणार असाल तर खुशाल ठरवा.(आमचं कुठेही कलामहाविद्यालय नाही किंवा कलामहाविद्यालयाची शाखाही नाही. किंबहुना कलाशिक्षण क्षेत्राची आमचा काडीचाही संबंध नाही.) इत्तपर मणी ठरवायचं का भोपळा ते तुम्ही ठरवा.
जे जे स्कूल ऑफ आर्ट ही महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील कलाशिक्षण संस्थांची मातृसंस्था आहे आणि या संस्थेत शिकावयाचं भाग्य आम्हाला लाभलं. या संस्थेची १९८५ सालानंतर जी काही धूळदाण झाली ती पहावेना. म्हणून कलाशिक्षण भ्रष्टाचारविरोधी लढा उभारण्याचा प्रयत्न केला. या कामी दोन हाताच्या बोटांवर मोजताही येणार नाहीत इतकंच या क्षेत्रातील लोकांचं सहकार्य मिळालं. बाकीचे सारे दूरवरून नुसती गंम्मत पाहत राहिले. ‘चिन्ह’नं पुढाकार घेऊन उभारलेल्या लढ्यात किमानपक्षी जेजेच्या माजी विद्यार्थ्यांचा जरी पाठिंबा लाभला असता तरी सर्वच्या सर्व कलाशिक्षण माफिया केव्हाच नेस्तनाबूत झाले असते. पण तसं झालं नाही. ना जेजेच्या माजी विद्यार्थांनी पाठिंबा दिला ना अन्य कलामहाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी पाठिंबा दिला. हे सर्व भोगत होते किंवा आहेत ते महाराष्ट्रातील सर्वच विद्यार्थी ‘आपल्याला काय त्याचं’ असं म्हणून नुसतीच गंमत पाहत राहिले.
‘चिन्ह’नं वृत्तपत्रात रान उठवलं. दोन अडीच लाख रूपये खर्च करून .(आणि कर्जबाजारी होऊन) साडे तीनशे पानाचा ‘क(।)लाबाजार’ अंकही काढला. पण कलाशिक्षण क्षेत्रातील संबंधितांनी कुठलाही पाठिंबा न दिल्यानं महाराष्ट्र शासनानं हिंग लावूनसुद्धा दखल घेतली नाही. उलट हा अंक प्रसिद्ध होताच आमच्यासारख्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासाठी तंत्रशिक्षण खात्याच्या प्रधान सचिवांनी एका सेवा निवृत्त भ्रष्ट अधिकार्याचीच नेमणूक केली. या अधिकार्यानं कलासंचालनालयात गेल्या २० वर्षात झाला नव्हता इतका भ्रष्टाचार अवघ्या एका वर्षात करून दाखवला. ‘चिन्ह’नं पुन्हा लेखणी उगारल्यावर या अधिकार्याची नेमणूक रद्द करणं शासनाला भाग पडलं. या कामी तुमच्या सारख्यांची जबाबदारी काहीच नाही का?
‘चिन्ह’नं आजवर जे जे मांडलं, जो भ्रष्टाचार पुराव्यानिशी उघडकीला आणला. त्यावर तुमच्यासारखी या क्षेत्राशी संबंधित मंडळी वारंवार प्रतिक्रिया व्यक्त करती तर निश्चितपणानं शासनावर दबाव आला असता. पण सारेच मुर्दाडासारखे स्वस्थ बसले. आमच्या बाजूला असलेले काही तर चक्क त्या कलाशिक्षण माफ़ियांना सामीलही झाले. (अधिक माहितीसाठी तुमच्या आणि शेजारच्या जिल्ह्यात जास्त चौकशी करा, नावं मिळतील.) हे सारं असं असताना ‘चिन्ह’ला एका माळेतले मणी ठरवून मोकळे होता? ‘चिन्ह’नं काय तुमचा पत्कर घेतलाय? का घेऊन खाल्लंय? ‘चिन्ह’ची भ्रष्टाचारविरोधी मोहिम ही प्रामुख्यानं जे जे स्कूल ऑफ आर्ट आणि कलासंचालनालय यांच्याशीच संबंधित होती. अन्य कलामहाविद्यालयांची दखल घेणं केवळ अशक्य होतं. तो प्रयत्नही करून पाहिला पण आर्थिक मर्यादेमुळे तो अपूर्ण राहिला व दुसरं आणि अत्यंत महत्त्वाचं कारण म्हणजे आर्ट मास्टर, आर्ट टिचर, डिप.एड सारख्या शैक्षणिक महत्त्वाच्या परीक्षा जी कलामहाविद्यालयं प्रत्यक्षात जमिनीवर अस्तित्त्वातच नाहीत अशा कागदावरच्याच कलामहाविद्यालयातून आयोजित केल्या जातात आणि त्याच कागदी कलामहाविद्यालयातील विद्यार्थी अशा भंपक परीक्षांना फर्स्ट क्लासनं उत्तीर्ण होतात. हे सारं कलासंचालनालय आणि तंत्रशिक्षणं खात्याच्या अधिकार्यांच्या संगतमतानं वर्षानुवर्षं चाललं आहे. हे सारं पाहिल्यावर तोही नाद सोडला. आता यशवंत सोनावणे यांच्यासारखं एखादं प्रकरण होईल तेव्हाच या सार्याचा निकाल लागेल. तोपर्यंत आपण फक्त गप्प राहून हे पहात बसायचं, यापेक्षा आपण दुसरं काय करू शकतो?
आणखी एक तुम्ही जे म्हणताय ना त्या सार्यांचे दिवस आता भरत आलेत. यंदा कलासंचालनायातच्या अखत्यारितील कलामहाविद्यालयांत फक्त २७ ते ३० टक्केच विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलाय ७० टक्क्यापेक्षा जास्त जागा यंदा रिकाम्याच राहिल्या आहेत. याचा अर्थ उघड आहे भावी चित्रकार आणि त्यांचे पालक आता जागे झाले आहेत. ते एकतर इतर राज्यात किंवा परदेशात विद्यार्थ्यांना पाठवत आहेत किंवा रचना संसद, एम आय टी, सिंबॉयसीस सारख्या संस्थांची निवड करीत आहेत अथवा चित्रकलेला थेट प्रवेश घेणं टाळून अॅनिमेशन, डिझाईनिंग सारख्या विषयांची निवड करत आहेत. याचाच अर्थ असा की आज २७ टक्क्यावर थांबलेली संख्या पुढल्या वर्षी १७, त्याच्या पुढल्या वर्षी ७ टक्क्यावर येऊन, या सगळ्या शिक्षणसंस्था येत्या तीन ते पाच वर्षात बंद पडणार आहेत.
या सर्वावरव कडी केली आहे ती महाराष्ट्र शासनाच्या तंत्रशिक्षण खात्याच्या जी.आर. नं. १ जानेवारी २०११ रोजी जारी झालेल्या जी. आर. नं (www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर हा जी. आर उपलब्ध असून त्याचा संगणक संकेतांक 20110101145519001 हा आहे.) पुढील वर्षी विद्याथ्यांची फी वाढवली जाणार आहे. त्याबदल्यात कलासंचालनालयाच्या अखत्यारितील शिक्षणसंस्थांना आपल्या कामकाजात आणि विद्यार्थ्यांना द्यावयाच्या सोयी सुविधांत जे बदल करावे लागणार आहेत, ते सध्या अस्तित्वात असलेल्या संस्था कितपत करू शकतील याविषयीच शंका आहे. जर तंत्रशिक्षण खात्यानं दबाव आणला तर सध्या अस्तित्वात असलेल्या सर्वच शिक्षणसंस्थांना गाशाच गुंडाळावा लागेल. कुणीही त्या मागण्या पूर्ण करू शकणार नाहीत हे निश्चित! आणि तंत्रशिक्षण खात्यानं हा दबाव नाही आणला तर तंत्रशिक्षण खातं आणि कलासंचालनालयातले सर्वच माफ़िया आणखी आणखी माजतील आणि आत्ता आहे त्यापेक्षा वाईट अवस्था निर्माण होईल. इतकंच. तेव्हा गजाननराव काळजी सोडा आणि इतरांना दूषणं देणंही सोडा. त्यातून कारण नसताना चांगल्या कामाविषयीही गैरसमज निर्माण होऊ शकतात एवढंच!

1 comment:
DEAR, CHINHA
ITS A CORRECT COMENT
TELL MR. GAJANAN TO COMPLAIN
IN WRITING TO
DIRECTOR OF ART
AND SEND A COPY TO CHINHA
ITS A WAY OF DOING COMPLAIN
THANKS
SHIRISH MITBAWKAR
Post a Comment