कौलं उडालीSSS… कौलं उडालीSS…
(“कोंबडी पळालीSSS’’ या गाण्याच्या चालीवर शीर्षक वाचावं)
कलासंचालनालय आणि त्याच्या अखत्यारितल्या कलामहाविद्यालयांचा कारभार आता संपूर्णपणे कलासंचालनालय आणि तंत्रशिक्षण खात्यातल्या माफियांच्या हातात गेलाय हे दाखवून देणारा हा घ्या आणखी एक ढळढळीत पुरावा. आम्हाला ठाऊक आहे की कितीही ढळढळीतपणाने असे पुरावे दिले, मांडले तरी तंत्रशिक्षण सचिव, तंत्रशिक्षण मंत्री यांच्याकडून त्यावर कुठलीही कारवाई केली जाणार नाही, हे नक्की. पण म्हणून असले पुरावे वारंवार प्रसिद्ध करण्याचं आम्ही थांबवणार नाही, हेही नक्कीच.
या पोस्टमध्ये जे प्रकाशचित्र प्रसिद्ध केलं आहे, ते जे जे इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाईड आर्टच्या जुन्या इमारतीचं आहे. ज्यात वर ज्यांच्या उल्लेख केला आहे ते माफिया बसतात. शे-सव्वाशे वर्षांच्या या जुन्या इमारतीची कौलं बदलण्याचं काम सध्या सुरू आहे. आत्ता जी कौलं बदलली जात आहेत ती कौलं गतवर्षीच शाकारण्यात आली होती. तरीसुद्धा यंदा ती बदलली जात आहेत. सर्वसाधारणपणे एकदा बदललेली कौलं २० -२०, २५ – २५ वर्षं बदलली जात नाहीत. पण कलासंचालनालय आणि जे जे इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाईड आर्टची इमारत याला अपवाद आहे. खरं तर अत्यंत बेमुर्वतखोरपणानं दिवसा ढवळ्या सरकारी म्हणजेच तुमच्या आमच्या कररूपानं भरलेल्या पैशावर टाकलेला हा दरोडाच आहे. पण त्याचा जाब ना तंत्रशिक्षण सचिव विचारत ना तंत्रशिक्षण मंत्री!
अगदी अलिकडे घडलेला किस्सा सांगितल्याशिवाय राहवत नाही. कलासंचालनालयातल्या एका शिपायाच्या मुलीचं का मुलाचं मुंबईबाहेर लग्न होतं. पण बिचार्याकडे लग्नाला जायला गाडी नव्हती. मग त्यानं करावं, तो चक्क कलासंचालनालयाची गाडी घेऊन तो बाहेर गेला, जाताना त्याला आवारातल्या चौकीदारानं हटकलं. तो चौकीदार त्याला गाडी घेऊन जाऊ देईना. पण त्या चौकीदाराला फाट्यावर मारून तो शिपाई तब्बल तीन दिवस गाडी महाराष्ट्रभर फिरवत होता. चौथ्या दिवशी आल्यावर अगदी आजापर्यंत त्याच्यावर कुठलीही कारवाई झालेली नाही. कारण कलासंचालनालयातल्या ज्या माफिया अधिकार्यानं त्याला गाडी नेण्यासाठी परवानगी दिली त्याला त्यादिवसापासून रोज दुपारी त्या शिपायाच्या घरातून त्या अधिकार्याला कोंबडीच्या जेवणाचा डबा येतो. जेजेच्या आवारात आता औषधालासुद्धा कोंबडी सापडत नाही. सगळ्या कोंबड्यांचा फडशा पाडला गेलाय. आता त्या झोंबड्या अधिकार्याच्या पोटात कुठून कोंबड्या जाणार असा यक्ष प्रश्न संबंधितांना सतावतो आहे.
खरं तर यासारख्या अनेक प्रश्नात सरकारची पूर्णत: बेअब्रू झाल्यावर मुख्य सचिवांनी संबंधितांना जाब विचारावयास हवा होता. पण गेल्या २०-२५ वर्षात तो विचारल्याचं उदाहरण औषधालाही शोधून सापडत नाही. शिक्षणाविषयी आस्था असणार्या नव्या मुख्यमंत्र्यांकडून अत्यंत चिघळलेल्या या प्रश्नांकडे लक्ष घालण्याविषयी अपेक्षा होत्या पण मुख्यमंत्रीपदावर बसल्यापासून त्यांच्यामागे ‘आदर्श’सारख्या प्रश्नांचं जे शुक्लकाष्ट लागलं आहेत त्यातच ते अडकून पडले आहेत. त्यामुळे आता याप्रश्नी मुख्य सचिव रत्नाकर गायकवाड हे तरी लक्ष घालतील अशी अपेक्षा करावी का? त्यांच्यासाठी आणखीनही तपशील आम्ही पुरवत आहोत. गतवर्षी बदलेली कौलं म्हणे संबंधित महाविद्यालयातील शिक्षकानंच लिलावात विकत घेऊन आपलं घर शाकारलं होतं. त्यानंतर बरोब्बर वर्ष पूर्ण होण्याच्या आतच त्या प्रचंड इमारतीवरील कौलं कुणाच्या आदेशानं काढली जात आहेत? ती कौलं जर खराब झाली म्हणून काढली जात असतील तर अवघ्या बारा महिन्यात खराब झालेली कौलं पुरवणार्या कंत्राटादारावर कलासंचालनालयानं काय कारवाई केली, हे प्रभारी कलासंचालक जाहीर करू शकतील काय? आपल्याइकडे सर्वसाधारणपणे पावसाळ्याच्या आधी कौलं बदलण्याची पद्धत आहे; पण इथं तर ती चक्क फेब्रुवारीत बदलली जात आहेत. हवामान खात्यानं मार्च महिन्यात पाऊस पडण्याचं भाकित वर्तवलं आहे का? आणि वर्तवलं असेल तर त्या हवामान खात्याचं आणि ते जाहीर अधिकार्याचं नाव प्रभारी कलासंचालक जाहीर करणार आहेत काय? महाराष्ट्रात आणखीन एक पद्धत रूढ आहे. एकदा शाकारलेली कौलं पुढल्या पावसाआधी परतवून लावली जातात किंवा उलट करून लावली जातात. म्हणजेच एकदा लावलेली कौलं किमान दोन वर्षं तरी वापरली जातात. असं असताना गतवर्षी लावलेली कौलं बदलण्याच्या निर्णयप्रक्रियेत कोण कोण सामील आहे, हे प्रभारी कलासंचालक जाहीर करू शकतील काय? आणि शेवटचा प्रश्न ही कौलं आता कुणाला देण्याचं किंवा कुणी घेण्याचं निश्चित झालं आहे, हे तरी निदान जाहीर कराल काय? दादा आडारकर, प्रल्हाद अनंत धोंड, माधवराव सातवळेकर, बाबुराव सडवेडकर यांच्यासारख्या नामवंत शिक्षणतज्ज्ञ आणि चित्रकारांनी भूषविलेल्या महाराष्ट्राच्या कलासंचालकांच्या खुर्चीवर बसणार्या तुम्हाला महाराष्ट्रातल्या आजच्या पाच चित्रकारांचीसुद्धा नावं धडपणे सांगता येणार नाही हे आम्हाला ठाऊक आहे. पण वर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही नक्कीच देऊ शकाल, नव्हे ती द्याच!
ताजा कलम : अधिक चौकशी करता असे कळले की ग्रॅंटमधले पैसे सरकारला परत द्यावे लागू नयेत म्हणून कलासंचालनालय आणि तंत्रशिक्षण खात्यातल्या हरामखोर माफियांनी सरकारी पैसे बुडविण्यासाठी दिवसा ढवळ्या घातलेला हा दरोडा होता. यावर कुठलीही कारवाई होणार नाही हे निश्चित आहे कारण संबंधित सर्वांचेच हात यात बरबटलेले आहेत. म्हणूनच या ब्लॉगची लिंक आम्ही मुख्य सचिव रत्नाकर गायकवाड यांना जाहीरपणे पाठवत आहोत. गायकवाडसाहेब या माफियांवर कारवाई करण्यासाठी तंत्रशिक्षण सचिवांवर दबाव आणा, कारण पोपट शिंदेची ही औलाद महाराष्ट्राच्या भावी पिढीच्या कलाशिक्षणाची पुरती वासलात लावते आहे. महाराष्ट्रात यंदा फक्त २७ टक्के विद्यार्थ्यांनी कलाअभ्यासक्रमाला प्रवेश घेतलाय, तो आकडा शून्यावर येण्याआधी तरी काहीतरी करा. याविषयीची अधिक माहिती आपणांस कालाबाजारच्या http://www.chinha.in/marathi/archive2008.html या लिंकवर मिळू शकेल. त्यावरूनच हे प्रकरण कोणत्या थराला गेलंय याची आपणास कल्पना येऊ शकेल.
No comments:
Post a Comment