श्री गजानन प्रसन्न (हो)!
गजानन पाटील
स.न.वि.वि.
तुमच्या तीनही प्रतिक्रिया वाचल्या, आवडल्या. चूक मान्य करून अत्यंत मोकळेपणानं क्षमा मागितलीत हेही आवडलं. महाराष्ट्राच्या कानाकोपर्यात तुमच्यासारखे असंख्य विद्यार्थी गोते खात आहेत, योग्य शिक्षणाअभावी तडफडत आहेत, हे सारंच ‘चिन्ह’नं जवळून पाहिलं आणि त्याविरोधात वेळ पडल्यास एकट्यानं का होईना उभं राहायचं हे ‘चिन्ह’नं मनोमन निश्चित केलं होतं आणि त्यानुसार सारं पुढं पुढं घडत गेलं. दुर्दैवानं महाराष्ट्र शासनानं या प्रश्नी संपूर्णत: डोळेझाक केल्यानं कलासंचालनालयात आणि तंत्रशिक्षण खात्यात माफियांची एक मोठ्ठी टोळी उभी राहिली आणि तिनं गेल्या २० – २५ वर्षांत ५० वर्षांचं भारतातलं एकमेव कलासंचालनालय, १५० वर्षांचं जे जे स्कूल ऑफ आर्ट, ७५ वर्षांचं जे जे इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाईड आर्ट आणि अन्य कलासंस्थांही पद्धतशीरपणानं पोखरून काढल्या. इतक्या की महाराष्ट्रात आता औषधालासुद्धा चांगली कला शिक्षणसंस्था उरलेली नाही, अशी परिस्थिती आहे. गेल्या २० – २५ वर्षांत या खात्यावर नेमणूक झालेल्या प्रत्येक मंत्र्यानं या प्रश्नाकडे संपूर्णत: दुर्लक्ष केलं. किंबहुना वाईट कृत्य करून त्यात आणखी भर कशी घालता येईल हेच त्यांनी पाहिलं. याच २० – २५ वर्षांत जे जे सचिव या खात्यावर नियुक्त केले गेले. त्यांनीही मंत्र्यांचीच री ओढली आणि आणखी कशी वाताहत करता येईल याकडे लक्ष पुरवलं. त्याचा परिणाम असा झाला तिथले कारकुनसुद्धा जुमानेनासे झाले. अगदी महाराष्ट्राच्या कलासंचालकांनं आपल्या टेबलावर येऊन आधी आपल्याला सलाम ठोकला पाहिजे असं बिनदिक्कतपणे कलासंचालकाला सुनावू लागले आणि काही कलासंचालक तर इतके दिवटे आणि बेशरम निपजले की त्या कारकुनाला सलाम ठोकून मग सचिव किंवा मंत्र्यांची भेट घेऊ लागले. याच अधिकारी आणि कर्मचार्यांनी मिळून मग कलाशिक्षणाचं मातेरंच करून टाकलं. महाराष्ट्राला गेली अनेक वर्षं कलासंचालक मिळू शकत नाही. जे जे स्कूल ऑफ आर्ट सारख्या संस्थेला वर्षानुवर्षं अधिष्ठाता मिळू शकत नाही. हे याच कलाशिक्षण माफियांचं कर्तृत्त्व आहे. तो पोपट शिंदे परवडला. त्याच्यामुळे फार फार तर काय किंमती गाड्यांचं नुकसान होत होतं; पण या कलाशिक्षण माफियांमुळे महाराष्ट्रातल्या चित्रकारांच्या भावी पिढ्यांच्या संपूर्ण आयुष्याचंच नुकसान झालं आहे आणि हा त्यांचा नंगा नाच गेली तब्बल २० – २५ वर्षं अव्याहतपणे चालला आहे. तो कुणीही थांबवू शकलेला नाही, ज्यांनी थांबवायला हवा, तेच सारे या माफियांना सामील झाले आहेत. मग तो सचिव असो, उपसचिव असो, कक्ष अधिकारी असो अथवा कलासंचालक किंवा उपकलासंचालक किंवा एखादा कारकून; सारेच या कत्तलीत सामील आहेत. ‘चिन्ह’नं वृत्तपत्रातून अथवा क(।)लाबाजार अंकातून त्यावर झोड उठवली. अक्षरश: नावानिशीवार वाभाडेही काढले. पण थोड्या काळासाठी थांबलेले त्यांचे धंदे तसेच अव्याहतपणे चालूच राहिले. या त्यांच्या निगरगट्टपणापुढं ज्यांनी त्यांच्याविरूद्ध बातम्या दिल्या ती वृत्तपत्रही नरमली. बातम्या देणं टाळू लागली. या ‘प्रश्नचिन्ह’ ब्लॉगची निर्मिती म्हणूनच झाली.
गजाननराव तुमचे प्रश्न, तुमच्या समस्या मनात कुठलीही भिती न बाळगता आम्हाला थेट कळवा. त्यांचं निराकरण कदाचित आम्ही करू शकणार नाही पण हजारो लोकांपर्यंत ते निश्चिपणानं पोहचवू. शिरिष मिठबावकर सरांनी तुम्हाला चांगला सल्ला दिलाय. तुमचं म्हणणं आधी कलासंचालनालयाला कळवा, त्यांनी दुर्लक्ष केलं तर तंत्रशिक्षण खात्याला कळवा आणि त्यांनीही दुर्लक्ष केलं तरच वृत्तपत्रांकडे जा किंवा आमच्याशी संपर्क साधा. एक लक्षात ठेवा तुमचे प्रश्न सोडवायला, तुमच्या समस्यांचं निराकरण करायला बाहेरून कुणी तुमच्याकडे येणार नाहीये. तुमच्यातल्याच कोणीतरी ती जबाबदारी घ्यायला हवी आहे. तुम्ही फेसबुकवर ज्या क्लिपची पोस्ट टाकली होती ती तरी दुसरं काय सुचवते? तुम्ही सर्व विद्यार्थी एकत्र आलात आणि संस्थेच्याविरोधात उभे राहिलात तर संस्थेला कधी ना कधी वाकावंच लागेल हे लक्षात ठेवा. या सर्व जुन्या संस्था सेवाभावी कलाशिक्षकांच्या आणि कलाशिक्षणासाठी स्वतःच्या कलेचा त्याग करणार्या कलावंतांच्या स्वार्थत्यागातून उभ्या राहिल्या आहेत आणि त्यांच्यावर ही वेळ गेल्या २० – २५ वर्षांत तंत्रशिक्षण खातं आणि कलासंचालनालयातल्या माफियांनी आणली आहे हे लक्षात ठेवा. त्या माफियांना आधी गाडायला हवं. जोपर्यंत ते गाडले जाणार नाहीत तोपर्यंत हे असंच पुढे चालू राहणार. ‘आदर्श’ प्रकरणात जनमताचा प्रचंड दबाव आल्यामुळेच सरकारला झक मारत का होईना त्यांच्यावर कारवाई करावी लागली. इथं आपल्या या कलाशिक्षणाच्या क्षेत्रात ते होत नाहीये म्हणूनच या टिनपाट आणि डफ्फर लोकांचं रान माजलं. ते जर आता कापून काढायचं असेल तर हीच वेळ योग्य आहे. बोला कधी करता सुरूवात?
3 comments:
sir punyat sudda abhinav chya sasthapkani khup gundgiri keliy udya bhavya morcha aahe ekde suddha laksh dya j j sarkh plz
sir punyat sudda abhinav chya sasthapkani khup gundgiri keliy udya bhavya morcha aahe ekde suddha laksh dya j j sarkh plz
sir me survat keli ahe mahiti jama karto ahe, lavkarch tumchya paryant changli batmi pohchel.
Post a Comment